मालदीवच्या निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसने (पीएनसी) विरोधी पक्ष माल्दिव्हियन डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) पार धुव्वा उडवला आहे. एमडीपी हा भारताच्या बाजूने झुकणारा पक्ष. त्यामुळे त्या पक्षाचे सत्तेत येणे भारतासाठी भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. हिंदी महासागरात असलेले मालदीवचे मोक्याचे स्थान जागतिक व्यापार आणि सामरिकदृष्ट्याही कळीचे आहे. असे असताना ‘एमडीपी’चा पराभव होऊन चीनधार्जिण्या ‘पीएनसी’चा मोठा विजय भारतापुढे आव्हाने निर्माण करणारा आहे. ‘पीएनसी’ सत्तेत आल्याने हिंदी महासागरात आणखी हात-पाय पसरविण्यासाठी टपून बसलेल्या चीनला नक्कीच आनंद झाला असणार. तसेही सहा महिन्यांपूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून मालदीवचे अध्यक्षपद पटकावलेले भारतद्वेष्टे मुईझ्झू मोठा चर्चेचा विषय बनून राहिले होतेच. आता त्यांच्या पक्षाच्या कायदे मंडळातील विजयामुळे त्यांचे हात आणखी भक्कम झाले आहेत.

गेल्या नोव्हेंबरमध्ये अध्यक्ष झाल्यापासून मुईझ्झू यांची भारताबद्दलची उफराटी वक्तव्ये वेळोवेळी गाजली. भारताने त्याला संयत उत्तर दिले. मालदीवमध्ये झालेल्या या बदलानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. मालदीवमध्ये चीनचा पाहुणचार वाढला, तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी लक्षद्वीप मोक्याचे ठिकाण आहे. त्या दृष्टीनेही या भेटीची वेळ महत्त्वाची होती. पंतप्रधानांनी त्यांच्या भेटीत देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचे आवाहन केले आणि ‘पर्यटनासाठी मालदीवला पर्याय लक्षद्वीप’ असा एक अघोषित ‘ट्रेंड’ सुरू झाला. मालदीवच्या पर्यटनात सर्वांत मोठा वाटा असलेल्या भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवल्यानंतर मुईझ्झू जरा नमते घेतील असे वाटले होते, पण ते भलतेच बिलंदर निघाले. ते लगेच चीनच्या दारात गेले आणि मालदीवला चिनी पर्यटन जोमाने वाढेल, असा ‘शब्द’ घेऊन आले. तसे झालेही. अर्थात, भारतासंदर्भात केलेल्या वक्तव्यांबाबत त्यांना नंतर एक पाऊल मागेही यावे लागले होते. ‘कोणताच देश माझ्यासाठी शत्रू नाही,’ अशी सारवासारव त्यांना करावी लागली होती. असे असले, तरी आत्ताच्या निवडणुकीत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने ‘इंडिया आउट’ ही मोहीम जोरदार चालवली होती. ‘भारतावरील अवलंबित्व कमी करणे हा माझ्या धोरणांचा एक भाग असेल,’ असे त्यांनी अध्यक्ष झाल्यावर घोषित केले होत. ते पालुपद त्यांनी कायम ठेवले आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth president mohamed muizzu people national congress wins maldivian elections amy
First published on: 24-04-2024 at 04:52 IST