पुणे : प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची आई आशा पवार यांच्यासमवेत मतदान केले. यावेळी पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि चिरंजीव पार्थ पवार उपस्थित होते. माझ्या घरात सर्वांत ज्येष्ठ आशा अनंतराव पवार आहेत, आणि माझी आई माझ्यासोबत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे सांगत अजित पवार यांनी सूचक संदेशही दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभेची निवडणूक पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यानंतर प्रचारावेळी कुटुंबात एकटे पाडले जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. पवार कुटुंबातील अन्य सदस्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील बहुतांश सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आई आशा यांच्या समवेत मतदान करून सूचक संदेश दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – शरद पवार यांचे मुंबईऐवजी माळेगाव येथे मतदान

मतदानानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, प्रचारावेळी माझ्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. ही निवडणूक भावकीची नाही तर देशाचे भवितव्य ठरविणारी आहे, असे मी सातत्याने सांगत आलो होतो.

हेही वाचा – बारामतीत पैसे वाटल्याचा, दमदाटी केल्याचा आरोप

चार जूनला निकाल लागल्यानंतर अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील, असे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी त्यांनी वस्तारा घेऊन यावे आणि मिशी काढावी, असे सांगितले.