वर्षातील बहुतेक सगळेच दिवस हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची आता सवय करून घ्यायला हवी की काय, असा प्रश्न यासंबंधीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालामुळे निर्माण झाला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंचे कालमान गेली कित्येक शतके बहुतांशी नियमित होते. ते गेल्या काही दशकांत बदलले. उन्हाळा आणि हिवाळ्यात गारांचा पाऊस, ढगफुटी, पावसाळ्यात अधिक तापमान यांसारख्या हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशाने तातडीने तयारी करायला हवी. त्याबाबत कोणतीही उपाययोजना न झाल्याने देशातील सगळी शहरे हवालदिल होत चालली आहेत. तेथील नद्या-नाले केवळ प्रदूषितच झालेले नाहीत, तर ते बुजवून त्यावर भली मोठी निवासी संकुलेही उभी राहिली आहेत. शहरांमध्ये सांडपाण्याच्या विसर्गाची कोणतीही भक्कम यंत्रणा नाही. त्यामुळे ढगफुटीसारख्या घटनांमध्ये शहरांतले रस्ते जलमय होतात आणि नागरिकांचा, प्राण्यांचा हकनाक बळी जातो. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पाणथळ जागांवरही निवासी संकुले उभी करण्याचा ठाणे शहराच्या विकास आराखड्यातील बदल निसर्गाचे आणि पर्यायाने शहराचेही किती अतोनात नुकसान करणार आहे, याचे भान नसणे, हे काळजी वाढवणारे आहे. ठाण्यातील पामबीच रस्त्यावरील पाणथळ जागांवर फ्लेमिंगोंची वस्ती असते. त्यावरही घाला घालून घरे बांधण्याचा निर्णय निर्दयी म्हणायला हवा. देशातील सगळ्या शहरांमध्ये अशाच पद्धतीने विकासाच्या नावाखाली धुडगूस घातला जातो. शहरे केवळ उपजीविकेची ठिकाणे बनत चालल्याने तेथील नागरिकांच्या जगण्याचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे, याचे भान नियोजनकारांनी ठेवायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ : स्थानिक क्रिकेटचा विजय

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट २०२४ च्या अहवालात २०२३ या वर्षातील ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने सर्वांत अधिक उष्ण राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. हा हवामानाचा कोप भारताबरोबरच जगातील १०९ देशांनाही भोवला आहे. त्यातही आफ्रिका, युरोप आणि पश्चिम आशियातील ५९ देशांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे त्या देशांमधील मानवी मृत्यूंचे प्रमाणही सर्वाधिक राहिले. भारतातील बिहार राज्यात मृत्यूंचे प्रमाण अधिक राहिले. तेथे ६४२ जणांना निसर्गकोपामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. या परिस्थितीचे गंभीर परिणाम हरियाणात दिसून आले, तर गुजरातमध्ये घरांचे सर्वाधिक नुकसान झाले. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणिमात्रांना जीव गमवावे लागले. हवामानातील बदलांचे संकेत लक्षात घेऊन त्यांना सामोरे जाण्यासाठी यापुढे नियोजनाच्या विचारपद्धतीतच मूलभूत बदल करणे आवश्यक ठरणार आहे. शहरांचा सुनियोजित विकास करण्याची पद्धत भारतात नाही. गरजेनुसार आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देताना, वातावरणाचा विचार न करता शहरे फोफावत राहिली, तर येत्या काही काळात तेथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. अति थंडी, अति ऊन, अति पाऊस, दुष्काळ, गारपीट, वादळे, पूर, भूस्खलन, हिमस्खलन या घटनांचा विपरीत परिणाम जेवढा नागरी जीवनावर होतो त्याहून अधिक शेतीवर होतो. शेतकऱ्यांना भरपाई देऊन हा प्रश्न कधीच सुटणारा नाही. त्यासाठी हवामानात होणाऱ्या बदलांनाही तोंड देऊ शकेल अशा शेतीमालाच्या उत्पादनाची आवश्यकता आहे. त्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. जगातील अनेक देशांत त्या दृष्टीने सुरुवातही झाली असली, तरी त्यात अद्याप यश आलेले नाही. शेतीतील सातत्य ही मानवी जीवनासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची बाब असते. भारतासारख्या विकसनशील देशात संशोधनावर होणारा तुटपुंजा खर्च पाहता अशा विकसित बियाणांचे व्यावसायिक उत्पादन होण्यास बराच काळ जावा लागेल. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात हजारो हेक्टर सुपीक जमीन खरवडून गेली आहे. हवामानकोपाच्या घटना शेतीमालाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम करतात. शहरांतील मोकळ्या जागा आणि शेतीची आवारे या दोन्ही ठिकाणी निसर्गाशी स्पर्धा करण्याची खुमखुमी यापुढील काळात अधिक धोकादायक ठरणारी आहे. निसर्गाच्या या लहरीपणास मानवी कृतीच कारणीभूत आहेत, हे लक्षात घेऊन नियोजनाची पावले जपून टाकण्याची आवश्यकता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या लहरीपणामुळे गव्हासारख्या पिकाच्या उत्पादनात १०० लाख टनांची घट येण्याची शक्यता आता आहे. अशातच काढणीला आलेली पिके पावसामुळे खराब झाल्याचा परिणाम लगेच बाजारात दिसून येतो. प्रामुख्याने कमी काळात येणाऱ्या भाजीपाला उत्पादनाला हवामानकोप फटका बसतो. एकुणात हवामानातील असे बदल शेतीमालाच्या उत्पादनात अस्थिरता निर्माण करतात, तसेच अन्न सुरक्षाही अस्थिर करतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State of india s environment 2024 climate warnings amidst record high temperatures zws