पुण्यात करोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळं करोना योद्धे म्हणून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी पुण्यात करोनामुळं पोलिसाचा दुसरा बळी गेला. त्यामुळे पुणे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत काम करणाऱ्या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली होती. ८ मे रोजी खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची स्वॅब तपासणी केली असता ती करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ९ मे रोजी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतू, आज (२१ मे) रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा, या ठिकाणीचे रहिवासी होते.

आत्तापर्यंत शहरातील २२ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर त्यांपैकी दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

यापूर्वी पुण्यात करोनामुळं एका ५८ वर्षीय सहाय्यक पोलीस फौजदाराचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. १२ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हायपरटेन्शन आणि स्थुलपणानं ते ग्रस्त होते.