scorecardresearch

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक!

मराठी भाषेला असलेल्या नियतकालिकांच्या प्रदीर्घ परंपरेतील एक महत्त्वाचा चिरा म्हणजे ‘नवभारत’. १९४७ साली सुरू झालेल्या या मासिकाने नुकतीच पंचाहत्तरी पूर्ण केली.

maharsahtra

सरोजा भाटे

मराठी भाषेला असलेल्या नियतकालिकांच्या प्रदीर्घ परंपरेतील एक महत्त्वाचा चिरा म्हणजे ‘नवभारत’. १९४७ साली सुरू झालेल्या या मासिकाने नुकतीच पंचाहत्तरी पूर्ण केली. नियतकालिकांची पडझड सुरू असतानाच्या काळात ‘नवभारत’सारख्या गंभीर मासिकाची शंभरीकडे सुरू झालेली वाटचाल हे अनोखे संचितच आहे..

‘मानवाच्या व मानव संस्कृतीच्या विकासास व उन्नतीस पोषक होईल, अशा प्रकारे महाराष्ट्रीय जीवनाचा व संस्कृतीचा विकास करणे’ हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या पिढीतील थोर गांधीवादी विचारवंत शंकरराव देव यांनी १९४७ साली ‘नवभारत’ हे मासिक सुरू केले. १९४९ साली पुण्याच्या सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला या संस्थेने या मासिकाच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतली. त्यानंतर १९५७ सालापासून हे मासिक वाईच्या प्राज्ञपाठशाळा मंडळाकडून प्रकाशित होत आहे. नुकतीच या मासिकाने आपली पंचाहत्तरी साजरी केली. गेल्या काही वर्षांपासून मराठी नियतकालिकांच्या, मासिकांच्या क्षेत्रात पडझड सुरू असल्याच्या बातम्या कानावर येत असताना एक मराठी मासिक आपली पंचाहत्तरी गाठते ही घटना मराठी साहित्याच्या अर्वाचीन इतिहासात नोंदवावी लागेल, ठळकपणे!

कारणे तीन. एक: सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील तत्कालीन समस्यांवर, बौद्धिक, वैचारिक पातळीवर शास्त्रनिष्ठ विवेचन करणारे बहुसंख्य लेख सातत्याने प्रकाशित होत असूनही अल्पसंख्येने का होईना, वाचकांनी या मासिकाला सातत्याने प्रतिसाद दिला. दोन: प्रारंभापासून आजतागायत आर्थिक अडचणींना तोंड देत खडतर वाटेवर न थांबता ‘नवभारत’ने अमृतमहोत्सवी टप्पा गाठला. तीन: कालक्रमाने संपादक, संपादक मंडळाचे सदस्य आणि अतिथी संपादक (विशेष प्रसंगी) बदलले, जुन्या पिढीच्या जागी नवीन पिढी आली तरी ‘नवभारत’ आपल्या उद्दिष्टांपासून तसूभरही ढळले नाही. कालानुरूप योग्य ती वळणे घेत त्याने आपली बौद्धिक, वैचारिक पातळी टिकवली आहे.

या मासिकाच्या प्रारंभीच्या अंकांवरून ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी त्या काळातील राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक पटांवरच्या घडामोडींवर लिहिणाऱ्या त्या त्या क्षेत्रातील दिग्गज लेखकांची सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना यांचा अंत:प्रवाह लेखांमधून वाहताना जाणवतो. या काळात ‘नवभारत’मध्ये लेखन केले त्यांची केवळ नावेच लेखांच्या भारदस्तपणाबद्दल खूप काही बोलतात. शंकरराव देव, आचार्य जावडेकर, गोवर्धन पारीख, वि. म. बेडेकर, महर्षी कर्वे आणि त्याबरोबर आणि नंतरही सातत्याने लिखाण करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, देवदत्त दाभोळकर, वसंत पळशीकर याखेरीज अधूनमधून हजेरी लावणारे द. वा. पोतदार, ग. प्र. प्रधान, वि. स. खांडेकर, के. ल. दप्तरी, दुर्गा भागवत आणि अनेक विचारवंतांनी आपले विचारधन शब्दबद्ध करून ‘नवभारत’ला समृद्ध केले. अलीकडच्या काळातही अभ्यासू विद्वान लेखकांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे.

या लेखकांमध्ये आस्तिक, नास्तिक, बुद्धिवादी, परंपरावादी, इहलोकवादी, परलोकवादी, व्यवहारी, पारमार्थिक, वास्तवदर्शी, स्वप्नदर्शी, शास्त्रज्ञ, कवी या सगळय़ांचा समावेश आहे. लेखाच्या सुरुवातीला उद्धृत केलेल्या उद्दिष्टामध्ये उल्लेखलेला संस्कृतीचा विकास ‘नवभारत’मध्ये विशाल पटावर विस्तारलेला आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान यांसारख्या भौतिक विकासाशी निगडित विषयांबरोबरच साहित्य, संगीत, नृत्य, शिल्प, नाटय़, चित्र, चित्रपट यांसारख्या आत्मिक जाणिवा समृद्ध करणाऱ्या कला-क्रीडा क्षेत्रांनाही ‘नवभारत’ने आपल्यात सामावून घेतले आहे. प्रारंभी काही वर्षे संपादकांनी अधूनमधून वाचक हितचिंतकांचे मेळावे भरवून ‘नवभारत’ आपली वैचारिक पातळी कायम राखीत अधिक लोकाभिमुख कसे होईल यावर चर्चा आयोजित केल्या. त्यांमध्ये वि. स. खांडेकर, माधवराव बागल यांसारख्या ज्येष्ठ लेखकांनी ‘गांभीर्य आणि लालित्य यांचा सुंदर समन्वय’ साधण्याचा, तसेच ‘भाषा सोपी करण्याचा’ सल्ला दिला. त्या काही प्रमाणात अमलात आणल्या गेल्याचे दिसून येते. तथापि मनोरंजनापेक्षा बौद्धिक विकासावर भर हेच याचे स्वरूप सातत्याने राहिले आहे. गंभीर वळणाने जाणाऱ्या, चिंतनात रमणाऱ्या वाचकांची संख्या मुळातच कमी असल्यामुळे ‘नवभारत’ला नेहमीच अल्प वाचक प्रतिसाद मिळाला आहे. तथापि या त्यांच्या रूपाने महाराष्ट्रात बुद्धिनिष्ठ वैचारिक आदानप्रदानाची परंपरा कायम राहिली आहे, असे म्हणता येईल.

‘नवभारत’ने महाराष्ट्राला नेहमीच केंद्रस्थानी ठेवले असले तरी काही वेळा त्यातील विषयांचे भौगोलिक क्षेत्र भारत आणि प्रसंगी भारताबाहेरील काही देशांपर्यंत विस्तारले. भारतीय स्वातंत्र्याच्या पहाटेपासून आजपर्यंत विस्तारलेला माणसाचा जीवनपट चिंतनाच्या कक्षेत सामावून घेणाऱ्या लेखांमध्ये साकारलेले व्यापक आशयविश्व हे ‘नवभारत’चे वैभव आहे. त्याचे जतन, संवर्धन करीत ते अक्षरधनाच्या रूपाने वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय शंकरराव देव, आचार्य जावडेकर, वि. म. बेडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, वसंतराव पळशीकर, श्री. मा. भावे, राजा दीक्षित आणि इतर अनेक संपादक तसेच संपादक मंडळाचे सदस्य यांना जाते.

सहस्रकाकडे वाटचाल करणाऱ्या ‘नवभारत’ या साहित्य चळवळीचा आढावा संक्षेपात घेणे हे आव्हान आहे. हे अंक वरवर चाळले तरी त्यातल्या लेखांबद्दल किती बोलू आणि किती नको असे होते आणि हे लेख यापूर्वीच का वाचले नाहीत, याची खंत वाटते. अनेक मराठी वाचकांनाच नव्हे, तर अभ्यासकांनाही ‘नवभारत’ हे मराठी मासिकाचे नाव आहे हे माहीत नसते, हे लक्षात आल्यावर त्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीतील काही ठळक टप्पे सजग वाचकांना दाखवावेत या उद्देशाने हा लेखप्रपंच.

गेल्या ७५ वर्षांत प्रकाशित झालेल्या ‘नवभारत’ विशेषांकांची संख्या २० हून अधिक आहे. त्यांमध्ये स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रांतील विकासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या महाराष्ट्र विशेषांकांची संख्या अधिक आहे. अलीकडेच २०२१ साली ‘महाराष्ट्र ६१’ हा विशेषांक दोन खंडांत प्रकाशित झाला असून त्यात महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीपासून संगीत, चित्रपट या क्षेत्रांतील घडामोडींच्या विश्लेषणापर्यंतच्या अनेक विषयांचा समावेश आहे. काँग्रेस या राजकीय चळवळीच्या प्रारंभापासूनच्या इतिहासाचे समग्र दर्शन साक्षेपी भूमिकेतून मांडणारे काँग्रेस विशेषांकही अनेक आहेत. विनोबा, पं. नेहरू यांसारख्या थोर विभूतींप्रमाणेच गेल्या पिढीतील आणि आता विस्मरणात गेलेल्या शंकरराव देव, आचार्य जावडेकर, गोवर्धन पारीख, एम. एन. रॉय तसेच केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, याचबरोबर मर्ढेकर, कुसुमाग्रज यांसारख्या अनेक; संस्कृतीच्या शिल्पकारांचे मौलिक कार्य आणि विचारधन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे व्यक्ती-विशेषांकही विशेषांकांच्या यादीत समाविष्ट आहेत. याखेरीज शिक्षण आणि समाजपरिवर्तन धर्मसमीक्षा, रंगभूमी, अशा लक्ष वेधून घेणाऱ्या विषयांना वाहिलेले विशेषांकही भेटतात. डॉ. साळुंखे यांच्या ‘चार्वाकदर्शन’ या पुस्तकाच्या, प्रा. श्रीनिवास दीक्षित यांनी केलेल्या आणि ‘नवभारत’मध्ये (१९९२) छापून आलेल्या परीक्षणाला डॉ. साळुंखे यांनी दिलेले सविस्तर प्रत्युत्तर म्हणजे ‘वैदिक परंपरा विरुद्ध चार्वाक’ (१९९४). ‘भारताच्या वैचारिक-सांस्कृतिक इतिहासातील एका पायाभूत संघर्षांचा आलेख’ हा विशेषांक, आवर्जून उल्लेख करावा असा. असाच आणखी एक विशेषांक म्हणजे ‘महिला, काही समस्या, काही उत्तरे’ (२००७). यात विवाहाशिवाय सहजीवनाचा पुरस्कार करणाऱ्या लेखाचा समावेश आहे!

‘नवभारत’च्या पहिल्या वर्षीच्या पहिल्या अंकात द. वा. पोतदार यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बनारसीदास या कवीने लिहिलेल्या ‘अर्थकथानक’ या आत्मचरित्राचा करून दिलेला परिचय मनोरंजक तसेच तत्कालीन इतिहासाचे अंधारकोपरे उजळणारा आहे. १९५६ साली प्रकाशित झालेल्या ‘भाषा, संस्कृती व राज्य’ विशेषांकात कार्ल डब्ल्यू डॉईश – यांच्या एका लेखाच्या अनुवादात २००० सालापर्यंतचा भारताच्या भाषिक भविष्याचा आलेख नकाशासहित छापला आहे. ‘हिंदूी साक्षरतेची वाढ झपाटय़ाने होऊनही राष्ट्र एकजिनसी स्वरूपाचे होण्याच्या दृष्टीने हिंदूीचा फारसा उपयोग होणार नाही’ हे त्या लेखातील भाकीत आजही खरे ठरले आहे. त्याचप्रमाणे, याच अंकातील एका लेखात प्रा. मंगरुळकर यांनी नोंदवलेले ‘अविकसित अशा शेकडो भाषांचे केवढे ऋण आपल्यावर आहे. आता या भाषा उपेक्षित आहेत, त्यांना लिपी द्यायला हवी’ हे मत आजही खरे आहे.

जुलै १९५१ च्या अंकात प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या लेखात, बाळशास्त्री जांभेकरांचे ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र मानले जाते हे खरे नसून त्याही पूर्वी ‘मुंबापुरवर्तमान’ नावाचे वृत्तपत्र निघत होते, असे पुराव्यानिशी दाखवले आहे.काँग्रेस शताब्दी विशेषांकात मे. पुं. रेगे यांचा ‘भारतीय मुस्लिमांचे राजकारण’ या शीर्षकाचा लेख संकलनात्मक स्वरूपाचा असला तरी प्रस्तुत विषयाची समग्र माहिती मुद्देसूदपणे मांडणारा, आजची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता आजही अवश्य वाचावा असा आहे. त्यात काही थोर विचारवंतांच्या निवडक लेखांचे अनुवाद आहेत. १९८४ च्या दिवाळी अंकात त्यांनी लुडविग विटगेन्स्टाईनच्या संकलित विचारांच्या केलेल्या अनुवादातील एक मननीय विचार असा आहे- ‘पूर्वीची संस्कृती दगडधोंडय़ांचा एक ढीग बनेल आणि अखेरीस त्याचा एक राखेचा ढिगारा होईल, पण त्या राखेवर चैतन्य घिरटय़ा घालीत राहील!’ रेगेंप्रमाणेच इतर नामवंत लेखकांनी बट्र्राड रसेल, रवीन्द्रनाथ टागोर, खलील जिब्रान अशा विभूतींचे तत्त्वचिंतन अनुवादित केले आहे.

‘नवभारत’मध्ये प्रारंभापासून सातत्याने लेखन करणाऱ्या व्यासंगी लेखकांपैकी विशेष उल्लेख करावासा वाटतो तो प्रा. देवदत्त दाभोळकर यांचा. त्यांनी राजकारण, समाजकारण यांसारख्या गंभीर विषयांवर विपुल लेखन केले. काही अंकांची अतिथी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. मधूनमधून त्यांच्या लेखणीने घेतलेले ललित वळणसुद्धा बरेच काही सारगर्भ सांगून जाते. त्यांची एक कविता (१९५३) ‘आणि – तू तरी कोण आहेस?’ या शीर्षकाची:
शास्त्रज्ञ म्हणाला:
‘मी यान्त्रिक माणूस निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे’.
संस्कृती खिन्नपणे हसून म्हणाली:
‘अशा माणसांचे कारखाने निघून आज किती तरी वर्षे झाली,
आणि तू तरी कोण आहेस?’
वाचकाची कलास्वादाची जाण अधिक प्रगल्भ करणारे, ‘केशवसुतांपासून मुक्तिबोधांपर्यंत’, ‘आजची मराठी प्रायोगिक रंगभूमी’, ‘वास्तुकला: समकालीन भारतीय स्थिती’, ‘निसर्ग आणि इब्सेन’, ‘चित्रपट: जाणकारीच्या शोधात’, ‘व्हिन्सेन्ट व्हॉन गॉ’, ‘मराठी कादंबरी’ हे आणि असे अनेक लेख ‘नवभारत’च्या अंकांमध्ये जागोजागी भेटतात.

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना माहितीप्रद वाटतील अशा अनेक लेखांपैकी, ‘सोव्हिएत युनियनमधील भाषिक प्रश्न’, ‘पहिल्या महायुद्धानंतरचा युरोप’, ‘भारत आणि पाकिस्तान’, ‘फ्रान्समधील राजकारण’ ही काही लेखांची शीर्षके.एकूण गंभीर बाज असणाऱ्या लेखांमध्ये मधूनच डोकावणाऱ्या ‘घुबडाचे पिलु’, ‘वेडा पिंपळ’, ‘पुळणीवरची मिस्कील खळबळ’ अशा अनेक कविता ग्रीष्मातल्या सायंकाळच्या पश्चिमझुळकीसारख्या सुखावतात. अतिवृष्टीचा कहर सोसल्यानंतर विंदा करंदीकरांना स्फुरलेली ‘आवर हे दान’ ही चटका लावणारी कविता:
पायातील काटा। पायासह गेला
ऐसाही भेटला। धन्वंतरी।
दु:खासह गेला। घेवोनिया सुख
भूक आणि मुख। सवे गेली।
प्रार्थियले काय। काय दिले हाती।
मातीवर माती। वाढलीस
अगा कृपावंता। आवर हे दान
टाक ते निदान। दु:ख माझे

‘नवभारत’च्या अंकांमधली ही अक्षरयात्रा आणि तिच्या रसास्वादाची ही झलक पुढे चालू ठेवण्याचा मोह सर्व मर्यादा लक्षात घेऊन आवरणे आवश्यक आहे.‘नवभारत’चे अलीकडचे संपादक डॉ. श्री. मा. भावे यांनी त्याचे रंगरूप अधिक आकर्षक केले. ‘सादप्रतिसाद’, जुन्या लेखांची ‘पुनर्भेट’, पुस्तक परीक्षणे अशा नव्या सदरांची भर घालण्याचे त्यांनी केलेले ‘भावे प्रयोग’ यशस्वी ठरले. कमी लेख हाती आले तेव्हा दोन्ही हातांत लेखणी सरसावून भाव्यांनी ‘साक्षी’ आणि ‘दीर्घस्मृति’ अशी उपनामे घेऊन लेख लिहून ‘नवभारत’मध्ये नवा प्राण फुंकला. त्यानंतर संपादकपदाची धुरा सांभाळणाऱ्या नव्या दमाच्या प्रा. राजा दीक्षित यांनी ‘नवभारत’ला नवा चेहरा दिला. ‘अभ्यासू, व्यासंगी, बहुश्रुत, निश्चित भूमिका असलेल्या लेखकांना जोडून घेणाऱ्या’ या आजच्या संपादक आणि संपादक मंडळाच्या, लेख आणि लेखकांच्या चाणाक्ष निवडीमुळे ‘नवभारत’चे मराठी नियतकालिकांच्या मांदियाळीतील स्थान उंचावले आहे.

गेल्या पाऊणशे वर्षांत मराठी भाषेची, जुनी, भारदस्त खानदानी, संस्कृतप्रचुर, शास्त्रकर्कश, ललितकोमल, तालबद्ध, सुगम, सभ्य, डौलदार, खेळकर, झुळझुळीत पोताची, अशी अनेक रूपे ‘नवभारता’तून वाचनसहल करताना पाहायला मिळतात. राज्यशास्त्रापासून कलास्वादापर्यंतच्या विविध क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना साहाय्यक ठरतील अशा, सारगर्भता, आशयघनता, मुद्देसूद मांडणी, तर्कनिष्ठता अशा वैशिष्टय़ांनी युक्त लेखांचा मूल्यवान खजिना असणारे ‘नवभारत’चे सर्व अंक महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात भारताच्या तसेच भारताबाहेरील जगाच्या अर्वाचीन इतिहासाचे महत्त्वाचे दस्तावेज आहेत. अनेक समस्यांनी ग्रस्त असूनही भूतकाळाचा चेहरा वर्तमानाइतका भेसूर नव्हता याची सुखद जाणीव नवा आशावाद जागवते ही ‘नवभारत’च्या वाचनाची फलश्रुती आहे.

आजच्या दैनंदिन धकाधकीत आपण मागचे खूप काही गमावले याची टोचणीपूर्वक जाणीव देत त्या गमावलेल्यातील काही साहित्याच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचवणारे ‘नवभारत’ हे मासिक खरोखरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे.
लेखिका ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक आहेत.
bhatesaroja@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 01:09 IST