‘‘गेमिंग उद्योगा’ला नियमनाची गरज नाही-  पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या ‘गेमर्स’शी संवाद’ ही बातमी (लोकसत्ता- १४ एप्रिल) वाचली.  पंतप्रधानांचे ऑनलाइन गेमिंगबाबतचे हे मत धक्कादायक आहे. अशा गेमिंगचे व्यसन लागले तर व्यक्तीचे आयुष्य बरबाद होऊ शकते हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. भरभराट व्हावी म्हणून हा उद्योग नियमनाबाहेर ठेवला पाहिजे असे असेल तर हाच न्याय अन्य उद्योगांना का नाही लावला जात? या गेमिंगने नेमका कोणाचा विकास/भरभराट होणार आहे? तूर्तास जरी अनेक गेम जुगारमुक्त असले तरी नंतर त्यात जुगार शिरणार नाही कशावरून? सध्या मोबाइलवर ल्युडो गेमची  जाहिरात क्रिकेटपटू हरभजनसिंग व अन्य जोरात करत आहेत. फक्त एक रुपयात खेळायला सुरुवात करून लाखो रुपये कमवा अशा स्वरूपाची जाहिरात आहे. हा जुगार आहे. ऑनलाइन गेममध्ये कसलेही शारीरिक आणि मानसिक कौशल्य विकसित होत नाही. फक्त यात व्यसन लागण्याची शक्यता आहे किंवा आर्थिक जोखीम आहे म्हणून जबाबदारीने खेळा, अशी सूचना टाकली की, मग अशा गेम्सना नियमनाची आवश्यकता नाही असे म्हणायचे का? उलट हे गेमिंग क्षेत्र जास्तीत जास्त नियमनात कसे राहील हे पाहणे आवश्यक आहे. कारण या ऑनलाइन गेम्समध्ये कोणतेही शारीरिक अथवा मानसिक कौशल्य विकसित होत नाहीच, पण उलट व्यक्ती मानसिकरीत्या दुर्बळ होऊ शकते, हे निश्चित. पब्जी गेमने घेतलेले बळी अजूनही लोकांच्या स्मरणातून गेले नसतील. -अशोक साळवे, मालाड (मुंबई) [संदेश शंकर बालगुडे, घाटकोपर (मुंबई) यांनीही अशा आशयाचे पत्र पाठवले होते.

त्या आणीबाणीतून सुटका तरी झाली!

‘आपले प्रश्न आणि निवडणूक!’ आणि ‘मतदार राजा जागा हो..!’ हे दोन्ही लेख (रविवार विशेष- १४ एप्रिल) वाचले. ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य सुविधा, एसटी- वाहतूक यांची आजची स्थिती निश्चितच आशादायी नाही. शहरवासीयांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावर लोकप्रतिनिधींनी गृहनिर्माण संकुलात पेव्हर ब्लॉकच्या मलमपट्टीचा उतारा शोधलेला दिसतो आहे. तर, दुसरा लेख मतदार राजा जागा झाल्यास काय करू शकतो याची महती विशद करतो. आणीबाणीच्या काळातील निवडणुकांच्या वेळी तुरुंगात डांबून ठेवलेल्या विरोधी पक्षीय नेत्यांची सुटका झाली होती, असा लेखात उल्लेख आहे. आजच्या काळातील विरोधी पक्षीयांना केव्हा ‘ईडी’ अटक करील या भीतीने ग्रासलेले दिसते. इंदिराजींनी आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून आपली छबी जनतेसमोर सतत राहावी याची काळजी घेतली. आज ते अधिक मोठय़ा प्रमाणावर दिसते आहे. १९७७ च्या निवडणुकांत दुर्गाताई भागवत, पु. ल. देशपांडे यांचा मतदाराला जागवण्यात फार मोठा हातभार लागला. १९७७ सालात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान झाल्यापासून मतमोजणीपर्यंत मतपेटय़ांचे संरक्षण केल्याचे दिसले. आता मोदींनी निवडलेला निवडणूक आयोग परिस्थिती कशी हाताळतो हे पाहावे लागेल.-शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

विरोधकांनी ‘आणीबाणी’ विसरू नये!

‘मतदार राजा जागा हो..’ हा लेख वाचला. भारतीय जनता कधीकधी भावनेवर स्वार होऊन मतदान करते, पण जर सत्ताधारी योग्य कारभार करत नसतील तर त्यांना सत्तेबाहेरही करते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मोदींना तानाशाह म्हणताना त्याला १९७५-७७ ची भारतातील आणीबाणीची पार्श्वभूमी आहे हे विरोधकांनी विसरता कामा नये. त्याचप्रमाणे सामान्य जनता आता पूर्वीसारखी दुधखुळी राहिली नसून व आदल्या दिवशी होणाऱ्या वाटपाने भुलून जाणार नाही हे नक्की. गरज आहे, ती प्रत्येकाने आवर्जून मतदान करण्याची! -माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

रोजगार, उद्योग, महागाई, शेतकरी..

आजवरच्या निवडणुकांचे वास्तव मांडणारा ‘मतदार राजा जागा हो..!’ हा सतीश कामत यांचा लेख वाचला. पण या वेळेला सर्वसामान्य जनता व मतदार संभ्रमावस्थेत आहेत. एकूणच मागील दोन-तीन वर्षांमधील राजकीय परिस्थिती,  हरवत चाललेला राजकारणामधील सुसंस्कृतपणा, आरोप- प्रत्यारोप, बेताल वक्तव्ये, सत्ता-खुर्चीची समीकरणे जुळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची लागलेली स्पर्धा, यातून तरुणांना रोजगार/ उद्योग/ महागाई/ शेतकरी यांसारख्या विषयांच्या अजेंडय़ावर कोणीही पोटतिडकीने बोलताना दिसत नाही. -पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली

गुप्तचरांमुळे आणि त्यांच्याविना यश..

‘सियाचीनचा सांगावा..’ हे संपादकीय वाचताना भारतीय लष्कराच्या यापूर्वी  ऐकायला न आलेल्या एका शौर्यगाथेमुळे, अंगावर रोमांच उभे राहिले. मुख्य म्हणजे ‘२६/११ सारख्या घटना घडल्या त्या आपली गुप्तहेर संघटना कमी पडली म्हणून’ असे म्हटले जाते. पण या वेळी तिने आगाऊ दिलेले संदेश व त्यावर त्वरित केलेली कारवाई, यांमुळे यश मिळण्यास फार मोठी मदत झाली असणार! ही घटना घडली विसाव्या शतकात, दळणवळण नि संदेशवहनाची अत्याधुनिक साधने उपलब्ध असताना! पण १८व्या शतकात, शिवाजी महाराजांच्या बहिर्जी नाईकांसारखा उत्कृष्ट गुप्तहेर हाताशी नसूनही पहिल्या बाजीरावाने निजामावर जो हर्षवर्धक विजय मिळविला, तोही रोमहर्षक. या लढाईबद्दल एल. के. कुलकर्णी यांनी ‘भौगोलिक बुद्धिबळ’ लेखात विस्ताराने, सांगोपांग  सांगितल्यामुळे बाजीराव यांची प्रत्येक चाल नि त्यामागचे हेतू/गणित नीट समजते व त्यांच्याबद्दल अधिक अभिमान वाटतो.-श्रीधर गांगल, ठाणे</p>

१९७१, १९६२, २६/११ नाकर्तेपणा पाहा!

‘सियाचीनचा सांगावा’ (१३ एप्रिल) हे संपादकीय वाचले. सन १९८३ मधले ‘ऑपरेशन मेघदूत’ कदाचित कुणाला माहीत नसेल. काँग्रेस या गोष्टीचे भांडवल करत नाही-  हा त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा की नाकर्तेपणा हे कळायला मार्ग नाही. कदाचित अशा अनेक गोष्टी असतील ज्या अजून कुणाला माहीत नसाव्यात. पण १९७१ मध्ये आपल्या सैन्याने पकडलेले ९० हजार पाकिस्तानी युद्धकैदी आपण अगदी उदारपणे सोडून दिले, चीनयुद्धात (१९६२) आपण गमावलेला भूभाग हा काँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा! अगदी अलीकडील २६/११ चा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याला ‘तत्कालीन सरकारने न दिलेले उत्तर’ याचाही उल्लेख संपादकीयात झाला असता तर बरे झाले असते. -डॉ संजय पालीमकर, दहिसर पूर्व (मुंबई)

काँग्रेसने पक्षीय दृष्टिकोन ठेवला नाही

आज जिकडे तिकडे जो तो आपल्या कणभर कर्तृत्वाला हिमालयाएवढे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना, भारतातील पूर्वीच्या राजकारणी आणि विचारवंतांनी स्वत:साठीच काही नियम घालून घेतलेले होते आणि त्यातीलच काही नियम होता- देशाच्या सार्वभौम आणि सुरक्षेच्या बाबतीत पक्षीय राजकारण असणार नाही! त्याचमुळे स्वतंत्र भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत कितीतरी अशा घटना आहेत की ज्यांना पक्षीय दृष्टिकोनातून बघितले जात नसून देशकार्य म्हणूनच बघितले जाते. त्याचमुळे काँग्रेसने कधीही आम्ही बांगलादेश स्वतंत्र करून दाखवला हे म्हणून छाती बडवली नाही. ‘लोकसत्ता’ने ‘सियाचीनचा सांगावा’ या संपादकीयातून वाचकांना, देशाप्रति असणाऱ्या मूल्यांच्या बाबतीतली जी काही अलिखित तत्त्वे आहेत त्याबद्दलही जाणीव करून दिली आहे- प्रसारमाध्यम म्हणून लोकसत्ता करत असलेले काम आजघडीला, ‘अमावास्येच्या काळय़ा रात्री एका छोटय़ाशा काजव्याचे अस्तित्व हे, दिवसा तळपणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त महत्त्वाचे.. कारण तो त्याचे काम गरजेच्या वेळी इमाने इतबारे करत असतो’ या वचनाची आठवण देणारे आहे! -प्रा. डॉ. अजित नगरकर (नाशिक)

हे नुकसान दहशती हल्ल्यापेक्षाही..

‘तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचे तांडव’ (लोकसत्ता- १४ एप्रिल ) ही बातमी वाचली. अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर हानी घडवणारी ही नैसर्गिक संकटे टाळण्यासाठी कृती कार्यक्रम आखणे खूप महत्त्वाचे आहे. वातावरणीय बदलांशी मुकाबला करणे ही काळाची गरज बनली आहे. पुढल्या काळात परिस्थिती अजून भयावह होऊ शकते, हे ओळखून आताच काळजी घेणे जरुरी आहे. एखाद्या दहशतवादी हल्ल्याने जेवढी हानी होत नसेल त्याच्या कैकपट हानी अशा नैसर्गिक संकटाने होते. म्हणूनच या समस्या निवारणाला अग्रक्रम द्यायला हवा. सध्याचे संकट तेच सांगत आहे. -ऋषिकेश निना घोगले, नळकुंड (बुलडाणा)