une Porsche Crash Latest Updates : पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात यावी, त्याचबरोबर आरोपी साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला प्रौढ समजून त्याच्याविरोधात खटला चालवला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत आरोपीला जामीन मंजूर केला होता. तसेच अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, असे आदेश दिले होते. याप्रकरणी समाजमाध्यमं आणि लोकांकडून प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासन जागं झालं आहे. पुणे पोलिसांनी अपघाताच्या तीन दिवसांनंतर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह बार मालक (आरोपीने अपघातापूर्वी एका बारमध्ये मद्यप्राशन केल्याचा दावा केला जातोय) आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने सोमवारी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून त्याचे वडील फरार होते. पोलिसांकडून त्यांच शोध सुरू होता. यादरम्यान आज पहाटे त्यांना छत्रपती संभाजीनगर भागातून अटक करण्यात आली. याशिवाय बार मालक आणि त्या बारच्या मॅनेजरलाही अटक करण्यात आली आहे. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असतानाही त्यांनी त्याला मद्य दिले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीविरोधात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे विरोधक राज्य सरकारवर, प्रामुख्याने गृहमंत्रालयावर टीका करत आहेत. राजकीय दबावामुळेच आरोपी मोकाट फिरतोय अशी टीका होत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच राज्य सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी आरोपीने या अपघातापूर्वी एका बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं. त्याचा व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी. पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी. पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे CCTV फुटेज समोर आले आहे. हे फुटेज पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

वडेट्टीवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब चालू होते का? नियम डावलून बार-पब चालू होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे. आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? त्यामुळेच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.