एकदा दोन साधक दुचाकीवरून चालले होते आणि एकदम एक मांजर रस्त्यात आडवी आली.  दुचाकी चालवणारा साधक थोडा बावचळला आणि मांजरानं रस्ता कापण्याआधी, अर्थात मांजर आपल्याला आडवं जाण्याआधी आपणच पुढे जावं, या हेतूनं त्यानं दुचाकीचा वेग कमालीचा वाढवला. थोडक्यात काय, तर मांजर आडवं गेलं तर मनात योजलेलं कार्य सिद्धीस जात नाही, हा या दुचाकीस्वाराच्या मनातही खोलवर रूजलेला सुप्त समज जागा झाला! आता माणसानं रस्ता कापला तर चांगलं होत नाही, अशी काही ‘अपशकुन कल्पना’ मांजराच्याही डोक्यात असते की काय, कोण जाणे! कारण दोघं रस्त्यात एकमेकांसमोर आले की रस्ता आपणच आधी ओलांडावा, या ईष्र्येनं जणू दोघांमध्ये चपळाई कमालीची वाढते! आताही असंच झालं. रस्ता आधी आपणच कापावा, यासाठी हा दुचाकीस्वार साधक आणि ते मांजर या दोघांमधली चपळाई वाढली. तेव्हा या दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेला त्याचा साधक मित्र हसून म्हणाला, ‘‘अरे जाऊ दे..  आधी त्या मांजराला जाऊ दे.. या जगात आपलं काही कामच नाही!’’ तर मांजरानं आपला रस्ता कापणं हा अपशकुन मानला जातो आणि विशिष्ट डोळा फडफडणं, अमुक एखादी गोष्ट नजरेस पडणं, स्वप्नात विशिष्ट गोष्ट दिसणं या गोष्टींना शकुन मानलं जातं.. आणि या देशात हे शकुन-अपशकुन एका धर्मापुरते नाहीत बरं! हे काही पारंपरिक समज धर्म, पंथ, जातींच्या भिंती ओलांडूनही नांदत आले आहेत.. आणि म्हणूनच जो अध्यात्माच्या मार्गावर प्रामाणिक वाटचाल करू इच्छितो त्यानं तरी मनातल्या या शकुन-अपशकुनाच्या कल्पना हळूहळू ओलांडल्या पाहिजेत. त्या साधकमित्रानं ‘या जगात आपलं काही कामच नाही,’ या शब्दांत हेच सुचवलं की या भौतिक जगात एका सद्गुरू आज्ञापालनापलीकडे खऱ्या साधकाचं असं काय काम आहे? कारण त्याच्या आज्ञा या शुद्ध ज्ञानाचीच शिकवण देणाऱ्या आणि शिष्यातला संकुचितपणा घालवणाऱ्या असतात. त्याचं खरं हित साधणाऱ्या असतात. त्या आज्ञेचं पालन करण्याची जर खरी इच्छा असेल, तर मग त्या आज्ञापालनरूपी कर्तव्यकर्माच्या आड येण्याची ताकद आणि हिंमत या जगात कोणातही नाही! मग बिचाऱ्या मांजराची काय कथा! पण हे नुसतं सांगून भागत नाही. मग त्या शकुनालाच वेगळं रूप दिलं तर? संत सेना महाराजांचा एक अभंग त्याच दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. हा अभंग असा आहे:

हाचि माझा शकून।

हृदयीं देवाचें चिंतन।। १।।

होईल तैसें हो आतां।

काय वाहूं याची चिंता।। २।।

पडियेली गांठी।

याचा धाक वाहे पोटीं।। ३।।

सेना म्हणे हीनपणें।

देवा काय माझें जिणें।। ४।।

अनेकांना पटकन वाटेल की, हा अभंग चुकला आहे की काय? कारण वरील अभंगाचा पहिला चरण वाचत असतानाच अनेकांच्या कानात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी गायलेला, ‘अवघा तो शकुन, हृदयी देवाचें चिंतन,’ हा अभंग रूंजी घालू लागला असेल. तर तो अभंग वेगळा आहे. तो श्रीतुकाराम महाराज यांचा अभंग आहे आणि त्या अभंगाचा मागोवासुद्धा आपण या अभंगानंतर घेणार आहोत. पण प्रथम संत सेना महाराजांचा अभंग पाहू.

चैतन्य प्रेम