तैवानबद्दल बोलणे नकोच, चीनला औद्योगिक-व्यापारी सहकार्य द्याच- नाही तर तुम्ही ‘चीनला जखडण्याचा प्रयत्न’ करताहात… असे चिनी पवित्रे पाहावे लागलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांचीही भूमिका ताठरच होती…
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन हे तीन दिवसांच्या चीनभेटीस अलीकडेच (२४ ते २६ एप्रिल) जाऊन आले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग व चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशीच नव्हे तर प्रथा मोडून चीनचे अंतर्गत सुरक्षामंत्री वांग शियाहाँग यांच्याशीही त्यांची चर्चा झाली; तरीसुद्धा ही भेट चीन-अमेरिका संबंधांतील घसरण रोखण्यात अपयशीच ठरल्याचे दिसले. वास्तविक ब्लिंकेन हे चीनला गेल्या दहा महिन्यांत दोनदा भेट देणारे, अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाचे सर्वांत वरिष्ठ उच्चपदस्थ आहेत. तरीही काही फरक का पडू शकला नाही?
एकतर ब्लिंकेन यांच्या भेटीआधीच बातम्या आल्या होत्या की, रशियाला युक्रेन-हल्ल्यासाठी पैसा पुरवणाऱ्या तब्बल १०० चिनी बँकांची यादीच वॉशिंग्टनने तयार ठेवली असून या चिनी वित्तीय संस्थांवर कधीही निर्बंध लादले जाऊ शकतात. चीनसाठी याहून वाईट बातमी अशी की, सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या काही नेत्यांचीही यादी अमेरिका बनवत असून या चिनी नेत्यांनी अमेरिकेत वा अन्य पाश्चात्त्य देशांत जमवलेल्या मालमत्ता गोठवल्या जाऊ शकतात. शिवाय ब्लिंकेन भेटीआधीच अमेरिकेने युक्रेन, इस्रायल आणि तैवानसाठी ९५ अब्ज डॉलरची युद्धकालीन मदत करण्यास मंजुरी दिली होती.
या पार्श्वभूमीवर, आम्ही काही अमेरिकेच्या कलाने वागणार नाही असा पवित्रा चीनने ब्लिंकेन बीजिंगमध्ये असताना, चर्चांमध्येही घेतला. ब्लिंकेन हे अमेरिकेतर्फे चीनला ‘लक्ष्मणरेषां’त बंदिस्त करण्याच्याच हेतूने आले असल्याचा ग्रह झालेल्या चीनने आधीच आपल्या ‘लक्ष्मणरेषा’ अमेरिकेपुढे आखल्या. या कृतीतून चिनी आकांक्षाही स्पष्ट झाल्या. चीनच्या मूलभूत हितसंबंधांना बाधा न आणता किंवा चीनच्या आर्थिक वाढीला धक्का न लावता संबंध वाढवण्याची भाषा अमेरिकेकडून होत असली तरी चीन त्याकडे संशयानेच पाहणार, हे सांगण्यासाठी अमेरिकी उद्योगांकडून हल्ली ‘फ्रेंडशोअरिंग’च्या नावाखाली अमेरिकेला ‘अधिक विश्वासू’ वाटणारे देश निवडले जात आहेत, याबद्दल चीनने नापसंती व्यक्त केली.
हेही वाचा >>> लेख : आम्हाला काय वाटले असेल?
अमेरिकेचे सातत्यपूर्ण प्रयत्न
बायडेन प्रशासनाने अमेरिकेशी कोणत्याही देशांचे तीव्र मतभेद वा तणाव असू नयेत यासाठी सुरू ठेवलेले प्रयत्न चीनमध्ये २० वेळा झाले आहेत आणि त्यांचा वेग ब्लिंकेनभेटीच्या पाच-सहा आठवड्यांआधी वाढल्याचेही दिसले आहे. अमेरिकी अर्थखात्याच्या मंत्री जानेट येलेन ४ ते ९ एप्रिलपर्यंत ग्वांग्जू आणि बीजिंगमध्ये अनेक उच्चपदस्थांशी चर्चा करताना, चीनची आर्थिक वाढ अमेरिका रोखत असल्याची चिंता कशी व्यर्थ आहे, हेच सांगत होत्या. मग अमेरिकी संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन आणि चिनी संरक्षणमंत्री डाँग जुन यांनी १७ एप्रिल रोजी व्हिडीओसंवाद केला, त्यात डाँग जुन यांनी सरळ तैवानचा विषय काढून, हा चीनचा मूलभूत हितसंबंध असल्याने त्यावर तडजोड नाहीच, अशी भूमिका मांडली. त्याआधी ४ एप्रिल रोजी चीनचे वाणिज्य उपमंत्री वांग शूवेन वॉशिंग्टनला गेले होते. तिथे द्विपक्षीय व्यापार कार्यगटाच्या पहिल्याच बैठकीत वांग शूवेन यांनी अमेरिकेने ‘कलम ३०१’द्वारे चिनी मालावर लादलेल्या करांचा आणि चिनी कंपन्यांमागे चौकशांचा ससेमिराच अमेरिकेने लावल्याचा उल्लेख करून मग, याऐवजी आपल्याला सहयोग वाढवायचा आहे अशी भाषा केली.
या रस्सीखेचीत दणका दिला तो चीनच्या परराष्ट्र खात्यातील ‘अमेरिका व ओशिआनिया विभागा’चे प्रमुख यांग ताओ यांनी. ब्लिंकेन पोहोचण्यापूर्वी २३ एप्रिल रोजी शांघायमध्ये बोलावलेल्या नैमित्तिक पत्रकार-परिषदेचा वापर यांग ताओ यांनी अमेरिकेविरुद्ध सारे नकारात्मक मुद्दे उगाळण्यासाठी असा काही केला, की त्यानंतर ‘ब्लिंकेनना चीनवारी करण्याची काही गरज होती का’ अशी अस्वस्थता खुद्द अमेरिकेत व्यक्त झाली. अमेरिका चीनला जखडण्याचा प्रयत्न करत आहे, चीनच्या अंतर्गत व्यवहारांत ढवळाढवळ आणि चिनी हितसंबंधांची हानी यांमध्येच अमेरिकेला रस आहे… वगैरेवर न थांबता यांग ताओ तैवानवरही भरपूर बोलले. ‘अमेरिका चीन संबंधांत तैवानचा विषय कधीही खपवून घेतला जाणार नाही’ कारण अमेरिकेच्या हालचाली या आधीच ‘तैवानच्या सामुद्रधुनीतील शांतता व स्थैर्य यांना अत्यंत बाधक’ ठरत असल्याचे सांगून, ‘आशिया-प्रशांत क्षेत्र हे जणू आपलेच परसदार असल्याच्या थाटात कोणीही वागू नये आणि हा टापू महाशक्तींच्या महासंग्रामाचे रणांगण ठरू नये’ असा इशाराच या यांग ताओंनी दिला.
हेही वाचा >>> पक्षांतराच्या रोगावरील इलाज मतदारांकडेच
मग झाली ब्लिंकेन आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची तब्बल साडेपाच तासांची चर्चा. या चर्चेत वांग यी स्वत:हून काही वाटाघाट करण्याऐवजी आधीच ठरवलेला मजकूर बोलत होते. हा मजकूर, यांग ताओंच्या वाक्ताडनापेक्षा फार निराळा नव्हता. ‘चीन-अमेरिका संबंधांमध्ये नकारात्मक घटक वाढत आणि साचत आहेत’ कारण ‘विकास घडवण्याचा चीनचा वैध हक्क अवाजवीपणे दडपला जातो आहे’ असाच सूर वांग यींनी लावला. अमेरिकेने चीनच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करू नये, चीनच्या विकासाला खीळ घालू नये आणि चीनचे सार्वभौमत्व, चीनची सुरक्षा आणि विकास यांबाबत कोणतीही तडजोड होणार नाही हे अमेरिकेने ओळखावे, असे वांग यी यांचे इशारे होते.
संयत आणि चढा सूर
याहीनंतर संयत सुरातच ब्लिंकेन पत्रकारांशी बोलले. अमेरिका आणि चीन यांच्यात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या वापराविषयी वाटाघाटींची पहिली फेरी येत्या काही आठवड्यांतच होईल असे ते म्हणाले. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या अमेरिकी विद्यार्थ्यांची संख्या ९०० हूनही कमी आहे, तर अमेरिकेत २,९०,००० हून अधिक चिनी विद्यार्थी आहेत, हा आकडा वाढायला हवा, असे विधानही त्यांनी केले.
पण ब्लिंकेन यांचा भर होता तो ‘चीनमुळे सामोरी आलेली आव्हाने आणि भविष्याबद्दलच्या उभय देशांच्या दृष्टिकोनामुळे वाढलेली स्पर्धा हे अमेरिका स्पष्टपणे पाहाते आहे’ आणि अशा स्थितीत ‘आमचे मूलभूत हितसंबंध आणि मूल्ये यांची जपणूक आम्ही सदैव करू’ हे सांगण्यावर. ‘युक्रेनवर हल्ला चढवून रशियाने आरंभलेल्या युद्धाला प्रोत्साहन देणारी’ सामग्री चीनकडून पुरवली जात असल्याबद्दल आपण गंभीर चिंता चीनकडे व्यक्त केली आहे. ताजे रशियन आक्रमण हे युरोपच्या सुरक्षेला शीतयुद्धकाळानंतर मिळालेले सर्वांत मोठे आव्हान समजले जाते, त्यामुळे त्यास खतपाणी घालणाऱ्यांना युरोपशी संबंध वाढवता येतील याची शक्यता कमीच, असेही आपण सांगितल्याचे ब्लिंकेन म्हणाले (क्षी जिनपिंग यांचा फ्रान्स, सर्बिया आणि हंगेरी दौरा झाला तो यानंतर – ५ ते १० मे रोजी).
रशियाला मदत करण्यापासून चीनने परावृत्त व्हावे, हे सांगताना ‘हा प्रश्न चीनने हाताळला नाही, तर आम्ही तो हाताळू’ असा चढा सूरही ब्लिंकेन यांनी लावला आणि अन्य देशांवर अन्याय करणारी चीनची व्यापारनीती, चिनी कंपन्यांचे अतिउत्पादन यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कृती ‘धोकादायक’ आहेत, असे सांगतानाच ब्लिंकेन यांनी ‘अमेरिकेने फिलिपाइन्सला दिलेली संरक्षणविषयक अभिवचने वज्रलेप आहेत’ याचाही उल्लेख केला. तैवानच्या सामुद्रधुनीत शांतता आणि स्थैर्य राखलेच पाहिजे, हे सांगताना ब्लिंकेन यांनी हाँगकाँग, झिन्जियांग आणि तिबेटमध्ये अमेरिकी नागरिकांना चीनने बेकायदा अटक केली असल्याचाही उल्लेख केला.
थोडक्यात, ब्लिंकेन-भेटनंतरही चित्र बदललेले नसून उलट अमेरिका आणि चीन आपलेच म्हणणे पुन्हा मांडत आहेत. तैवानविषयी अमेरिका अथवा कोणाही अन्य देशाशी चर्चा नाही म्हणजे नाहीच, ही ताठर भूमिका चीनने कायम ठेवली आणि तो ताठरपणा जणू दाखवूनच देण्यासाठी, ब्लिंकेन यांची भेट संपताच तैवानच्या सामुद्रधुनीवर चीनच्या २२ लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्या. चिनी उच्चपदस्थांची भाषा जरी ‘उभयपक्षी विधायक संबंधवृद्धी हवी’ आणि ‘संबंधांना बाधा आणू शकणाऱ्या कृती दोन्ही देशांनी टाळाव्यात’ अशीच असली, तरी चीनने अमेरिकेशी एकंदर पुढल्या संवादासाठी अनुकूल असे वातावरण ठेवल्याचा एकही पुरावा ब्लिंकेनभेटीत तरी दिसलेला नाही.
‘सेंटर फॉर चायना अॅनालिसिस अॅण्ड स्ट्रॅटेजी’चे अध्यक्ष