अर्नेस्ट हेमिंग्वे हा लेखक १८८९ साली अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातल्या ओक पार्क गावात जन्मला आणि १९६१ मध्ये त्यानं अमेरिकेतल्या इडाहो राज्यात केचम इथल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पण एवढय़ा सरकारी भासणाऱ्या तपशिलांमुळे तो ‘अमेरिकन लेखक’ ठरतो का? मार्क ट्वेन ते टेनेसी विल्यम्स या लेखकांनी बदलत्या काळातल्या अमेरिकेचं चित्रण केलं, अमेरिकी माणसांचं जगणं आणि त्यांचं भावविश्व जगासमोर आणलं.. त्या अर्थानं तर हेमिंग्वे हा अजिबातच अमेरिकी नाही. त्याच्या कथा/ कादंबऱ्यांतली मुख्य पात्रं अमेरिकन जरी असली, तरी अमेरिकनांसारखी अजिबात वागत नाहीत! म्हणजे उदाहरणार्थ, ‘फॉर हूम द बेल टोल्स’मधला नायक अमेरिकन आहे. पण तो स्पेनमधल्या फॅसिस्टविरोधी बंडखोरांना मदत करणारा आहे आणि त्यात त्याची ससेहोलपटही होते आहे. शिवाय, हेमिंग्वेच्या ज्या ‘ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’ या कादंबरीला ‘नोबेल पारितोषिक’ (१९५४) मिळालं, ती क्युबातच घडते आणि आज ज्याला-ज्याला ‘अमेरिकी’ म्हटलं जातं त्यापेक्षा पार निराळ्याच -किंवा त्याच्या अगदी उलट टोकाच्या- मानवी जीवनाचं दर्शन घडवते. या दोन्ही महत्त्वाच्या कादंबऱ्या अगदी ऐन बहराच्या काळात अमेरिकेपासून दूर क्युबामध्ये राहून हेमिंग्वेनं लिहिल्या आहेत. हवाना या क्युबाच्या राजधानीत हेमिंग्वे आणि त्याच्या चार पत्नींपैकी कितवी तरी पत्नी १९३२ मध्ये पहिल्यांदा आले. हे दाम्पत्य १९३९ पर्यंत वर्षांतला बराच काळ ‘हॉटेल अ‍ॅम्बोस मुंडोस’मध्ये घालवू लागलं होतं. अखेर १९४० साली हवानापासून सुमारे २३ कि.मी. अंतरावर ‘फिन्का व्हिजिआ’ या नावाची मोठी इस्टेटच हेमिंग्वेनं खरेदी केली, तिथं घरही बांधलं आणि मग १९६० पर्यंत पत्नी बदलल्या, तरी हे घर काही हेमिंग्वेनं बदललं नाही.

आजची बुकबातमी या घराबद्दल आहे.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

तब्बल १२ एकरांच्या इस्टेटीतलं हे घर प्रशस्त होतं. अख्ख्या क्युबाला नसला, तरी हवानाला हेमिंग्वे आपल्या इथं राहातो याचा अभिमानच होता. क्रांती १९५३ साली झाली, फिडेल कॅस्ट्रोची साम्यवादी सत्ता आली आणि अमेरिका-क्युबा संबंध अधिक बिघडून युद्ध सुरू होणार की अर्नेस्ट हेमिंग्वेला आयुष्यात त्याआधीही दोन-तीनदा आलेलं घोर वैफल्य (डिप्रेशन) ही या वेळी या नोबेल-मानकऱ्याची मृत्युघंटा ठरणार, अशी स्थिती असताना १९६० मध्ये हेमिंग्वे अमेरिकेत परतला. वर्षभरात आत्महत्येची बातमी येताच कॅस्ट्रोनं हेमिंग्वेचं घर राष्ट्रीय स्मारक घोषित केलं. क्युबात बरंच काही तोवर राष्ट्रीय झालं होतं.. कम्युनिस्ट देशच तो, व्हायचंच. पण यापैकी कुठल्याच राष्ट्रीय मालमत्तेची धड रया राहिलेली नाही, असं दिसायला फार काळ वाट नाही पाहावी लागली. साधारण १९७०च्या दशकापासूनच क्युबाची ओळख एक मळकटलेला देश अशीच पाश्चात्त्यांनी आपल्याला करून दिली आहे, ती उगाच नव्हे. देशातले नागरिक ही सर्वोच्च महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती, तिलाही क्युबातून गळती लागली होती. त्यामुळे हा देश हेमिंग्वेच्या स्मारकाची कितपत बूज राखू शकणार होता? तरीही त्या मानानं क्युबाच्या सरकारनं बरंच केलं, हेमिंग्वेच्या घरासाठी.

याच घरातून तो खाडीवर आणि समुद्रात जाई, स्वत:ची बोट काढून एकटाच भटकंती करी. ‘तुफान वादळात मी बुडत असताना पापा आर्नेस्टोंची लाल छोटी बोट आली, त्यांनी दोर फेकला माझ्याकडे.. तो धरल्यामुळे मी वाचलो,’ असं सांगणारे लोक हवाना पंचक्रोशीत कालपरवापर्यंत होते. ही बोट जशीच्या तशी राखणं, घराच्या आतलं फर्निचर, काचेच्या कपाटांतली पुस्तकं यांवरली धूळ नेहमी झटकणं, पर्यटकांना इथले फोटोबिटो काढू देणं.. एवढं तरी नक्कीच केलं (भारतातली अनेक स्मारकं तरी यापेक्षा निराळं काय करतात?) पण अलीकडेच क्युबाशी अमेरिकेचे व्यापारी संबंध ५५ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू होण्याची घोषणा झाली, मग ओबामा क्युबात आले तेव्हा चित्र पालटू लागलं. या घराचे वासे बळकट होणार अशी सुचिन्हं दिसू लागली!

फिन्का व्हिजिआ फाऊंडेशन या नावाची अमेरिकी संस्था त्यासाठी कामास लागली आहे. तब्बल आठ लाख ६० हजार डॉलर खर्चून या स्मारकाच्या -म्हणजे त्यातल्या प्रत्येक वस्तू आणि अगदी एकूणएक कागदपत्रांच्या- संधारणाचा संकल्प या फाऊंडेशननं सोडला आहे. त्यासाठी निधी मिळवणं, तो ‘अमेरिकी’ निधी क्युबात आणणं आणि क्युबा सरकारच्या ताब्यात असलेल्या या वास्तूमध्ये प्रवेश मिळवून न थांबता, संधारणाच्या कामासाठी या वास्तूजवळच एक कार्यशाळा बांधणं..

हे सारं गेल्या काही महिन्यांत हळूहळू होत गेलं. अखेर गेल्या आठवडय़ात, २० जून रोजी प्रत्यक्ष या घराच्या आवारात संधारणाचं सामान येणार, अशी घोषणा फाऊंडेशननं केली!

एक शक्यता- किंवा भीती अशी की, संधारणाचं काम पूर्ण झाल्यावर मग कार्यशाळेसाठी केलेल्या बांधकामाचा हेतू संपेल, तेव्हा तिथंच ‘स्टारबक्स’, ‘मॅक्डोनाल्ड्स’, ‘केएफसी’ असं एखादं अमेरिकी खानपानगृह, टुरिस्टांची बडदास्त अमेरिकी पद्धतीनं आणि अमेरिकी दरपत्रकानुसार ठेवायला त्यात घुसलेलं असेल. पण अर्थात तोवर, हेमिंग्वेच्या घरातली चार हजार छायाचित्रं, नऊ हजार पुस्तकं आणि असंख्य पत्रं आणि हस्तलिखितं यांचं पुढल्या पिढय़ांसाठी पूर्णत: संधारण झालेलं असेल! अमेरिकेचाच यात फायदा असला, तरी एक मात्र अमेरिकनांनाही कबूल करावं लागेल..

हेमिंग्वे मूळचा अमेरिकन, पण आता क्युबाचाच तो!