अनाग्रही असणं, ही साधकासाठीची जणू अट आहे. आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक वागण्यात आग्रहीपणा असतो. अगदी दुराग्राहीपणा म्हणा हवं तर! आणि हा आसक्तीतून उत्पन्न झालेला आग्रह असतो. तेव्हा जीवन जसं आहे तसं प्रथम स्वीकारता आलं पाहिजे. याचा अर्थ जीवन बदलायचा प्रयत्न करायचा नाही, असा नव्हे. पण जीवनात नेमका काय बदल करायला हवा, हे तरी आपल्याला नेमकेपणानं कुठं कळतं? त्यामुळे त्यासाठीही गुरूबोधाचा आधार हवाच. तर आधी जसं जीवन आहे तसं स्वीकारणं म्हणजे काय? तर माझ्याच वाटय़ाला इतका त्रास का, इतका अन्याय का, इतकं दु:खं का, या विचारानं निराशेच्या गर्तेत कोसळायचं नाही. हा जीवनाचा स्वीकार आहे. जीवनाला सामोरं जाणं आहे. जेव्हा जीवन जसं आहे तसं स्वीकारू, त्याला सामोरं जाऊ तेव्हाच त्यात जो बदल करायला हवा, तो नेमका कोणता, हे जाणून घेण्याच्या प्रक्रियेकडे वळता येईल. मग माझ्याच जीवनात इतकं दु:खं का, हा प्रश्न न उरता, जीवनात दु:खं का, या मूळ प्रश्नाकडेच लक्ष जाईल. माणसाच्या जीवनात खरं सुख असं काही आहे का आणि असलं तर ते कसं प्राप्त होईल, हा विचार मनात सुरू होईल. त्यासाठी सद्ग्रंथांचं अर्थात संतबोधाचं वाचन सुरू होईल. मनन, चिंतन आणि आचरण या त्या वाचनाच्या पुढच्या पायऱ्या मग दिसू लागतील आणि त्यांच्याकडे पावलं वळूही लागतील. अर्थात वाचनाच्याही मर्यादा असतात. नुसतं वाचून आणि आपल्या आकलनानुसार मनन-चिंतन करीत राहून काही साधत नाही. त्या मनन, चिंतन, धारणेला दिशा देणारा सद्गुरू जीवनात यावाच लागतो. नाहीतर नुसत्या शाब्दिक ज्ञानातच अडकणं होतं. ‘साधक सोपान’ या पुस्तकात डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ पू. काका सांगतात की, ‘‘आत्मा कर्ता नाही आणि जो अकर्ता असतो तो कधीच भोक्ता नसतो, असं शास्त्र सांगते. शास्त्रावर परिपूर्ण श्रद्धा ठेवणे नेहमी हिताचे असते कारण शास्त्र आपल्या हिताचाच उपदेश करते. शास्त्र म्हणजे परोक्षज्ञान. त्याची पूर्णपणे माहिती करून घेणे आवश्यक आहे आणि फळ मिळाल्यानंतर शास्त्र विसरणेही आवश्यक आहे. वेदान्तशास्त्र, गीताशास्त्र, ब्रह्मसूत्र, उपनिषदे, संत वाङ्मय वगैरे सर्व ग्रंथ विचार कसा करावा हे  शिकवतात. ती मोक्षाची साधने आहेत, मोक्ष नाहीत. शास्त्र विसरले नाही तर मनुष्य शास्त्री बनून राहतो.. शास्त्र सांगते की आत्मा कर्ता नाही आणि तू आत्मा आहेस. शास्त्रावर शंभर टक्के श्रद्धा ठेवून आपण निर्णय करावयास हवा की मी कर्ता नाही. जोवर अनुभवाने आत्म्याची झलक मिळत नाही तोपर्यंत शास्त्रावरील शंभर टक्के श्रद्धेशिवाय आपल्याजवळ दुसरा उपाय नाही. श्रीज्ञानेश्वर महाराज ग्वाही देतात की कर्तेपणाच्या भावनेतून निर्माण झालेले हे प्रपंचाचे ओझे उतरवून टाकले की, अखंड चित्तवृत्ती त्या परमात्म्याच्या ठिकाणी ठेवण्यास निश्चित मदत होईल.’’ या परिच्छेदातही अनेक महत्त्वाच्या संकल्पनांना स्पर्श केलेला आहे. आपण संक्षेपानं त्याचं सार जाणून घेण्याचा प्रयत्न करू. शास्त्र काय सांगतं तर आपण आत्मा आहोत आणि आत्मा हा कर्ता नसल्यानं आपण कर्तेपण घेऊ नये! आणि या सगळ्याचा अंतिम हेतू पू. काकांनी अगदी स्पष्टपणे सांगितला आहे आणि तरी तो पटकन लक्षात येत नाही. हा हेतू म्हणजे, ‘परमात्म्याच्या ठिकाणी चित्तवृत्ती ठेवणे!’ त्याची सुरुवात आहे आपण आत्मा आहोत, या धारणेपासून.. की जो आत्मा या घडीला तरी कल्पनावत वाटतो!

– चैतन्य प्रेम