चैतन्य प्रेम

जग स्वार्थी आहे, कारण मीसुद्धा स्वार्थीच तर आहे! या स्वार्थानं प्रेरित होऊन मी जसा सहा विकार आणि त्रिगुणांच्या पकडीत राहून सर्व अंगभूत शक्ती वापरत असतो, तसाच जगातला बहुतेक प्रत्येक जण वावरत असतो. बाह्य़ जगातील शक्ती त्या याच! इतरांच्या स्वार्थप्रेरित वागण्या-बोलण्याचा आपल्या अंतरंगावर परिणाम होऊ देऊन त्यांना धडा शिकवण्याची जी खुमखुमी आपल्यात असते, त्या खुमखुमीनुरूप वागू लागणं म्हणजेच या शक्तींच्या आहारी जाणं! मग श्रीमाताजी म्हणतात, ‘‘कोणी तुमच्यावर रागावले तर रागाच्या स्पंदनांमध्ये सापडू नका. फक्त जरा मागे सरका! म्हणजे रागाला तुमचा आधार वा प्रतिसाद न मिळाल्यानं तो नाहीसा होईल. नेहमी शांत राहा आणि ज्यामुळे शांती भंग होईल, अशी कोणतीही गोष्ट करण्याचा मोह टाळा.’’ आपला नित्याचा अनुभव आहे की, कोणी आपल्यावर चिडलं तर लगेच आपला क्रोधही उफाळून येतो. शांतीची जशी स्पंदनं असतात ना, तशी अशांतीचीही असतात! त्यात अडकलो की आपण वाहवत जातो.

भय आणि क्रोध या दोन्ही भावनांनी शरीरात काही तात्पुरते आंतरिक बदल होत असतात. म्हणजे हृदयाचे ठोके जलद पडू लागणं, स्नायूंमधील रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागणं, यकृतात साठलेली साखर बाहेर पडू लागणं, काही अंतस्रावी ग्रंथींतील प्रथिनयुक्त घटकांचं प्रमाण वाढणं, स्नायूंवरचा ताण आणि श्वासोच्छ्वासाची गतीही वाढणं. आता भीती दाटून येताच किंवा क्रोध उफाळताच हे सगळे बदल शरीरात अगदी वेगानं का होतात? क्रोधानं काही टोकाचा प्रसंग उद्भवलाच आणि त्यातून देहावर हल्ला झालाच तर रक्तस्राव कमी व्हावा यासाठी त्वचेवरील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. निर्णय घेताना मेंदूच्या सर्व क्षमतांचा वेगानं वापर व्हावा यासाठी यकृतातील साखर मेंदूकडे जाते आणि स्नायूंना तात्काळ वाढीव रक्तपुरवठा होतो. यातून इतरांच्या क्रोधाच्या स्पंदनात सापडून आपणही क्रोधाविष्ट झालो आणि हे वारंवार घडू लागलं, तर देहाच्या या अतिसज्जता यंत्रणेवर किती नाहक ताण येतो, हे सहज समजून घेता येईल. तेव्हा, ‘‘कोणी तुमच्यावर रागावले तर रागाच्या स्पंदनांमध्ये सापडू नका. फक्त जरा मागे सरका! म्हणजे रागाला तुमचा आधार वा प्रतिसाद न मिळाल्यानं तो नाहीसा होईल,’’ हा श्रीमाताजींचा मंत्र आध्यात्मिक हितासाठीच नव्हे, तर शारीरिक प्रकृतिमानासाठीही मोलाचा आहे. म्हणूनच तर क्रोधाला साधुसंतांनी ‘श्वान शीघ्रकोपी’ म्हटलंय! श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘‘श्वान शीघ्रकोपी। आपणा घातकर पापी।।१।।’’ क्रोधाला तात्काळ बळी पडणारा माणूस पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणेच आहे. तो स्वत:च स्वत:चा घात करून घेणारा आहे. पुढे म्हणतात, ‘‘नाही भीड आणिक धीर। उपदेश न जिरे क्षीर।।२।। माणसांसि भुंके। विजातीने द्यावे थुंके।।३।।’’ त्याला ना भीड आहे, ना धीर आहे. तो त्याच्या हिताची गोष्टही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नाही. उपदेशामृत त्याला पचतही नाही. तो इतरांवर भुंकतो आणि मग इतरेजनही त्याला अपमानितच करतात. मग, ‘‘तुका म्हणे चित्त। मळिण करा ते फजित।।४।।’’ अशा माणसाचं चित्त मलिन होतं आणि अखेर त्याची फजितीही होते. तेव्हा क्रोधाच्या आहारी गेलो, तर हित-अनहित समजेनासं होतं, बुद्धी भ्रमिष्ट होते आणि आचरणातही घसरणच होते. हे टाळण्यासाठी श्रीमाताजी सांगतात की, ‘‘नेहमी शांत रहा आणि ज्यामुळे शांती भंग होईल, अशी कोणतीही गोष्ट करण्याचा मोह टाळा.’’