शेतकऱ्यांची फसवणूक केवळ लहरी पाऊसच करतो असे नाही. व्यवस्थेतील प्रत्येक घटक त्याला कसा नाडवतो, हे तपासायचे असेल तर यवतमाळच्या ताज्या मृत्युतांडवाकडे बघायला हवे. आधी आत्महत्या व आता कीटकनाशकाच्या फवारणीमुळे चर्चेत आलेल्या या जिल्ह्य़ात पिकावरील कीड मरण्याऐवजी शेतकरीच किडय़ामुंगीसारखे मरू लागणे अतिशय वेदनादायी व तेवढेच संतापजनक आहे. अलीकडच्या काळात कृषीक्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले. ते थेट शेतात पोहोचले, पण त्याचा वापर कसा करायचा हेच सांगणारे कुणी नसले की काय होते, हे या मृत्यूंनी दाखवून दिले आहे. कीटकनाशकाच्या फवारणीसाठी देशी पंप वापरला तर दिवसभरात दीड एकर आणि चिनी बनावटीचा पंप वापरला तर दहा एकराची फवारणी होऊ शकते, हे लक्षात आल्यावर शेतकरी या पंपाच्या मागे धावले. मात्र, असे मोठे पंप वापरताना घ्यावयाची काळजी सांगणारे त्यांना कुणी भेटले नाही. ज्या दुकानदारांनी हे पंप विकले त्यांनी नफ्याशी मतलब ठेवला. हीच अवस्था कीटकनाशक औषधांची. ती किती प्रमाणात पाण्यात मिसळावी, याचे गणित ठरलेले, मात्र या प्रमाणात विक्री झाली तर साठा कसा संपणार आणि जास्त विक्रीसाठी असलेली परदेश वारी कशी मिळणार म्हणून विक्रेत्यांनी प्रमाण वाढवायला सांगितले आणि फवारणीच्या नावावर विषाशी खेळणारा शेतकरी मात्र मृत्यूला सामोरा गेला, हेच वास्तव या तांडवाने अधोरेखित केले आहे. अतिशय विषारी असलेल्या या औषधांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कृषी खात्याची, त्याची हाताळणी कशी करायची हे शिवारात जाऊन सांगण्याचे काम याच खात्याचे, ही औषधे सरकारने प्रमाणित केली आहे का, हे बघण्याचे कामही याच खात्याचे. यापैकी एकही जबाबदारी हे खाते पार पाडत नसल्याचे या मृत्युसत्राने दाखवून दिले आहे.  यवतमाळला लागून असलेल्या अकोल्यात राहणाऱ्या कृषिमंत्री फुंडकरांना दौरा करायला वेळ मिळाला नाही. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार व स्वावलंबी मिशनचे किशोर तिवारी आले व त्यांनीच तातडीने भरपाईची मागणी केली. सरकारात सामील असलेले लोकच अशी मागणी करू लागल्यावर शेतकऱ्यांनी जायचे तरी कुठे?  या तांडवाला जबाबदार कोण, या प्रश्नावर विचारच करायचा नाही, त्याच्या मुळाशी जायचे नाही व मदतीचे प्रलोभन दाखवून असंतोष शांत करायचा हा अलीकडे रूढ होत चाललेला प्रकार येथेही दिसणे अतिशय दुर्दैवी आहे. कापसाच्या बीटी बियाण्यांवर कीड पडू शकत नाही, असा दावा नेहमी केला जातो. हे तांडव घडलेल्या यवतमाळात यंदा ९९ टक्के हेच बियाणे वापरले गेले व त्यावर पडलेली कीड १८ जणांचे बळी घेणारी ठरली. यंदा कपाशीचे झाड खूप उंच वाढले. त्यामुळे फवारणी करताना पाइप वर धरावा लागला व त्यातून विषबाधा झाली असे तकलादू स्पष्टीकरण शासकीय यंत्रणा देत आहेत. फवारणी कशी करावी, हे योग्य वेळी सांगितले असते तर अनर्थ टळला असता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील आहोत, असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे त्याला फसवणारी व्यवस्था मात्र तशीच राहू द्यायची, उलट त्याच व्यवस्थेतून फायदा कसा उकळता येईल हे बघायचे, हेच धोरण राज्यकर्ते नेहमी वापरत आले आहेत. म्हणूनच एवढे तांडव होऊनही कुणी व्यवस्थेतील दोष दूर करण्याची वा दोषींवर कारवाई करण्याची भाषा करत नाही, हे वास्तव यातून दिसून आले. आजवर हीच कीटकनाशके प्राशन करून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची उमेद बाळगली आहे, त्यांनाही त्यामुळेच मृत्यू यावा हे अतिशय क्लेशदायक आहे.

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
summer
सुसह्य उन्हाळा!