ज्ञानदा आसोलकर

‘फसवणुकीच्या काळात सत्य मांडणे हे एक क्रांतिकारी कृत्य आहे,’ असे सांगणाऱ्या जॉर्ज ऑर्वेलवरील ताज्या चरित्रपर पुस्तकाविषयीचे हे टिपण..

जगामध्ये क्वचितच असे काही देश असतील, जिथे जॉर्ज ऑर्वेलचे नाव पोहोचले नसेल. ‘बिग ब्रदर इज वॉचिंग’, ‘डबलस्पीक’, ‘वैचारिक गुन्हेगारी’ या संज्ञा इतक्या बहुचर्चित आहेत, की त्या समाविष्ट असलेल्या साहित्यकृती मुळातून न वाचलेल्यांनाही त्यांची जाण आहे. रिचर्ड ब्रॅडफोर्डलिखित ‘ऑर्वेल : अ मॅन ऑफ अवर टाइम’ (प्रकाशक : ब्लूम्सबरी, पृष्ठे : ३०४, किंमत :  ७०० रुपये) हे चरित्र ऑर्वेलच्या मृत्यूच्या सत्तराव्या वर्षी- म्हणजे यंदा प्रकाशित झालेले त्याचे एक नवे चरित्रपर पुस्तक आहे. ऑर्वेलने समकालीन विश्वाबद्दल काय विचार केला असता आणि त्याचे कोणते पैलू त्याला आवडले नसते, त्यावर लेखकाने लक्ष केंद्रित केले आहे. पुस्तकात ऑर्वेलचा जन्म, शिक्षण, वसाहतवादी सेवा आणि लेखक म्हणून कारकीर्द यांचा शोध परिणामकारकपणे घेतलेला आहे. मात्र, या चरित्रातून आकारास येणारे ऑर्वेलचे चित्र एका लेखकाचे अधिक आहे. अगदी लहान वयातच ऑर्वेलने ‘बाहेरची व्यक्ती’ अशी भूमिका स्वीकारली. उच्चवर्गीय संस्थांचा विरोध, ब्रिटिश साम्राज्यशाहीला कडवा नकार, आर्थिक विशेषाधिकाराचा निषेध, कामगारवर्गाच्या शोषणाविषयीची चीड व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्या कुशाग्र व तीव्र बुद्धिमत्तेचा उपयोग केला.

निबंधकार आणि लेखक अल्ड्स हक्स्ले शाळेत त्याचे शिक्षक होते. बौद्धिकदृष्टय़ा प्रतिभावान असलेला ऑर्वेल या शाळेमध्ये ‘मिसफिट’ होता. उच्च शिक्षण घेण्याऐवजी तो अनपेक्षितपणे भारतीय पोलीस सेवेत सहभागी होण्याचा निर्णय घेतो. या त्याच्या निर्णयासंदर्भात अनेक चरित्रकारांना प्रश्न पडलेला आहे. ऑर्वेलच्या आजीचे बर्मामध्ये वास्तव्य होते. तिच्या घरापासून जवळच्या परिसरामध्ये तो सहा महिने राहिल्याचा उल्लेख एके ठिकाणी आढळतो. बर्मामध्ये जेमतेम २० वर्षांच्या ऑर्वेलने हजारो लोक असलेल्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. येथील पोलीस सेवेमधील प्रत्यक्षदर्शी, काही ऐकीव अनुभवावर आधारित ‘बर्मिज डेज्’ ही कादंबरी त्याने पुढे लिहिली. १९२७ मध्ये जवळपास पाच वर्षांच्या सेवेनंतर ऑर्वेलने डेंग्यू तापाचे कारण देऊन आजारपणाची रजा घेतली. इंग्लंडला परतल्यानंतर वर्षांअखेरीस त्याने नोकरीचा राजीनामा दिला. ऑर्वेलच्या दिसण्यामध्ये आमूलाग्र झालेला बदल त्याच्या कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. तो कृश झाला होता, मिशा राखल्या होत्या, अत्यंत हडकलेला आणि वयापेक्षा दहा वर्षांनी मोठा दिसत होता. ऑर्वेलला मात्र आपला पेहराव, दिसणे याची काहीच फिकीर नव्हती. ऑर्वेलला उभ्या आयुष्यात कधीही भौतिक सुखसोयी किंवा आरामाची चिंता वाटली नाही. लेखक होण्याची इच्छा त्याने जाहीर केली तेव्हा त्याचे आई-वडील दोघेही हादरून गेले. नोकरीसाठी कुठलाही प्रयत्न न करता १९३० च्या दरम्यान ऑर्वेल दिशाहीन आणि अनियोजित आयुष्य जगला. आई अन् बहिणीने त्याच्यासाठी शिकवण्या मिळवल्या. मग जवळपास दोन वर्षे त्याने हायस्कूल शिक्षक म्हणून काम केले. सुरुवातीला त्याने काही लघुकथा लिहिल्या. १९३१ साली ‘एदेल्फि’ या नियतकालिकात त्याने ‘द स्पाइक’ नावाचा लेख लिहिला. ते त्याचे पहिले प्रसिद्ध झालेले लेखन!

मानवी अधोगतीचे पुरावे शोधण्यासाठी ऑर्वेलने अत्यंत हलाखीच्या स्थितीचा अनुभव घेतला. विषमता आणि गरिबी जवळून पाहण्यासाठी त्याने पॅरिसमध्ये भांडी धुण्याचेही काम केले, खाण मजुरांबरोबर कित्येक महिने वास्तव्य केले. ‘डाऊन अ‍ॅण्ड आऊट इन पॅरिस अ‍ॅण्ड लंडन’ ही कादंबरी या सर्व अनुभवांवर आधारित आहे. ती प्रसिद्ध झाल्यानंतर ऑर्वेलने ती आपल्या खऱ्या नावाने लिहिली नाही म्हणून त्याच्या आई-वडिलांना हायसे वाटले. जून १९३६ मध्ये आयलीनशी त्याने विवाह केला. हा त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा काळ होता.

ऑर्वेलच्या आयुष्यातील पुढचे मोठे वळण म्हणजे, त्याने जनरल फ्रॅन्कोच्या हुकूमशाहीविरोधात डाव्यांची साथ देण्यासाठी स्पेनला जाण्याचा घेतलेला निर्णय. स्पॅनिश यादवी युद्धामध्ये ऑर्वेल एक नायक म्हणून समोर येतो. अनेक वेळा त्याने आपला जीव धोक्यात घातल्याचा उल्लेख येतो. विश्वासघाताच्या आरोपामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात येते. पत्नी आयलीनसह तो कसेबसे फ्रान्समध्ये पलायन करतो. ‘आदर्शवाद आणि आंधळी अमानुषता यांच्यातील धूसर रेषा’ यांचे सर्वप्रथम ज्ञान त्याला इथे होताना दिसते. जवळपास एक दशकभर रशियातील स्टॅलिनच्या राजवटीचा अनुभव त्याने घेतला होता. मार्क्‍सवाद आणि साम्यवादी लवचीकतेचा स्वीकार ऑर्वेलने केला. त्याच्या मते, माणसाला जगण्याची आणि विचार करण्याची संधी नाकारणाऱ्या यंत्रणा आणि विचारधारा विषमतेइतक्या क्रूर आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान आणि संपूर्ण युरोपभर हुकूमशाही वाढत असताना त्याने हुकूमशाही शासन, राजकारण, यंत्रणा, विचारधारा यांच्यातील धोके पाहिले. ‘असे होऊ देऊ नका’ असा इशारा त्याने दिला आणि ‘ते तुमच्यावर अवलंबून आहे’ अशी विनवणीही केली.

१९३९ ते १९४५ यादरम्यान ऑर्वेलने विविध साप्ताहिके आणि नियतकालिकांसाठी विपुल लेखन केले. ‘ट्रिब्यून’साठी वाङ्मयीन संपादन करताना असंख्य अप्रकाशित लेखकांना त्याने प्रकाशात आणले. ऑर्वेलने आयुष्यभर अनेक ठिकाणी भ्रमंती केली. परिणामी अनारोग्य त्याला कायमचे चिकटले. फ्रान्समध्ये न्यूमोनियातून १९२९ मध्ये तो मरता मरता वाचला. अनेकदा ब्रॉन्कायटिस आणि कमजोर फुफ्फुसांमुळे तो रुग्णालयात दाखल व्हायचा. जानेवारी १९५० मध्ये वयाच्या ४६ व्या वर्षी फुफ्फुसाच्या क्षयरोगाने त्याचा मृत्यू झाला.

‘अ‍ॅनिमल फार्म’, ‘१९८४’, ‘होमेज टु कॅटालोनिया’ या पुस्तकांतून हुकूमशाही आणि स्टॅलिनवादी हुकूमशाही राजवटींचे केलेले उत्कृष्ट विच्छेदन हे ऑर्वेलचे सर्वात मोठे योगदान. ‘१९८४’कडे ऑर्वेलने भविष्यवाणीऐवजी इशारा म्हणून पाहिले. तो म्हणतो, ‘‘भूतकाळावर नियंत्रण ठेवणारे, वर्तमानावर नियंत्रण ठेवतात.’’ ऑर्वेल इतिहास बदलत नाही; तो चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास तो आपल्याला साहाय्य करतो. एका मित्राला उद्देशून एकदा त्याने लिहिले, ‘‘धर्माध व्यक्तीचा पराभव स्वत: धर्माध बनून नव्हे, तर स्वत:च्या बुद्धिमत्तेचा वापर करून करता येतो.’’ ‘१९८४’मधील विन्स्ट्न स्मिथ म्हणतो, ‘‘स्वातंत्र्य म्हणजे दोन अधिक दोन बरोबर चार हे म्हणण्याचे स्वातंत्र्य. जर ते मंजूर असेल तर बाकी सर्व ओघाने आलेच.’’ ऑर्वेलच्या लेखनात कोणत्याही पक्षीय विचारसरणीच्या पलीकडे जाणाऱ्या सत्याचे अस्तित्व मांडण्याचे धारिष्टय़ आहे. त्याने आपल्या लेखनामध्ये अनेक गोष्टी एकत्रितपणे मांडल्या. काही वैश्विक सत्य समोर आणले. ‘‘फसवणुकीच्या काळात सत्य मांडणे हे एक क्रांतिकारी कृत्य आहे,’’ हे त्यापैकीच एक!

लेखक ऑर्वेलच्या चरित्रातील अप्रिय कंगोरे लपवत नाही. त्याची समलैंगिकता, त्याचा ज्यूविरोध; परंतु ऑर्वेलने ज्यूविरोधातील आपली चूक ओळखली आणि त्याबद्दल पश्चात्तापही केला, असा दाखला लेखक पुस्तकात देतो. तो वारंवार ऑर्वेलच्या आयुष्यातून वाचकांना सद्य:स्थितीमध्ये आणताना समकालीन संदर्भात्मीकरण करताना दिसतो. ब्रेग्झिट, बोरिस (जॉन्सन) आणि ट्रम्प यांचा उल्लेख पुन:पुन्हा येतो. हार्वे वेइन्स्टाइन, #मी टू चळवळ आदी उल्लेख अनेकदा येतात.

लेखक म्हणतो, ‘ऑर्वेल आमच्या काळाचा लेखक आहे. कारण त्याने आपल्या साहित्यातून मांडलेले आणि हाताळलेले मुद्दे कालातीत आहेत.’ हे वाचून ऑर्वेल ‘आमच्या काळाचा लेखक’ आहे की सर्वकाळचा लेखक आहे, असा प्रश्न मनात येतो. ऑर्वेलचे साहित्य वाचलेले वाचक पुस्तकाच्या शीर्षकापासूनच लेखकाशी सहमत होतील; कदाचित यावर वादविवादाचा प्रश्नच येत नाही, असाही विचार त्यांच्या मनात येईल. एक निश्चित, परिपूर्ण असे चरित्र म्हणून न पाहाता, ऑर्वेलचे विचार आज कसे प्रासंगिक आहेत हे सांगणारे म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

लेखिका अनुवादक आणि बालसाहित्यिक असून इंग्रजीचे अध्यापन करतात.

dnyanadaa@yahoo.co.in