‘मराठी ललितलेखकांची व्यथा काय वेगळी आहे?’ असंच ‘द गार्डियन’नं अगदी तक्त्याबिक्त्यांसह दिलेल्या एका बातमीमुळे कुणाही मराठी वाचकाला वाटावं.. फरक तपशिलाचा आणि प्रमाणाचा आहे, इतकंच. पण खिन्नतेचा सूर तोच : १) ललित साहित्याचा खप कमी झाला आहे. २) कादंबऱ्या वा कथांच्या पुस्तकांची किंमतवाढ पुरेशी झालेलीच नाही. ३) म्हणजेच आता, ललित लेखकांवर कमी मानधनात काम करण्याची वेळ येते आहे आणि म्हणून- ४) ज्यांना हे परवडतं, तेच ललितलेखन करतील; त्यामुळे ललित साहित्यातले वैविध्यपूर्ण आवाज कमी होतील.

हे निष्कर्ष ‘आर्ट्स कौन्सिल ऑफ इंग्लंड’नं ‘कॅनेलो’ या डिजिटल प्रकाशनसंस्थेमार्फत करवून घेतलेल्या सर्वेक्षणाअंती काढता आलेले आहेत. पण समजा असं सर्वेक्षण झालं नसतं तरी निष्कर्ष अन्यत्रही प्रत्यक्ष अनुभवता येतात. कुठल्याही ‘लिटफेस्ट’च्या व्यासपीठापर्यंत पोहोचणाऱ्यांतील ‘वैविध्यपूर्ण आवाज कमी’ झाल्याचं चित्र गेल्या सहा-सात वर्षांत भारतातही दिसू लागलं आहेच. ब्रिटिश प्रकाशकांकडून आता ‘आर्ट्स कौन्सिलनंच या परिस्थितीत सरकारकडून ललित साहित्याला सवलती मिळवून देण्यासाठी मोर्चेबांधणी करावी,’ अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. आपल्या ‘साहित्य अकादमी’सारख्या (पण दृश्यकला, संगीत/नाटय़ यांचंही कार्य करणाऱ्या) या कौन्सिलनंही त्या अपेक्षेला अनुकूलता दाखवली आहे.

पण आपल्यासाठी बातमी निराळीच असू शकते.. त्यासाठी या सर्वेक्षणाचा तपशील पाहावा लागेल : ‘काइट रनर’, ‘टाइम ट्रॅव्हलर्स वाइफ’, ‘द लाइफ ऑफ पाय’ यांसारख्या पुस्तकांनी जरी (त्यांच्या-त्यांच्या प्रकाशनवर्षांत) १० लाखांहून अधिक खपाचा आकडा ओलांडला असला तरी गेल्या दोन वर्षांतल्या ‘बेस्टसेलर’ कादंबऱ्यांचा खप खालावतोच आहे, इथवरचा तपशील ठीक. पण ‘खालावला’ म्हणजे किती? २०१६ची बेस्टसेलर  केट अ‍ॅटकिन्सन यांची ‘अ गॉड इन रुइन्स’ हिच्या फक्त १ लाख ८७ हजार प्रती विकल्या गेल्या. ही संख्या २०१५ च्या ‘एलिझाबेथ इज मिसिंग’ (लेखिका- एमा हिली) या ३ लाख ६० हजार प्रति खपलेल्या कादंबरीपेक्षा निम्म्यानं कमी आहे, हे ब्रिटिश प्रकाशकांच्या हतोत्साहाचं कारण.. ते आकडे आपल्यासाठी हताशाजनकच असल्याची बातमी तुमच्या चेहऱ्यावरही वाचता येतेच आहे!