सन २०२४ मध्ये जगभरातील काही देशांमध्ये सार्वत्रिक किंवा अध्यक्षीय निवडणुका होत आहेत. भारत, अमेरिका, तैवान, पाकिस्तान अशी नावे याविषयीच्या चर्चेत सातत्याने घेतली जातात. पण या यादीत आणखी एक नाव आहे बांगलादेशचे. त्या देशात इतर बहुतेक देशांच्या आधी म्हणजे जानेवारीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पण देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यामुळे या प्रक्रियेची समावेशकता आणि पारदर्शिता याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सत्तारूढ अवामी लीगने बांगलादेशात दमनशाही अंगीकारली असून, काळजीवाहू सरकार स्थापण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत नि:पक्षपाती निवडणुका होणे शक्यच नाही. त्यामुळे त्यांत भाग न घेतलेलाच बरा, अशी बीएनपीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षांत आर्थिक आघाडीवर बांगलादेशने आशादायक कामगिरी केली असली, तरी एक प्रगल्भ लोकशाही बनण्याच्या दिशेने या देशाचा प्रवास अजूनही अडखळत सुरू आहे.

हेही वाचा >>> पहिली बाजू : काँग्रेसने टीकेपेक्षा टक्क्यांकडे पाहावे!

Prithviraj Chavan, pm modi,
“..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
Bhatrihari Mahtab recently joined the BJP after leaving the Biju Janata Dal
भाजप – बिजद यांच्या मैत्रीपूर्ण संघर्षांत कुणाची सरशी?

सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचा परस्परांवर अजिबात विश्वास नसेल, तर अशी अवस्था देशातील एकूण लोकशाहीसाठी मारकच ठरते. बांगलादेशच्या निर्मितीपासूनच या देशाविषयी भारताला साहजिक ममत्व वाटत आले आहे. पण बांगलादेशातील लष्करशहा किंवा निर्वाचित सरकारांनी प्रत्येक वेळी या भावनेची परतफेड केली आहे, असे नव्हे. भारताचे परराष्ट्रकारण बांगलादेशनिर्मितीनंतरही पाकिस्तानकेंद्री राहिले ही पहिली तक्रार. अलीकडे काही वर्षांमध्ये विशेषत: ईशान्य भारतात बांगलादेशातून येणाऱ्या स्थलांतरितांच्या मुद्दयावरही दोन देशांमध्ये काही वेळा तणावाचे प्रसंग येत राहिले. पण सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाचे ते काही कारण नाही. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणूक तटस्थ आणि काळजीवाहू सरकारच्या देखरेखीखाली घ्यावी अशी बीएनपीची मागणी आहे. यासाठी अवामी लीगने सत्ता सोडली पाहिजे, असे विरोधकांना वाटते. यासाठी सन १९९६ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीचा दाखला दिला जातो. त्या वेळी बीएनपी सत्तेत होते आणि अवामी लीग विरोधात होते. अवामी लीगने रेटलेल्या आग्रही मागणीवरूनच बीएनपीने घटनादुरुस्ती केली आणि निवडणूकपूर्व काळजीवाहू सरकारची संकल्पना अस्तित्वात आली. पण २०११ मध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीच्या दुरुपयोगाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अवामी लीग सरकारने ती तरतूदच रद्द केली. बीएनपीने याला विरोध केला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या बऱ्यापैकी भारतमित्र मानल्या जातात. याउलट बीएनपीच्या नेत्या बेगम खालिदा झिया या पंतप्रधान असताना भारताबरोबर त्यांचे काही मुद्दय़ांवर स्पष्ट मतभेद असल्याचे दिसून आले होते.

शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने आर्थिक आणि मानव विकास आघाडीवर बऱ्यापैकी प्रगती केली आहे. दरडोई देशांतर्गत उत्पन्नाच्या (पर कॅपिटा जीडीपी) निकषावर या देशाने भारतालाही मागे सोडले आहे. भारत वगळता दक्षिण आशियातील इतर देश आर्थिक आणि राजकीय आघाडय़ांवर अस्थिर होत असताना, बांगलादेश त्यास निश्चितच आदर्श अपवाद ठरला होता. शेख हसीना यांच्या सरकारने निर्धारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक बांगलादेशात मूळ धरू लागलेल्या जिहादी प्रवृत्तींना उखडून टाकले आहे. तरीही त्यांच्या विरोधात विशेषत: विरोधकांमध्ये मोठा असंतोष आहे आणि त्यांनी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हसीना-समर्थकांबरोबरच खालिदा-समर्थकांकडूनही या पेचप्रसंगी भारताने आपली बाजू घ्यावी, अशी मागणी होत आहे. भारताने त्या मार्गाने जाणे टाळलेलेच बरे. दक्षिण आशियातील हा देश अनपेक्षितरीत्या जगातील महासत्तांच्या चर्चेत आणि धोरणात येऊ लागला आहे. खालिदा झिया यांना अमेरिकेचे व्यक्त आणि छुपे अशा दोन्ही प्रकारचे समर्थन असल्याचा आरोप केला जातो. बांगलादेशात नि:पक्षपाती आणि मुक्त निवडणुका झाल्याच पाहिजेत, अशी आशा त्या देशातील अमेरिकी राजदूतांनीच व्यक्त केली. अमेरिकेच्या या भूमिकेला रशियाकडून विरोध झाला. विशेष म्हणजे चीन आणि भारताकडूनही शेख हसीनांची बाजू घेतली जाते आणि अमेरिका व इतर पाश्चिमात्य राष्ट्रे खालिदा झियांप्रति सहानुभूती बाळगतात अशी विभागणीही काही विश्लेषकांनी केलेली आहे. अशा प्रकारे महासत्तांहातचे खेळणे बनणे बांगलादेशसाठी हितावह नाही. शिवाय या साठमारीत आपण गुंतण्याचे काही प्रयोजन नाही. त्या देशामध्ये चीननेही हातपाय पसरायला सुरुवात केलेली असली, तरी त्यांचा उद्देश निव्वळ व्यापारी-सामरिक स्वरूपाचा आहे. याउलट भारताच्या बांगलादेश संबंधांना आणि मैत्रीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान आहे. शिवाय तीस्ता पाणीवाटप करार, भारत-बांगलादेश रेल्वेमार्ग अशा अनेक करारांतून ही मैत्री वृद्धिंगत झाली आहे. यास्तव त्या देशातील कोणत्याही पक्षाची- सत्तारूढ वा विरोधी – बाजू घेण्याचे आपण टाळले पाहिजे. अस्वस्थ बांगलादेशच्या बाबतीत सध्या आपण इतकेच पथ्य पाळले पाहिजे.