पुण्यात सतत काहीतरी सुरू असतं. चांगलं, सकस असं काहीतरी सतत घडत असतं. पुणं हे एकमेव ठिकाण असेल की इथे पूर्ण दिवस आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वाव असतो. अनेक उत्तमोत्तम ग्रंथालयं, नाटक, गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या चांगल्या संस्था पुण्यात आहेत. त्यामुळे आर्ट फिल्म, कुठे गाण्याचा कार्यक्रम, चित्रप्रदर्शन, व्याख्यान, नाटक असे अनेक उपक्रम पुण्यात रोज सातत्याने सुरू असतात. या सर्व गोष्टींची आवड असलेल्या एखाद्या व्यक्तीचा दिनक्रम हा साधारणपणे सकाळी चित्रपट संग्रहालयात एखादा चित्रपट, नंतर एखादे चित्रप्रदर्शन, दुपारी एखाद्या बुक गॅलरीमध्ये किंवा ग्रंथालयात निवांत पुस्तक वाचणे, संध्याकाळी एखादा गाण्याचा कार्यक्रम किंवा व्याख्यान, रात्री एखादं नाटक असा असू शकतो. अशा सगळ्या आवडीच्या गोष्टी एका दिवशीही करता येऊ शकतात, इतक्या त्या टप्प्यामध्ये असतात. यासाठी कोणताही दिवस चालू शकतो, कारण असं काहीतरी जवळपास रोजच सुरू असतं. एखादा कार्यक्रम नाहीच आवडला, तरी त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमाचा पर्याय समोर असतो. अनेक वेळा नक्की काय पहावं असा गोंधळही उडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे यातले बहुतेक कार्यक्रम हे साधारणपणे परवडणारे असतात. त्यामुळे अगदी प्रत्येक वयाच्या, क्षेत्रातील, माणसाच्या आवडीनुसार त्याच्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. ठरवलं तर पुण्यात एकही दिवस फुकट जाऊ शकत नाही.