गणेश मतकरी

मुलांचं जग भाबडं, निरागस समजण्याची आपल्या साहित्यात एक परंपरा आहे. तिला छेद जाईलसं मुलांचं विश्व आपल्याला इथे सापडतं. जे झालं त्याला स्वत: जोनी कितपत जबाबदार होती? तिच्या हल्लेखोरांची त्यात काय भूमिका होती? हे चित्र आपल्यापुढे मांडणाऱ्या अ‍ॅलेकने ते आपल्या फायद्यासाठी विशिष्ट तऱ्हेने मांडलं का? या गुन्ह्य़ाची काहीच जबाबदारी आपल्यापर्यंत पोहोचत नाही का? असे प्रश्नही त्यातून पडतात..

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

डू यू नो व्हॉट हॅपन्ड टू हर ऑलरेडी? ..डिड यू कॅच इट इन द पेपर्स?.. डिड यू सी द रेड-हेडेड, स्टॉक-इमेज मॉडेल जक्स्टपोज्ड अगेन्स्ट अ‍ॅन एडिटेड, चार्ड कॉर्प्स कॅप्शन्ड : ‘‘यू वोन्ट बिलीव्ह व्हॉट दे डिड टू हर?’’.. डिड यू लिसन टू अ पॉडकास्ट? डिड द होस्ट्स मेक जोक्स?..

डिड यू सी पिक्चर्स?

डिड यू लुक फॉर देम?

– एलायजा क्लार्क, ‘पेनन्स’

अकिरा कुरोसावाच्या ‘राशोमॉन’ (१९५०) या प्रख्यात चित्रपटाने ‘राशोमॉन इफेक्ट’ हा शब्दप्रयोग प्रचलित केला. मूळ चित्रपटात होती एक गुन्ह्याची घटना. या गुन्ह्याशी थेट जोडलेले तीन, आणि साक्षीदाराचा चौथा, अशा चार दृष्टिकोनांतून चित्रपटातला गुन्हा आपल्याला दाखवला जातो. पण या चार दृष्टिकोनांपलीकडे जाणारी गुन्ह्याची उकल, त्यामागे दडलेलं निर्विवाद सत्य असं म्हणून वेगळं काहीही दाखवलं जात नाही. याचा अर्थ सोपा आहे. दिग्दर्शकाच्या मते पूर्ण सत्य ही गोष्टच अस्तित्वात नाही. ते दर माणसानुसार बदलतं. व्यक्तिसापेक्ष असणं हाच सत्याचा गुणधर्म आहे. एका घटनेकडे वेगळय़ा नजरेने पाहाता ती वेगळीच भासणं, हा ‘राशोमॉन इफेक्ट’, आणि त्याचा वापर साहित्य, नाटय़, चित्रपट, यात विपुल प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. एलायजा क्लार्कच्या ‘पेनन्स’ या कादंबरीत तो मोठय़ा प्रमाणात आहे, पण तो आजच्या काळाशी ज्या प्रखरतेने जोडला जातो, ती प्रखरता आपल्याला क्वचित पाहायला मिळते. आपण ज्या काळात राहातो आहोत, त्याचं एक भेदक चित्र ही कादंबरी आपल्यासमोर मांडते. क्लार्कची ही दुसरी कादंबरी. याआधी तिची ‘बॉय पार्ट्स’ नावाची कादंबरी गाजली आहे. पण आशय, कथनशैली या साऱ्याच बाबतीत ‘पेनन्स’ तिच्यापेक्षा खूप वेगळी आहे.

‘पेनन्स’ सत्य घटनेवर आधारलेली नसली, तरी तिच्यासाठी वापरलेला फॉर्म आहे तो एका पत्रकाराच्या लेखणीतून उतरलेल्या ‘ट्रू क्राइम’ कथनाचा. आपल्याकडे ‘ट्रू क्राइम इन्डस्ट्री’ अमेरिका, युरोपाइतकी पसरलेली नाही; पण मोजक्या मालिका, पुस्तकं, यांमधून हळूहळू त्याचं दर्शन व्हायला लागलंय. शिवाय ‘ओटीटी’वर येणाऱ्या परकीय मालिकांमधून त्याचा वापर अधिक सफाईने केलेला दिसतो. ब्लॉग्ज, पॉडकास्ट यांमध्येही त्याचा शिरकाव जाणवायला लागला आहे. बेसिकली या माध्यमात लेखक/ होस्ट हा एखाद्या घडून गेलेल्या गुन्ह्याचा नव्याने विचार करून पाहातो. तो गुन्हा घडण्यामागचा कार्यकारणभाव (आणि कधीकधी खरा गुन्हेगारही) शोधण्याचा प्रयत्न त्याने करणं अपेक्षित असतं. गुन्ह्याचा तपशील, मीडिया एक्स्पोजर, संबंधितांच्या मुलाखती, संशोधनातून समोर आलेली नवी माहिती, असल्यास फोटो/ व्हिडीओ, हे सारं पडताळून सत्याची चाचपणी सुरू होते. ‘पेनन्स’मधला इंग्लंडमधल्या समुद्रकिनारी वसलेल्या एका छोटय़ा गावात घडणारा गुन्हा हा तसा भयानक आहे. २३ जून २०१६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमाराला १६ वर्षांची जोनी विल्सन हिला जाळून मारल्याचा आरोप तिच्या वर्गातल्या तीन मुलींवर झाला आणि त्यासाठी त्यांना शिक्षाही झाली. स्थानिक राजकारण्याची श्रीमंत मुलगी अ‍ॅन्जेलिका स्टर्लिग स्टुअर्ट, जोनीची एके काळची जवळची मैत्रीण व्हायलेट हबर्ड, आणि अस्थिर कौटुंबिक वातावरणात मोठी झालेली डॉली हार्ट, या त्या तीन मुली.

हेही वाचा >>>विद्यार्थी कोटातील कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतात, कारण…

ट्रू क्राइम म्हटलं, की जे घडलं ते तपासून पाहाणारा आणि कागदावर उतरवणारा इन्व्हेस्टिगेटर/ लेखक, महत्त्वाचा असतो. इथे ही भूमिका पार पाडतं ते अ‍ॅलेक कॅरेली हे पात्र. कॅरेली पूर्वाश्रमीचा पत्रकार आहे, पण आता तो पूर्णवेळ लेखक आहे, ट्रू क्राइम पद्धतीच्या पुस्तकांचा. ‘पेनन्स’ हे पुस्तक त्याने लिहिलेलं, त्याच्या नजरेतून घडणारं आहे. पण त्याची नजर तरी किती साफ आहे, हा एक प्रश्नच आहे. सुरुवातीलाच एका नोंदीमधून आपल्याला सांगण्यात येतं की आपल्या हातात असलेलं अ‍ॅलेक कॅरेली लिखित पुस्तक प्रकाशित होताच वाचकांनी उचलून धरलं, पण ते वादाच्या भोवऱ्यात सापडायला फार वेळ लागला नाही. अनेक संबंधितांनी अ‍ॅलेकवर अप्रामाणिकपणाचे आरोप केले, आणि शेवटी पुस्तक मार्केटमधून मागे घेण्यात आलं. आता आपल्यापुढे आहे ती नवी आवृत्ती, कायदेशीर बाबींचा निकाल लागल्यावर नव्याने प्रकाशित करण्यात आलेली.

अ‍ॅलेक या बदनाम पत्रकाराला आपला निवेदक करून लगेच त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित करणं, हा लेखिका एलायजा क्लार्कचा मास्टर स्ट्रोक आहे. कारण त्यामुळे आपण वाचतोय त्या वृत्तान्तामधला प्रत्येक घटक संशयाच्या कक्षेत येऊ शकतो. अ‍ॅलेकचा भूतकाळ, त्याची गेली दोन पुस्तकं यशस्वी नसणं, त्याच्या स्वत:च्या मुलीची आत्महत्या, अशी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली प्रत्येक गोष्टच आपल्याला या ‘अनरिलाएबल नॅरेटर’च्या दृष्टिकोनाचा फेरविचार करायला भाग पाडते, आणि त्याने मांडलेल्या जोनीच्या हत्येबद्दलचं सत्य संदिग्ध होत जातं.

आता मुळातही सत्य वाटतं तितकं सरळ नाही. राशोमॉनप्रमाणेच इथेही घडलेल्या गुन्ह्याला बाजू आहेत. पुस्तकाची रचना ही आधी आपल्याला जे घडलं ते थोडक्यात सांगते, आणि मग हळूहळू तिनातल्या एकेका आरोपीवर (आणि एका चौथ्या; आरोपी नसलेल्या, पण झालं त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुलीवरही) आपलं लक्ष केंद्रित करत जाते. अ‍ॅलेकने घेतलेल्या संबंधितांच्या मुलाखती, पॉडकास्ट्स, त्या त्या मुलींनी केलेली विधानं, या जोडकामातून कथा उलगडते. मुलींचा प्रथम जोनीशी संबंध आला त्या दिवसापासून प्रत्यक्ष गुन्हा घडण्याच्या दिवसापर्यंत हा घटनाक्रम हळूहळू पुढे सरकत जातो. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, पुस्तकाच्या सुरुवातीला जोनीवर झालेल्या अन्यायाचा छडा लावायला निघालेल्या निवेदकाचं तिच्यावरून लक्ष हळूहळू हटत जातं, आणि गुन्हेगारांनाच महत्त्व येतं.

अपराधाचं ओझं खरं कोणाच्या डोक्यावर, हा इथला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जोनी आधी वाटते तितकी साधी सरळ नाही, आणि तिच्या हत्येला जबाबदार मुलींनाही त्यांच्या बाजू आहेत. कौटुंबिक पार्श्वभूमी, शाळेतले ताण, पीअर प्रेशर, मानसशास्त्रीय कारणं, मीडियाची भूमिका, सोशल मीडियाचा अतिरेक, अशा असंख्य गोष्टी एकत्र येऊन ही परिस्थिती तयार होते. मग जे घडतं त्याची जबाबदारी एकटय़ादुकटय़ावर देणं योग्य ठरेल का?

हेही वाचा >>>मांघर गावाने केली मधुक्रांती; आता पाटगाव झाले मधाचे गाव…

मुलांचं जग भाबडं, निरागस समजण्याची आपल्या साहित्यात एक परंपरा आहे. तिला छेद जाईलसं मुलांचं विश्व आपल्याला इथे सापडतं. २०१४ मध्ये अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन राज्यात बारा वर्षांच्या दोन मुलींनी आपल्या मैत्रिणीला पाच इंची पातं असलेल्या चाकूने १९ वेळा भोसकलं, आणि हे कृत्य आपण ‘स्लेन्डर मॅन’ या इन्टरनेटवर लोकप्रिय झालेल्या कल्पित हॉरर व्यक्तिरेखेला शांत करण्यासाठी केल्याची जबानी दिली. ही घटना ‘स्लेन्डर मॅन स्टॅिबग’ नावाने ओळखली जाते. ‘पेनन्स’ या घटनेवर आधारलेली नाही; परंतु या घटनेचा संदर्भ पुस्तकात येतो. याशिवाय (अमेरिकेतच, कोलरॅडो राज्यात) कोलंबाईन शाळेत दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या हत्याकांडासारखं ‘चेरी क्रीक मॅसाकर’ हे एक काल्पनिक हत्याकांडही इथे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या घटनेचा आणि त्यातल्या आरोपींच्या व्यक्तिमत्त्वांचा डॉली या पात्रावर मोठा प्रभाव असतो. पण या सुटय़ा घटनांबरोबर शाळेपासून समाजापर्यंत सर्व जागी दिसणारं गढुळलेलं वातावरण, इन्टरनेट-सोशल मीडिया- व्हिडीओ गेम्स-पॉडकास्ट्स यांचा अतिरेक, गुन्हेगारांबद्दल लिहिलं जाणारं रोमॅन्टिक फॅन फिक्शन, स्वत:ची ओळख लपवून क्रौर्याचं प्रदर्शन करण्याचे वाढते मार्ग, सेक्स/ड्रग्ज यांचा वाढता वापर, जेन्डर पॉलिटिक्समधली गुंतागुंत, अशा तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टींचा थेट वा अप्रत्यक्ष प्रभाव या कादंबरीतल्या मुलींवर पडतो आहे. आपण पालक असलो, तर हे चित्र आपल्याला धक्कादायक वाटणं स्वाभाविकच आहे, पण एक माणूस म्हणूनही आपण कोणत्या रस्त्याला लागलो आहोत, हा विचार डोक्यात नाही आला तरच नवल.

शोधपत्रकारितेसारखा फॉर्म असल्याने आपल्यापुढे येणारं गद्य एकाच व्यक्तीने लिहिल्यासारखं नाही, तर ते ट्रान्स्क्रिप्ट्स, बातम्या, मेसेजेस, ब्लॉग्ज, पुस्तकातले उतारे, अशा साऱ्याचा कोलाज असल्यासारखं येतं. पण त्यामुळे आपली लिंक कुठे तुटतेय असं होत नाही. मला वाटतं अलीकडे आपण नेटवरच तासन्तास घालवत असल्याने अशा तुकडय़ातल्या वाचनाचीच आपल्याला अधिक सवय झाली असावी. हा सूर एलायजा क्लार्कने अचूक पकडला आहे. आपल्या गुंतागुंतीच्या मांडणीतून तिने या गुन्ह्याला आणि त्यामागच्या सत्याला एक विराट स्वरूप आणलंय. जे झालं त्याला स्वत: जोनी कितपत जबाबदार होती? तिच्या हल्लेखोरांची त्यात काय भूमिका होती? हे चित्र आपल्यापुढे मांडणाऱ्या अ‍ॅलेकने ते आपल्या फायद्यासाठी विशिष्ट तऱ्हेने मांडलं का? मग तो दोषी मानायचा की नाही? पण मग इतर दोषी लोकांचं काय? सोशल मीडियाचा गैरवापर करणारे? पॉडकास्टमधून पैसे मिळवणारे? क्लिकबेट्समधून आपल्या फायद्यासाठी शोकांतिका हवी तशी विकणारे? सेन्सेशनल हेडलाइन्स देऊन पेपर खपवणारे? असं म्हणावं लागेल, की या सगळय़ांचा दृष्टिकोन हा त्यांचा या ना त्या मार्गाने फायदा करून देणारा! आणि या सगळय़ा रक्तरंजित घटनांमध्ये करमणूक शोधणाऱ्या आपलं काय? एक समाज म्हणून आपण या साऱ्याचे कन्झ्युमर्स. पुरवठा होतो तो शेवटी मागणी असल्यामुळेच ना? मग या गुन्ह्य़ाची काहीच जबाबदारी आपल्यापर्यंत पोहोचत नाही का?

‘पेनन्स’मध्ये एलायजा क्लार्कने आपल्यापुढे ठेवलेला ‘राशोमॉन इफेक्ट’ एखाद्या घटनेच्या, काही गुन्हेगारांच्या पलीकडे जातो. आज आपण राहातोय त्या साऱ्या गढूळलेल्या जगालाच तो कवेत घेऊ पाहाणारा आहे.

पेनन्स

लेखिका : एलायजा क्लार्क

प्रकाशक : फेबर अ‍ॅण्ड फेबर

पृष्ठे : ४४८; किंमत : ७५० रु.