‘त्यांना काय वाटेल?’ या ‘पहिली बाजू’मध्ये (१४ मे) प्रसिद्ध झालेल्या विनय सहस्राबुद्धे यांच्या लेखाचा प्रतिवाद
लोकसभेच्या निवडणुकीमधील शाब्दिक चकमक आता अशा वळणावर गेली आहे की अशा नेत्यांमुळे राजकारणाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे. जाहीर सभेत खुलेआम ‘जे अधिक मुले जन्माला घालतात ते’ अशी मुस्लिमांची अवहेलना करणारे पंतप्रधान या देशाने कधी पाहिले नव्हते. भाजप आणि त्यांचे पाठीराखे आपलेच संवाद विसरलेत. त्यामुळे ‘यांना काय वाटेल’, ‘त्यांना काय वाटेल’ असे प्रश्न त्यांना पडत आहेत. त्याऐवजी ‘जनतेला काय वाटते ते पहा’ एवढेच त्यांना सांगावेसे वाटते.
हा फक्त ट्रेलर?
पंतप्रधान मोदींनी मध्यंतरी एक मुलाखत दिली आणि त्यात ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षात आम्ही जे केले तो तर फक्त ट्रेलर होता. मला यापेक्षा खूप अधिक करायचे आहे; वा मोदीजी वा… तुमच्या या ट्रेलरची झलक पहा… बेरोजगारीने भारतातील ४५ वर्षांचा रेकॉर्ड तोडला. पेट्रोल- डिझेल १०० रुपयांच्या वर गेले. चारशे रुपयांचा गॅस सिलेंडर ११०० वर गेला. देश दोन लाख कोटींच्या कर्जात बुडाला. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी शक्य ते सगळे केले. मणिपूरमध्ये दोन जमातींमधील तणावादरम्यान महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवले गेले. त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, पण मोदीजी एकदाही मणिपूरला गेले नाहीत. महिला कुस्तीगिरांना रस्त्यावर पोलिसांकडून आणि गुंडाकडून मारहाण केली गेली. भुकेचा भारतातील निर्देशांक पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याही खाली गेला. सारी बंदरे पोर्ट आणि विमानतळे मित्राच्या कंपनीला मिळावीत यासाठी ईडी-आयटीचा वापर केला गेला. विरोधी पक्षातील नेत्यांना नामोहरम करण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणांना आपले बटिक बनवले. निवडणूक रोख्यांद्वारे देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केला. परीक्षांचे पेपर फुटू दिले. बेरोजगारांचे नोकरी मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.
…आणि तरीही मोदीजी म्हणतात, की हा फक्त ट्रेलर आहे.
हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहताना आणि ऐकताना तुमच्या चाहत्यांना आणि सुज्ञ मतदारांना काय वाटले असेल… आम्हाला काय वाटले असेल याचा मोदीजी तुम्हीच विचार करा.
हेही वाचा >>> मोदींना वस्तुस्थिती माहीत आहे, पण…
महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग, कार्यालये गुजरातला पळवली गेली. वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर्सचा एक लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेला. भारतीय वायूदलासाठी मालवाहू विमान बनवण्याचा २१,९३५ कोटी रुपयांचा प्रकल्प नागपूरमधील मिहान परिसरात उभारण्यात येणार होता. परदेशी गुंतवणुकीचे अग्रेसर ठिकाण अशी महाराष्ट्राची ओळख असूनही गुजरातला झुकते माप दिले गेले. वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा-एअरबस ही त्याची नवी उदाहरणे. या आधीही अनेक खासगी उद्याोग आणि सरकारी संस्था गुजरातला नेण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC), नॅशनल मरीन पोलीस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG), हे तर गुजरातला गेलेच, पण मुंबई विमानतळाचे मुख्यालय अदानी समूह अहमदाबादला नेत असल्याची चर्चा आहे.
…आणि तरीही मोदीजी म्हणतात, की हा फक्त ट्रेलर आहे.
लोकांनी निवडून दिलेल्या अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले. मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची सरकारे ऑपरेशन कमळ करून उखडून फेकली गेली. विरोधी पक्षातील खासदारांना संसदेतून बाहेर काढले गेले, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले गेले.
देवेंद्र फडणवीस यांचे एका भाषणातील वाक्य आहे. त्यात ते म्हणतात, मनसे म्हणजे आधी होती महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मग त्यांची झाली मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि नंतर झाली उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना. फडणवीसांकडून मनसेची इतकी अवहेलना करून घेतल्यानंतर मनसेला भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला लावला गेला. त्याचे या दोघांनाही त्यांना काय वाटले असेल याचाही मोदीजी तुम्ही विचार करा.
…आणि तरीही मोदीजी म्हणतात, की हा फक्त ट्रेलर आहे.
हेही वाचा >>> योगेंद्र यादवांच्या मते, चौथा मतदान-टप्पा ‘अनिर्णित’पणाकडे झुकणारा…
आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. पण ‘यांना काय वाटेल’, ‘त्यांना काय वाटेल’ असा विचार करणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांबाबत सतत अपमानास्पद वक्तव्य केली आहेत. भाजपचे संभाजीनगरचे आमदार अतुल सावे म्हणाले होते: शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्वीपासूनच होत आहेत, त्या का आज होताहेत का? भाजपचे रावसाहेब दानवे प्रदेश अध्यक्ष असताना म्हणाले होते : राज्य सरकारने एक लाख टन तूर खरेदी केली तरी शेतकरी लोक रडतात साले. भाजपचे तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले होते : जैन समाज कांदा खात नाही म्हणून त्यांची प्रगती होते. कांदा खाऊन रडणाऱ्यांची आर्थिक प्रगती खुंटते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते : ही शेतकऱ्यांची सुकाणू समिती नाही तर जिवाणू समिती आहे. कृषी राज्यमंत्री संजीव बालियान (राज्यस्थान) म्हणाले होते : ‘किसानों तुम्हारी औकात क्या है?’..दो मिनट में ठीक कर दूंगा, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मे-२०१५ मध्ये म्हणाले होते : ‘किसान कर्जमाफी की उम्मीद न करें. मध्य प्रदेशचे गृहमंत्री म्हणाले होते : ‘मंदसौर में मारे गये लोग किसान नहीं, अपराधी हैं’ विनोद तावडे (राज्यात मंत्री असताना) म्हणाले होते : लोकांना फुकट घेण्याची सवय लागली आहे. सहकारमंत्री असताना चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले होते : आवाज वाढवून बोलू नका, सरकारकडे पैसे छापायची मशीन नाही. भाजप आमदार आणि माजी कृषीमंत्री एकनाथ खडसे म्हणाले होते : शेतकऱ्यांना मोबाइलची बिले भरायला काही वाटत नाही, मात्र ते विजेचे बिले भरत नाहीत. भाजप खासदार संजय धोत्रे म्हणाले होते: शेतकरी मरतायत तर मरू द्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. भाजप खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले होते : शेतकरी मरण्याची फॅशन झाली आहे. भाजप कृषीमंत्री राधाकृष्ण सिंग म्हणाले होते : ‘‘नामर्दी और ड्रग की वजह से किसान आत्महत्या करते है’’…
…आणि तरीही मोदीजी म्हणतात, की हा फक्त ट्रेलर आहे.
काही तरी वाटून घ्या…
दहा वर्षांपूर्वी काँग्रेसच्या कालावधीत आम्ही ‘महंगाई जो रोक ना सकी वह सरकार निक्कमी है, जो सरकार निक्कमी है वह सरकार बदलनी है ’ अशा घोषणा देत होतो आणि काँग्रेसने केलेल्या महागाईमुळे कसे कंबरडे मोडले आहे अशी भाषणे करत होतो. स्मृती इराणी रस्त्यावर उतरून गॅस भाववाढीवर आंदोलन करत होत्या. शिवसेनेनेदेखील उद्धव ठाकरे यांच्या हातात गॅस सिलेंडरची प्रतिकृती देऊन आंदोलन केले होते. पण आता त्या महागाईची आणि या आजच्या महागाईची तुलनाच होऊ शकत नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या दहा वर्षांत महागाई वाढली की कमी झाली, अच्छे दिन आले का हे प्रश्न भाजपच्या नेत्यांना विचारले की ते चिडतात. तुम्हाला ईडी लावू, आयटी लावू, तुमचा भुजबळ करू असे धमकावतात. भाजपची खरी अडचण हीच आहे की ना मोदींमुळे महागाई कमी झाली ना बेरोजगारी, ना शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला, ना अवजारे करमुक्त झाली. रोजगार नाही, पाणी नाही. भाजपने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य तरुण बेरोजगारांची ‘घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी गत केली आहे. सामान्य माणूसही वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहे. नुसत्याच २०४७ मध्ये कसा विकास होईल याच्या घोषणा. त्या म्हणजे गाजराची पुंगी. वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली, असेच सर्वसामान्य लोकांना वाटते. म्हणूनच भाजपच्या नेत्यांना, त्यांच्या पाठीराख्या पक्षांना जनता एकच प्रश्न विचारत आहे. यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेलऐवजी आम्हाला सामान्य जनतेला काय वाटते ते पहा. आमच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण का केल्या नाहीत, ते आधी सांगा.
लोक जणू म्हणताहेत,
तू इधर उधर की बात न कर,
ये बता की काफिला क्यूं लुटा…
मुझे रहजनों से गिला नही,
तेरी रहबरी का सवाल है…
मोदीजी लोकांना खरोखरच असे वाटते आहे की हा सगळा फक्त ट्रेलर असेल तर, मुख्य सिनेमा किती भयानक असेल?
उद्धव यांचा द्वेष हीच राजकीय ओळख
उद्धव ठाकरे हे आज भाजपविरोधातील महत्त्वाचे नेतृत्व आहे. पक्ष, चिन्ह गेल्यावरही नव्या दमाने आपले उमेदवार उभे करून ते प्रचार करताहेत. त्याउलट राज ठाकरे पक्ष, चिन्ह असूनही लोकसभा निवडणुका लढवण्याची धमक दाखवू शकलेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणे ही त्यांनी स्वत:वर ओढावून घेतलेली राजकीय नामुष्की म्हणावी लागेल. एखादा खरोखरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार असता तर या संकटात ज्याने शिवसेनेला दुसऱ्याच्या हातात देऊन खुळखुळा बनवला, धनुष्यबाण काढून घेतले, शिवसेनेला नकली सेना म्हटले, इतकेच नाही तर थेट उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटले त्यांना धडा शिकवण्यासाठी तिरमिरून उठला असता आणि तमाम खऱ्या शिवसैनिकांप्रमाणे म्हणाला असता, उद्धवा, मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही पण ज्या पद्धतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर आणि त्यांचा वारसदार म्हणून तुझ्यावर हे दोन अमराठी नेते सत्तेचा गैरवापर करून अन्याय करत आहेत, त्याविरोधात लढण्यासाठी माझा तुला बिनशर्त पाठिंबा आहे. पण आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार ? उद्धव ठाकरे यांचा द्वेष हीच यांची राजकीय ओळख राहिली आहे. त्याचा फायदा त्या त्या काळातील इतर राजकारण्यांनी घेतला आणि यांचेही पूर्ण नुकसान केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असो.
प्रवक्ता आणि जनसंपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)