सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समांरभ संपन्न

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी देशाचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा सिन्हा आले होते.

‘केंद्र शासनाने मांडलेली वस्तू आणि सेवाकर विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात आले असून विरोधी पक्षांशी अनौपचारिक चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षही हे विधेयक मंजूर करतील असा विश्वास आहे,’ असे मत देशाचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सिन्हा आले होते.
माध्यमांशी बोलताना सिन्हा म्हणाले, ‘वस्तू आणि सेवाकर हा देशाच्या करप्रणालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे देशात समान करप्रणाली लागू होणार असून त्याचा अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांनाही फायदाच होईल. देशांत मुक्त व्यापार वाढल्यास वस्तू आणि सेवांचे दर कमी होऊ शकतील. सध्या विरोधी पक्षांशी अनौपचारिक चर्चा सुरू असून तेही या विधेयकाला पाठिंबा देतील असा विश्वास आहे. त्याचप्रमाणे देशातील बँकांमधील बिगर कामगिरी मालमत्तेची (एनपीए) पाहणी करण्यात येत असून स्टील, साखर आणि वस्त्रोद्योगाकडे अधिक एनपीए असल्याचे आढळून आले आहे. कर्जाची वसुली काटेकोरपणे करण्यात येईल. काळा पैशावर नियंत्रण आणण्यासाठी रोखे व्यवहारावर नियंत्रण आणण्याचे विचाराधीन आहे.’
‘कटकसर आणि विकास यांचा समतोल साधत शाश्वत आर्थिक विकास साधण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. देशातील उत्पादन क्षमता, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन यासाठी आवश्यक आहे,’  असे पदवीदान समारंभात सिन्हा म्हणाले. पदवीदान समारंभाला बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी ८ विद्यार्थ्यांना  सुवर्णपदक, ३८ विद्यार्थ्यांना पीएच डी प्रदान करण्यात आली. या वर्षी ४ हजार ९८१ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, पदविका प्रमाणपत्रे देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Symbiosis convocation