डॉ. राजेंद्र डोळके

‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहणाऱ्यांनी आणि गांधींचीही तीच इच्छा होती असे म्हणणाऱ्यांनी, गांधीजींचे त्याआधीचे पत्र वाचले आहे का?

I challenge Modi Said Mallikarjun Kharge
“मोदींमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी ‘हे’ करावं”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं जाहीर आव्हान!
Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Jan Vikas Foundation supports Dr Prashant Padole of Congress
भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट
Rahul Gandhi criticism of BJP as a repeat of the defeat of Shining India this year
‘शायनिंग इंडिया’ची यंदा पुनरावृत्ती, भाजपवर राहुल गांधी यांची टीका; भाजप आघाडीला १८० जागा मिळण्याचे भाकीत

अ‍ॅलन ह्यूम, सर विल्यम वेडरबर्न आणि सर हेन्री कॉटन या तिघा इंग्रज अधिकाऱ्यांनी काँग्रेसची स्थापना केली असली तरी यात मुख्य भूमिका व पुढाकार ह्यूम यांचाच होता. ‘काँग्रेस’ या शब्दाचा अर्थ ‘एकत्र येणे’. ह्यूम यांनी भारतातील मोठय़ा समाजनेत्यांना निमंत्रणे पाठवून २८ ते ३१ डिसेंबर १८८५ दरम्यान मुंबईत पहिले संमेलन भरवले.  सर्वधर्मसमभाव, लोकशाही, उदारमतवाद इत्यादी  या संस्थेची धोरणे  ठरवण्यात आली. काँग्रेसच्या इतिहासात पक्षात अनेक मतभेद झाले. पक्ष तीन-चारदा फुटलाही. परंतु या मूलभूत धोरणांवरून वाद झाला, असे दिसून येत नाही.

हिंदुस्तानातील असंतोष नेमस्त पद्धतीने व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेली ही सभा, कधीकाळी स्वातंत्र्यवीरांची संघटना होईल आणि काँग्रेस म्हणजे गांधी, हे समीकरण तयार होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी गांधीजी १५ वर्षांचे पोरबंदरला शाळेत शिकणारे विद्यार्थी होते. पुढे गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. इकडे काँग्रेसचे कार्य जोरात सुरू होते. गांधीजींच्या कानावर या संघटनेची कीर्ती गेली. तिच्याविषयी त्यांच्या मनात कमालीची आपुलकी निर्माण झाली. ही आपुलकी एवढी होती की त्यांनी हिंदी जनतेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी एक कायमची संस्था असली पाहिजे या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेत २२ मे १८९४ रोजी जी संस्था उभारली होती तिचे नाव ‘नाताल  इंडियन काँग्रेस’ असे ठेवले होते. १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले. तेव्हापासून ते १९४७ पर्यंत काँग्रेसचे युग म्हणजे ‘गांधीयुग’ असे मानले जाऊ लागले. या संघटनेत लाखो लोक सामील करून इंग्रजांविरुद्ध लढणारी एक प्रचंड शक्ती, असे स्वरूप गांधींनी काँग्रेसला दिले.

आणखी वाचा – चतु:सूत्र : गांधीजींच्या जनआंदोलनांमागील भूमिका

‘कट्टर टीकाकारांचेही स्वागत’

‘यंग इंडिया’च्या १ ऑक्टोबर१९३१ च्या अंकात गांधीजी लिहितात- ‘‘सुमारे ५० वर्षे जुनी असलेली काँग्रेस संघटना ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय आहे. ती भारतातील सर्व वर्गाच्या हितांचा विचार करणारी आहे. तिचा निर्माता अ‍ॅलन ह्यूम हा काँग्रेसच्या पित्याच्या रूपात ओळखला जातो. फिरोजशहा मेहता आणि दादाभाई नौरोजी या दोन महान पारशी नेत्यांनी याचे संगोपन केले. आरंभापासून काँग्रेमध्ये सर्व धर्माचे, पंथाचे आणि संप्रदायाचे लोक आहेत. इथे जाती, पंथ, स्त्री-पुरुष असा भेद अजिबात नाही.’’ २४ डिसेंबर १९३१ च्या अंकात ते लिहितात- ‘ही संघटना कोणत्याही प्रकारच्या सांप्रदायिकतेची कट्टर शत्रू आहे. येथे त्याच्या कट्टर टीकाकारांचेही स्वागत केले जाते.’

६ ऑगस्ट १९३८ च्या ‘हरिजन’मध्ये ते लिहितात- ‘‘अंतर्गत विकास आणि शासनाच्या दृष्टिकोनातून काँग्रेस ही जगातील कोणत्याही लोकतांत्रिक संस्थांपेक्षा चांगली संस्था आहे. हिची स्थापना वर्तमानातील सर्वात मोठय़ा साम्राज्यवादी संस्थेशी लढण्याकरिता झाली आहे. ही पूर्ण फॅसिझमविरोधी संस्था आहे. कारण शुद्ध आणि निष्कलंक अहिंसेच्या पायावर ती उभी आहे. हिची सर्व तत्त्वे नैतिक आहेत.’’

याप्रमाणे गांधीजींची काँग्रेसबद्दलची मते, काँग्रेसचे महत्त्व आणि त्यांना या संघटनेबद्दल असणारे ममत्व यावर प्रकाश पडतो. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी या पक्षात स्वैरतेला मुक्तपणाने वाव दिला. संघटना व्यापक, मजबूत, नियमबद्ध आणि शिस्तबद्ध असावी, यावर त्यांनी नेहमी भर दिला. १९२४ मध्ये बेळगाव येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. या अधिवेशनात व इतर वेळी त्यांनी काँग्रेसच्या सभासदत्वासाठी चार आणे वर्गणी रद्द करण्यात येऊन हाताने कातलेल्या सुताची अट घालण्यात यावी असा ठराव मांडला. या ठरावाला काही जणांनी हरकत घेतली होती. चरखा, सूतकताई, अहिंसा, नि:शस्त्र क्रांती या तत्त्वांना काँग्रेसमधीलच काही जणांचा कायम विरोध होता. अशावेळी गांधीजी काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या गोष्टी करत. एक-दोनदा तर त्यांचे नेहरू, पटेल यांच्याशीही खटके उडून ‘तुम्हाला काय हवे ते करा’ असे म्हणून ते बाजूला झाले होते. १९३४ साली ग्रामोद्योग, हरिजनसेवा व विधायक कार्य याकडे अधिक लक्ष पुरवता यावे या उद्देशाने ते राष्ट्रसभेच्या कार्यातून निवृत्त झाले होते. फक्त चार आणे देऊन मिळणारे काँग्रेसचे सभासदत्वही त्यांनी सोडून दिले होते. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला. मात्र ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असे आश्वासन दिले. गांधीजी काँग्रेसमधून बाहेर जरी पडले असले तरी त्या काळातही ‘काँग्रेस म्हणजे गांधी’ हे समीकरण कायम होते.

आणखी वाचा – लोकरंग विशेष : गांधी एक अपरिहार्य रहस्य

गांधीजींची दोन पत्रे

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचे पुनरुज्जीवन करावे असे विचार गांधीजींच्या मनात सुरू झाले होते. त्यादृष्टीने त्यांनी मृत्यूच्या तीन दिवस आधी म्हणजे २७ जानेवारी १९४८ रोजी एक व एक दिवस आधी म्हणजे २९ जानेवारी १९४८ रोजी एक अशी दोन पत्रे लिहिली. २९ जानेवारीचे पत्र गांधींच्या जीवनातले शेवटचे ठरले. त्यामुळे ते ‘गांधीजींचे मृत्युपत्र’ म्हणून गृहीत धरले जाऊ लागले. विनोबांनी याला ‘गांधींचे काँग्रेसबाबतचे इच्छापत्र’ असे म्हटले आहे.

परंतु या पत्राला अथवा मसुद्याला गांधीजींचे ‘मृत्युपत्र’ म्हणणे योग्य नाही. कारण ‘मृत्युपत्रा’तील इच्छा या आपल्या मृत्यूनंतर आपला संबंध अथवा अधिकार असलेल्या गोष्टींबद्दल व्यक्त केलेल्या असतात आणि त्या मृत्यूनंतर अमलात आणावयाच्या असतात. गांधींनी या अर्थाने ते पत्र तयार केले नव्हते. या पत्रात गांधींनी काँग्रेसचे ‘लोकसेवक संघा’त रूपांतर झाले पाहिजे, असे लिहिले आहे. परंतु काँग्रेसच्या विरोधकांनी याचा अर्थ गांधींची इच्छा काँग्रेसचे विसर्जन करण्याची, बरखास्त करण्याची अथवा नष्ट करण्याची होती असा लावून त्याचा प्रचार चालवला. लोकांच्याही मनात हा समज दृढ झाला. परंतु तो कसा चुकीचा आहे, हे दाखवण्याकरिता गांधींची मूळ वाक्येच देतो. ते लिहितात-

‘‘काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे भारत स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे काँग्रेस सध्या ज्या स्वरूपात आहे, त्या स्वरूपातील संघटनेचे काम समाप्त झाले आहे.  असे असले तरीही देशाला अद्याप सामाजिक, नैतिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे. त्यामुळे काँग्रेसचे रूपांतर लोक सेवक संघात करण्यात यावे.’’ (India has still to attain social, moral and economic independence… for these and other similar reasons, the A.I.C.C. resolves to disband the existing Congress organisation and flower into a lok sevak sangh… ‘हरिजनसेवक’, २२ फेब्रुवारी, १९४८, पृ. ४९-५०) गांधींच्या या उद्गारांचा स्पष्ट अर्थ आहे की ते काँग्रेसला नव्या स्वरूपात पाहू इच्छित होते. कारण भारताला ‘स्वातंत्र्य’ तर मिळाले होते परंतु ‘स्वराज्य’ मिळवणे अद्याप शिल्लक होते. ‘स्वातंत्र्य’ आणि ‘स्वराज्य’ या दोन शब्दांच्या अर्थात, गांधींच्या मते फार मोठा फरक आहे. ‘स्वातंत्र्य’ (इन्डिपेन्डन्स) म्हणजे इंग्रजांचे राज्य नाहीसे झाले होते. पण ‘स्वराज्य’ म्हणजे ‘आपल्यावर आपले राज्य असणे’ हे प्राप्त करणे अजून बाकी होते. स्वशासनाने आणि धर्म, नीती, नि:स्वार्थ या उदात्त जीवनमूल्यांच्या आधारे असे स्वराज्य प्राप्त करावयाचे असते. असे स्वराज्य प्रत्येकाने मिळवले तर राजसत्तेची आवश्यकताच राहात नाही. इथे राजसत्ता कोणाची आहे, हा प्रश्न गौण आहे. स्वातंत्र्य मिळाले तरी स्वराज्य मिळाले असा अर्थ होत नाही, उलट पारतंत्र्यातही ‘स्वराज्य’ प्राप्त करून घेता येते असा होतो.

गांधीजींना अशाप्रकारे ‘स्वराज्या’चा अर्थ लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता वाटत होती आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षाही कठीण असलेले कार्य करण्यासाठी काँग्रेसइतके दुसरे  लायक संघटन त्यांना दिसत नव्हते. म्हणून काँग्रेसने सध्याच्या स्वरूपाचा त्याग करून ‘लोकसेवक संघा’च्या रूपाने अधिक तेजस्वी रीतीने प्रकट व्हावे आणि हिंदुस्तानच्या सात लाख खेडय़ांत जनजागृती करावी अशी इच्छा त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

अलीकडे ‘काँग्रेस मृत्यूपंथाला लागली आहे’, ‘काँग्रेसचे मरण अटळ आहे’ असा प्रचार चालवला जात आहे. त्याचप्रमाणे ‘काँग्रेसमुक्त  भारता’चे स्वप्नही काही लोक बघत आहेत. एवढेच नव्हे तर गांधींचीही तीच इच्छा होती, असे सांगत गांधींनाही त्यात ओढण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु गांधींची अशा प्रकारची इच्छा अथवा स्वप्न कधीही नव्हते. असणे शक्यही नव्हते. कारण २७ जानेवारी १९४८ च्या म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी लिहिलेल्या पत्रात त्यांनी काँग्रेसबद्दल नि:संदिग्ध शब्दांत आपला अभिप्राय प्रकट केला आहे. ‘हरिजन’च्या १ फेब्रुवारी ४८ च्या अंकात हे पत्र प्रसिद्ध झाले आहे. ‘काँग्रेस नष्ट होऊन चालणार नाही’ अशा शीर्षकाच्या या पत्रात गांधीजी लिहितात-

‘‘काँग्रेस ही भारतातील सर्वात जुनी राजकीय संघटना आहे. देशाला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारी ही संघटना नामशेष होऊन चालणार नाही. जेव्हा राष्ट्राचा अंत होईल तेव्हाच काँग्रेसचा अंत होईल. ही एक जिवंत आणि सतत वृद्धिंगत होणारी व्यवस्था आहे. जिवंत व्यवस्थेची वाढ होते किंवा तिचा मृत्यू होतो. काँग्रेसने राजकीय स्वातंत्र्य मिळवले आहे, मात्र तिला अद्याप आर्थिक, सामाजिक आणि मूल्याधारित स्वातंत्र्य मिळवायचे आहे आणि ते अधिक आव्हानात्मक आहे.’’ (Indian National Congress which is the oldest national political organisation and which has after many battles fought her nonviolent way to freedom cannot be allowed to die. It can only die with the nation. A living organism ever grows or it dies. The Congress has won political freedom, but it has yet to win economic freedom, social and moral freedom. These freedom are harder than the political…)

‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहणाऱ्यांनी आणि गांधींचीही तीच इच्छा होती असे म्हणणाऱ्यांनी, गांधीजींची ही दोन्ही पत्रे वाचावीत.  ‘जेव्हा राष्ट्राचा अंत होईल तेव्हाच काँग्रेसचा अंत होईल,’ हे गांधीजींचे वाक्य त्यांना झणझणीत उत्तर आहे.