अतुल सुलाखे

संन्यास म्हणजे सर्वसंग परित्याग, असा अर्थ प्रचलित आहे. तथापि याचा आणखी एक अर्थ आहे. संन्यास. अशी फोड केली तर ‘संपूर्ण व्यवस्था’ लावणे आणि अलिप्त होणे असा त्याचा अर्थ होतो. खरा संन्यासी अलिप्त राहून समाजाच्या हितासाठी झटतो. रामकृष्ण मिशनचे कार्य हे अशा संन्यस्त वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे.

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

विनोबांनी याच्या पुढचा टप्पा स्वीकारला. संन्यासाचेही ओझे नको असा त्यांचा स्पष्ट संदेश दिसतो. सूर्याप्रमाणे आपले कार्य व्हावे हे त्यांचे सूत्र होते. ‘पराक्रमी सेवक’ म्हणजे सूर्य. आपण जेवढे खुले होतो तेवढा सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. सूर्य आपल्यावर काहीही लादत नाही. मी तुझ्या दाराबाहेर आहे. वाटेल तेव्हा मदत माग, असे सूर्य सांगतो. विनोबांनी आयुष्यभर या तत्त्वानुसार सेवा केली आणि तिला व्यापक रूप दिले.

या वाटचालीत दिवाण शत्रुघ्न सिंह विनोबांच्या समवेत होते. या ‘बुंदेलखंड केसरी’ची इच्छा होती की आपल्या मंगरोठचे दान व्हावे. थोडी जमीन दान म्हणून देणे वेगळे आणि संपूर्ण गावाचे दान करणे वेगळे. मंगरोठचे लोक याविरोधात होते. आमची जमीन गेली तर आम्ही जगायचे कसे, हा त्यांचा रोकडा सवाल होता.

शत्रुघ्न सिंह त्यांना म्हणाले, ‘आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि तो प्रसाद म्हणून स्वीकारतो तशा वृत्तीची आज गरज आहे.’ ही भूमिका कोणताही व्यवहारी माणूस केव्हाही स्वीकारणार नाही, हे उघड होते. त्यामुळे गावकरी आणि दिवाण सिंह यांच्यात तीव्र मतभेद झाले. हे चित्र पाहिल्यावर विनोबा मुक्कामासाठी दुसऱ्या गावी गेले. विचार मान्य असेल तरच स्वीकारा. कोणताही आग्रह नाही. जबरदस्ती कदापिही नाही. विनोबा आपल्या भूमिकेवर ठाम होते.

तिकडे गावाचे दान करायचे, की नाही यावर मंगरोठवासी आणि दिवाणसाहेब यांच्यात चर्चा सुरू झाली. ती सलग १४ तास सुरू राहिली. गावकरी आणि दिवाण आपापल्या भूमिकांवर ठाम होते. शेवटी शत्रुघ्न सिंह नाराज झाले. मंगरोठचे दान करणार असाल तर माझ्याशी चर्चा करा. अन्यथा तुमचा मार्ग मोकळा आहे. अखेरीस ६७ पैकी ६६ लोकांनी आपल्या जमिनी दान दिल्या.

हे ग्रामदान पत्र घेऊन दिवाणसाहेब रणरणत्या उन्हात विनोबांच्या भेटीला निघाले. सायकल घेऊन एक दिवाण दानासाठी निघाला. गावात न जाताच विनोबांना ग्रामदान मिळाले होते. पोचमपल्लीत भूदानाचा आरंभ झाला तर मंगरोठमध्ये ‘सब हि भूमी गोपाल की’ हे तत्त्व प्रत्यक्षात आले. कुणालाही दानात मिळालेली जमीन व्यक्तिगत रूपात मिळणार नाही ती समूहाच्या मालकीची आहे. तेव्हा एक व्हा आणि भूमातेची सेवा करा. आश्रमात सुरू झालेला सामूहिक शेतीचा प्रयोग पोचमपल्लीमध्ये  लहान स्वरूपात प्रत्यक्षात आला. मंगरोठमध्ये त्याला व्यापक रूप मिळाले. ग्रामदानाचे भव्य रूप अद्यापही अदृश्य होते. भूदानाला प्रतिभेचा स्पर्श झाला. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर दुधामध्ये मध मिसळला की दुधाची गोडी वाढते. भूदान आणि ग्रामदान यांचे नाते असे आहे. भूदानाला दिशा मिळाली. सारांश मंगरोठ संन्यस्त झाले.