अनेक दशकांनंतर सौदी अरेबियातील महिलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळाला आहे. अशा प्रकारची परवानगी देणारा हा जगातील शेवटचा देश ठरला आहे. ही एक प्रकारची सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती म्हणायला हवी. पण त्यालाही अनेक पदर आहेत. ज्या सौदीतील महिलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळाला, त्यांना परदेश गमनासाठी पारपत्र मिळत नाही. हॉटेलांमध्ये एकटेही जाता येत नाही. तेथील महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या स्त्रिया आजही तेथील तुरुंगातच आहेत. सौदीमधील प्रत्येक महिलेला एक पुरुष पालक असतो. त्याच्या परवानगीशिवाय तिला कोणतीच गोष्ट करता येत नाही. मग ते हॉटेलात जाणे असो, की पारपत्र मिळण्यासाठीचा अर्ज असो. प्रगत किंवा प्रगतशील देशांमध्ये स्त्रियांना अशा प्रकारचे स्वातंत्र्य पूर्वीच मिळाले असले, तरीही त्यासाठी त्यांना विविध पातळ्यांवर सतत लढा द्यावा लागलाच होता. सौदी अरेबियाचे सध्याचे राजे महंमद बिन सलमान यांच्या प्रागतिक विचारांमुळे हे घडले, हे खरेच. परंतु तेथील महिलांना अजूनही बरेच काही मिळवायचे आहे. त्याची ही सुरुवात. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात वावरता यावे आणि त्यांनाही पुरुषांप्रमाणेच सर्व हक्क असावेत, याची पहिली लढाई त्यांच्या शिक्षणाशी निगडित असते, याचे भान भारतात प्रथम महात्मा जोतिबा फुले यांना आले. त्यांची १८४३ मधील मुलींची पहिली शाळा हा स्त्री विकासाचा पहिला पायाचा दगड. त्यानंतरच्या काळात या शैक्षणिक क्रांतीने जे काही बदल झाले, त्याचाच परिणाम म्हणून भारतीय राज्यघटनेत महिलांना पुरुषांप्रमाणेच मतदानाचाही हक्क मिळाला. कालांतराने महिला घराबाहेर पडून नोकरी करायला लागल्या, यामागे संसाराचे आर्थिक गणितही होतेच. सौदीमध्येही नेमके हेच इतक्या उशिरा का होईना पण घडू लागले आहे. हे असे काही अधिकार मिळाले, म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले, असे नाही, हे अनेकदा लक्षातही येत नाही. सामाजिक जाणिवा रुंदावताना, त्याला अर्थकारणाचा भक्कम पाया मिळत गेला, की त्याचे रूपांतर आपोआपच स्वयंपूर्ण व्यक्तीमध्ये होऊ  लागते. सौदी अरेबियातील महिला आता वाहन चालवू शकतील, पण तरीही त्यांच्या मानेवरील परंपरांचे ओझे पूर्ण उतरलेले नाही. तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात परिसरात जे काही घडते आहे, ते सहजपणे कुणालाही कळण्याची व्यवस्था निर्माण झाली. त्याचाही परिणाम समाजव्यवस्थांच्या बदलास कारणीभूत ठरू लागला. सीरियातील महिलांवरील बलात्काराच्या घटनांमधील क्रौर्य याचमुळे जगापुढे येऊ  शकले. महिलांना केवळ वाहन चालवता येणे, ही सौदीमधील जर महत्त्वाची क्रांती असेल, तर तेथे आणखी किती सुधारणा होणे आवश्यक आहे, हे लक्षात येईल. तेथील राजेशाहीलाच जगातील अन्य विकसित देशांच्या बरोबरीने उभे राहण्याची मनीषा असल्याने हे घडू शकले. तेलाच्या पैशांवर गेल्या काही दशकांत समृद्धी मिळवलेल्या सौदी अरेबियासारख्या देशाला आता नव्या तेल व्यवहारांचे चटके बसू लागले आहेत. त्याचा परिणाम सामाजिक बदलांवर होणेही स्वाभाविकच होते. तरीही तेथे सुरू झालेली स्त्रीमुक्तीची ही सुरुवात स्वागतार्हच म्हटली पाहिजे. शिक्षणापासून ते नित्य व्यवहारांतील छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधील स्वातंत्र्यापर्यंत अनेक पातळ्यांवर हे स्वातंत्र्य झिरपणे महत्त्वाचे असते. भारतातील स्त्रीमुक्तीच्या लढय़ातील मोठा शत्रू पुरुषवर्ग होता. त्यातीलच काहींनी पुढाकार घेऊन स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. सत्तेने दिलेले अधिकार आणि सामाजिक रेटय़ातून मिळालेले तुकडय़ातुकडय़ांचे स्वातंत्र्य यातून घडत आलेले सामाजिक अभिसरण प्रगत देशांना प्रगतिपथावर नेणारे ठरले, हे विसरून चालणार नाही.