Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

नंदा खरे

ही गोष्ट केवळ अंकम्बर या मुलीची नाही, ती तिने पाहिलेल्या समाजाचीही आहे, त्याहूनही ती ‘आज’ची आहे, कदाचित करोनोत्तर ‘उद्या’चीही असू शकते…

‘त्या काळी सगळ्यांना घरांबाहेर जावं लागायचं, अगदी ‘आतल्या’ वर्गातल्यांनाही! लोक एका जागी राहायचे आणि इतर कुठे तरी कामं करायचे. राहायच्या घरांतून कामं करायच्या घरांत जाताना बाहेर मोकळ्या हवेत जावंच लागायचं. हजारो, लाखो माणसं एकमेकांना घासत, एकमेकांच्या चेहऱ्यांवर श्वासोच्छ््वास करत, आणि सामाईक प्रवासी घरांमध्ये स्वत:ला कोंबून घेत, खांद्याला खांदा, छातीला पोट भिडवत जगत असत. सगळं काही सामाईक. गर्दीत जेवायचं, गर्दीत काम करायचं, गर्दीत मनोरंजन करवून घ्यायचं…

अर्थातच त्यांच्यावर पाऊस पडायचा. ते सूर्याच्या उन्हानं भाजून निघायचे… तेव्हाचं उन्हही तीव्र असायचं. माणसांवर विजा पडायच्या. मोकळ्या हवेत श्वासोच्छ््वास केल्यानं रोगही व्हायचे. स्पर्शातून, श्वासांमधून रोग पसरायचेही. सगळेच जण वर्षाचा काही काळ कशानं तरी आजारी असायचे. नाकाचे आजार श्वास घेणंच अवघड करायचे. घशाचे आजार गिळणं अवघड करायचे. पोटाच्या आजारांनी अपचन व्हायचं. डोक्याच्या आजारांनी विचार करणं अवघड व्हायचं.’

कुणाला वाटेल, की वरचे दोन परिच्छेद कोणी तरी कल्पनेने लिहिले आहेत. कल्पना अशी की, करोनासाठी केलेल्या ‘जनता कफ्र्यू’च्या आधीच्या जगाचं वर्णन पूर्णत: टाळेबंदीमध्येच जगलेल्या माणसासाठी केलं जातं आहे; आणि वर्णन चपखल आहे. प्रत्यक्षात वर्णन मायकेल फ्रेन या ब्रिटिश साहित्यिकाच्या ‘अ व्हेरी प्रायव्हेट लाइफ’ या १९६८ सालच्या कादंबरीतलं आहे! लेखक बहुप्रसव आहे. कथा-कादंबऱ्या, समीक्षा, नाटकं, सिनेसंहिता, भाषांतरं अशी ४५ पुस्तकं त्याच्या खात्यावर आहेत. ‘अ व्हेरी प्रायव्हेट लाइफ’चं वैशिष्ट्य हे की, तिथं करोनानंतरचं जग कसं असू शकेल याची एक शक्यता तपशीलवार नेमकेपणानं भेटते.

माणसं जसजशी आर्थिकदृष्ट्या वरच्या-वरच्या वर्गांत जातात, तसतशी त्यांची जगायची पद्धत जास्त-जास्त खासगी होत जाते. ते आपल्यापेक्षा गरीब लोकांना टाळून शक्यतो वरच्या पातळीच्या श्रीमंतांबरोबर राहायचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातल्या सर्व शहरांभोवतीची पंचवीसेक वर्षांत झपाट्यानं वाढलेली फार्म-हाऊसेस् या खासगीपणाच्या गरजेतूनच घडली आहेत. त्यातही उच्च दर्जाची फार्म-हाऊसेस् उंच भिंती, वर काटेरी तारा, दारात पहारेकरी अशा खासगीपणा टिकवणाऱ्या रचनांनी वेढलेली असतात. अनेक पुस्तकं, नाटकं, चित्रपट वगैरेंमधून ‘लायकी नसलेले लोक’ श्रीमंत परिसरांत घुसताना काय होतं याची चित्रणं भेटतात. ‘तीसरी मंझिल’मध्ये शम्मी कपूर, ‘जो जीता वही सिकंदर’मध्ये आमिर खान, ‘पॅरासाइट’मधलं कुटुंब… अशी अनेक उदाहरणं सहज आठवतील.

खासगीपणाबरोबर यांत्रिक मदतीची, तंत्रज्ञानाची गरज वाढते. त्या यंत्रणा-तंत्रणा सांभाळणारी माणसंही लागतात. टाळेबंदीकाळात प्रत्येक मध्यम आणि उच्चवर्गीय इमारतीभोवती भाज्या व किराणा सामान पुरवणाऱ्या माणसांचे गट उभे होते. नगरपालिका, वीज मंडळ, टीव्ही वगैरे सुरू ठेवणारी माणसं, सुरक्षितता देणारे गाडर््स यांच्या कामांत मुळीच टाळेबंदी नव्हती. अर्थात, एक वेगळीही बाब घडली. मध्यम व उच्चवर्गीयांनी या पूरक सेनेची उघड दखल घेतलीच नाही. त्यांच्यासाठी ना दिव्यांची उघडमीट झाली, ना थाळ्या बडवल्या गेल्या, ना पुष्पवर्षाव झाले. अखेर भारतभर अघोषित असे दोन वर्ग घडले : ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’! याचंच एक अत्यंत तीव्र रूप एच. जी. वेल्सच्या ‘द टाइम मशीन’ या विज्ञान कादंबरीत भेटतं. तिथं मानवप्राण्याच्या दोन वेगवेगळ्या उपजाती घडल्या आहेत : कामं करणारे आणि कामाची फळं भोगणारे. पण आत-बाहेर याबाबतीत वेल्सचं जग टाळेबंदीसारखं नाही. एका अर्थी तर उच्च-नीच या अंगानंही ते जग विरुद्ध प्रकारचं आहे. पण एक प्राणिजात दुभंगू शकते, हे मात्र वेल्सही मांडतो.

‘प्रायव्हेट लाइफ’ची गोष्ट तशी साधी आहे. एक अंकम्बर नावाची नुकतीच वयात येत असलेली मुलगी श्रीमंत आतल्या वर्गातली असते. त्या वर्गाच्या आयुष्याचं वर्णन असं येतं : अंकम्बरच्या घरी ती तीन वर्षांची असताना एक पार्सल येतं. तो तिचा धाकटा भाऊ असतो. अंकम्बर आईला विचारते, ‘‘आपल्याला बाळ हवं आहे हे त्यांना कसं कळलं?’’ आई म्हणते, ‘‘तुला आठवत नाही का, बाबांनी आणि मी बाळ घडवायचं सामान त्यांना पाठवलं होतं? चल! आता पार्सल कसं सोडवायचं ते पाहू!’’ पुढे कधी तरी एक वेगळा संवाद घडतो…

‘‘आपण मरतो तेव्हा नेमकं काय होतं?’’

‘‘ते विशेष औषधं देऊन पुन्हा जिवंत करतात.’’

‘‘नाही, खरंच मेलं तर?’’

‘‘बहुधा ते ट्यूबमध्ये घालून तुम्हाला दुसरीकडे पाठवतात.’’

‘‘कोणती ट्यूब? कचऱ्याची?’’

‘‘हो… मला वाटतं.’’

‘‘मग कचऱ्यासारखे आपलेही तुकडेतुकडे होतात?’’

‘‘हो, बहुधा. पण तसं काही व्हायला शेकडो वर्षं आहेत. तू काळजी नको करूस.’’

तर सर्वांची सुरुवात अशी होते आणि शेवट तसा होतो. मधल्या काळात बहुतेक लोक आई-वडील, भावंडं वगैरेंच्या घरांमध्येच राहतात. अगदी बाळपणात आई-वडील शरीरांनी भेटतात. मग मात्र प्रत्येक व्यक्ती सुटी होते. सणासुदीला, सुट्ट्यांमध्ये कुटुंबातले सर्व जण एकत्र ‘होलोव्हिजन’ कक्ष वापरत एकत्र येतात. हे होलो-तंत्र आपल्याकडे वापरून नरेंद्र मोदींनी एकाच वेळी अहमदाबादेत अनेक जागी प्रजेला दर्शन दिलं होतं. अशाच होलो-तंत्रानं पंधरा अंकी टेलिफोनसारखा क्रमांक वापरून लोक एकमेकांना भेटतात, पाट्र्या करतात, वगैरे. पण या सगळ्यामध्ये सान्निध्य शरीरांचं नसून होलो-प्रतिमांचं असतं; आपल्या जगातल्या झूम-स्काइप प्रकारांसारखं. हळूहळू एकटेपणाची, खासगीपणाची इतकी सवय होते की, या भेटीगाठीही जरा जडच जातात. पण अनेकानेक समस्या सोडवायला औषधं उपलब्ध असतात. एकाग्रता वाढवणारी, हसवणारी, सामाजिक करणारी, ताण कमी करणारी अशा बहुउद्देशीय औषधांची फौज समवेत असते. अन्नपाणीही या औषधांसारखं नळांमधून येत असतं; मानवी भेटींची गरज नसते. आणि अंकम्बर असं जगू शकते, कारण ती उच्च अशा आतल्या वर्गातली असते.

तिला त्या आतल्या आयुष्यात समाधान मात्र नसतं. एकदा मुद्दाम अंधार करून भिंती चाचपडताना ती चुकून घराबाहेर पडते. लहानपणी कौटुंबिक होलो-सहलींवर पाहिलेल्या बाहेरच्या जगापेक्षा फारच वेगळं जग तिला ओझरतं दिसतं. पुढे तिच्या होलो-कक्षाचा क्रमांक ‘चुकून’ लागल्यामुळे तिला एक वेगळाच पुरुष भेटतो. तो इंग्रजीत बोलत नसतो, आणि एकूण बोलण्यातून अंकम्बरला त्याचं नाव ‘नोली’ आहे असं वाटतं. त्याचा क्रमांकही तिला कळतो. ती ठरवते की, या मध्यम वयाच्या, टक्कल पडलेल्या, उघडपणे जरा दांडगट असलेल्या, पण प्रेमानं बोलणाऱ्या माणसाचा शोध घ्यायचा. वारंवार अंकम्बर तो चुकीचा क्रमांक फिरवत राहते. दर वेळी वेगळ्या व्यक्ती येतात. एकदा पुरुष, पण बहुतेक बायका. आतल्या वर्गात असं घडू शकत नाही, कारण होलो-क्रमांक एकमेव, युनिक असतो. आता स्वत: त्या क्रमांकापर्यंत जाण्याला पर्याय नसतो. मनाचा हिय्या करून ती घराबाहेर पडते. समवेत ‘नोली’च्या क्रमांकाची एक चिठ्ठीच फक्त.

बाहेर काय दिसतं? ‘अंकम्बर पूर्वीच्या काळाचा विचार करत असे, जेव्हा आकाश राखी नसून निळं असायचं. भयाण काळ, जेव्हा जगाची प्रजा सूर्यप्रकाशानं आंधळी होऊन तहानलेल्या अवस्थेत वाळवंटातून भटकत असे. आज सूर्य फक्त पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या अंतराळ-घरांमधून दिसतो. पण त्या घरांच्या कचऱ्यानं आज खालच्या पृथ्वीवरचा प्रकाश सुदैवानं मंदावला आहे. आज धूर-धूळ, भुगा केलेलं मलमूत्र व कचरा, माणसांचे निकामी अवयव व प्रेतं अशा साऱ्यातून गाळला जाऊनच प्रकाश पृथ्वीवर पोहोचतो. या ‘कचराम्बरा’तले जड कण पृथ्वीवर येता-येताच जळून जातात, तर बारीक कण पृथ्वीवर धुळीची चादर पसरतात.’

…आणि इथे अंकम्बरला पहिले ‘बाहेरचे’ लोक भेटतात. त्यांचा रंग निळा असतो. ते आतल्या लोकांना मदत करणाऱ्या ‘दयाळू’ माणसांपैकी असतात. (आपण म्हणू ‘ते पोलीस असतात’) नोलीचा पत्ता बराच दूरचा असतो. दयाळू लोक अंकम्बरला रॉकेट स्थानकात नेऊन सोडतात. बऱ्याच काळाच्या प्रवासानंतर रॉकेट उतरतं आणि एक वेगळं प्रवासी घर (आपण म्हणू ‘ओला-उबर’) तिला नोलीच्या क्रमांकाजवळ नेऊन सोडतं. इथले सगळे लोक एक वेगळीच भाषा बोलत असतात, जी अंकम्बरला काहीशी समजू लागते. हे एक बंदर असतं, जिथून सागरी वनस्पती ऊर्फ केल्प, मासळी वगैरे गोळा करून ‘आतल्या’ वर्गासाठी अन्न तयार केलं जात असतं. हळूहळू अंकम्बरला ही जगण्याची पद्धत, कुटुंबातले नातेसंबंध वगैरे समजू लागतं. तिचे आणि नोलीचे प्रेमसंबंधही घडतात. पण (आणि अर्थातच!) तिला लवकरच याचाही कंटाळा येतो. ती चालत रॉकेट स्थानक गाठून परत आपल्या मूळ पत्त्याला जायचं ठरवते. पण हे सोपं नसतं. रॉकेट्स कुठून उडताहेत हे आवाजावरून, रॉकेट्स दिसण्यातून ठरवता येतं. तिथे जायची वाट मात्र थेट नसते. बरं, आता अंकम्बरपाशी प्रवासी घरं बोलवायचं कौशल्यही नसतं, त्यामुळे पायीच जावं लागतं. त्या प्रवासात तिला आतले, बाहेरचे, दयाळू वगैरे वर्गांपेक्षा वेगळा माणसांचा गट भेटतो. अखेर घर सोडल्यानंतर वीसेक वर्षांनी अंकम्बर ‘स्वगृही’ परतते. अशा तºहेनं आपली नायिका ‘जान बची लाखों पाये / घर के बुद्दू घर को आये’ अशी, एक पूर्ण समाज पाहून घरी येते.

पुस्तक जेमतेम १३२ पानांचं आहे. पुस्तक आणिकही लहान करता आलं असतं. पुस्तक मोठं असल्याशिवाय समाधान देऊ शकत नाही असं नक्कीच नाही. ऑर्वेलचं ‘अ‍ॅनिमल फार्म’ असंच लहानखुरं, असंच ‘कहाणी’ किंवा ‘फेबल’ प्रकारातलं मानलं गेलेलं आहे. पण असं असूनही मला तरी ‘प्रायव्हेट लाइफ’ असमाधानकारक वाटलं. एक म्हणजे त्यातलं जग कसं ‘जगतं’, त्याची अर्थव्यवस्था कशी आहे, माणसांमधले संबंध कसे घडतात वगैरेंचा उल्लेखही त्यात नाही. ते जग कसं अस्तित्वात आलं, हेही लेखक सांगत नाही.

इथं किम स्टॅन्ले रॉबिन्सन या विज्ञानकथा-युटोपियन साहित्य लिहिणाऱ्याचं एक मत नोंदवायला हवं : ‘What a cheat utopias are, no wonder people hate them. Engineer some fresh start, an island, a new continent, dispossess them, give them a new planet sure! So they don’t have to deal with our history. Ever since More (Sir Thomas More, ‘युटोपिया’चा लेखक) they’ve been doing it : rupture, cleancut, fresh start .’

समाजातल्या कलांची, ट्रेण्ड्सची निरीक्षणं म्हणून मात्र पुस्तक अत्यंत यशस्वी मानायला हवं. वाढत जाणारा ऑनलाइन जगण्याचा सोस… कामही ऑनलाइन आणि खरेदीही ऑनलाइन, या जीवनशैलीत समाजाचा थोडासाच भाग जगू शकतो. त्यांचं ते जीवन घडवायला मोऽऽठ्ठी ऑफलाइन फौज लागते. असा दुभंग समाज टिकाऊ असेल का? मला खात्री नाही. आणि उच्च वर्ग जेव्हा ‘आतला’ होईल तेव्हा पर्यावरणाकडे आपोआप दुर्लक्ष होईल, तेही अगदी तीव्र. प्रदूषण, हवामानबदल सगळंच सुसह््य वाटायला लागेल. नव्हे, प्रदूषणामुळे मंद होणारा सूर्यप्रकाश हे सौभाग्य वाटू लागेल! मानवी रागलोभ, भावभावना, सर्वांवर उत्तर एकच : केमिकल लोचा उत्पन्न करणं. अत्यंत घटकवादी (रिडक्शनिस्ट) विचार हा.

पण या पुस्तकातलं जग प्लेटोशी नातं सांगतं! प्लेटो म्हणत असे की, आपण एका गुहेत बसून बाहेरच्या व्यवहाराच्या सावल्या पाहत असतो. आपलं जगाचं आकलन त्याच दर्जाचं असतं. इथले ‘आतले’ लोकही अशा इलेक्ट्रॉनिक सावल्या पाहतच जगतात. ‘बाहेरचे’, दयाळू, दु:खी वगैरे वर्ग तर केवळ सेवकच.

हे पुस्तक फ्रेननं फार पूर्वी, थेट पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलं. महाराष्ट्रात मात्र फ्रेन माहीत असलाच, तर ‘कोपनहेगन’ या नाटकामुळे माहीत असेल. ‘प्रायव्हेट लाइफ’ युटोपिया म्हणून थोडं असमाधानकारक वाटतं खरं, पण आताचं आपलं जगणं त्यात दिसतं म्हणून ते वाचण्यासारखं आहे.

nandakhare46@gmail.com