राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. “या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला,” असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे का? असा सवाल केला. त्या शुक्रवारी (६ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कांद्याचा एवढा मोठा प्रश्न आहे. मी चार महिन्यांपासून सांगते आहे की, कांद्याला भाव द्या. जगात कांदा कमी आहे आणि भारतात गरजेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हा कांदा परदेशात पाठवून द्या. मोठी मोठी घराणीही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लावण्यात आला.”

“सर्वात जास्त पैशावाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत”

“कांद्याचा शेतकरी अल्पभूधारक आहे. कांदा कमी पाण्यात येतो. त्यावर सरकार ४० टक्के कर लावत आहे आणि मग परदेशात पाठवणार का? सर्वात जास्त पैशावाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत. तो ४० टक्के कर अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कांद्यावर लावण्यात आला आहे. तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.

“मविआ काळात सोयाबीनला साडेबारा हजार रुपये भाव”

“महाविकासआघाडी सरकारच्या काळात सोयाबीनला साडेबारा हजार रुपये भाव होता, आज किती आहे? आज या सोयाबीनला रोग लागला आहे. कृषीमंत्री तिथं गेले आहेत का?” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं.

“हे पालकमंत्रिपदासाठी खासगी विमानाने दिल्लीला”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “नांदेडला ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. पालकमंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या विमानाने दिल्लीला गेले, ते विमान नांदेडला जाऊ शकत नव्हता का? ते दिल्लीला एसटीने गेले नाहीत, तर खासगी विमानाने गेले. हे पालकमंत्रिपदासाठी खासगी विमानाने दिल्लीला जाऊ शकतात, तर मग ४१ मृत्यू झालेल्या नांदेडमध्ये जाता येत नाही का?”

हेही वाचा : “हे तर खुनी सरकार…” नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे यांची टीका; म्हणाल्या, “लोकांच्या मनात…”

“मोडेन, पण दिल्ली दरबारासमोर वाकणार नाही”

“४१ मृतांमध्ये १२ लहानलहान तान्ही मुलं आहेत. कधी त्या आईच्या दुःखाचा विचार केला आहे का? हे इतकं असंवेदनशील सरकार आहे. अशा सरकारबरोबर आम्ही काम करणार नाही. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी मोजू. मोडेन, पण दिल्ली दरबारासमोर वाकणार नाही,” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule criticize modi government over onion rate high export tax pbs
Show comments