राम माधव

क्षी जिनपिंग हे दहा वर्षांपूर्वी जेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाचे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना – ‘सीपीसी’चे) सरचिटणीस म्हणजेच चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा काहींनी ‘चीनचे गोर्बाचेव्ह’ अशी त्यांची भलामण केली होती. अनेकांना आशा होती की, जियांग जेमिन आणि हू जिंताओ यांची तुलनेने उदारमतवादी धोरणेच क्षीदेखील पुढे नेतील. माओच्या अंतर्गत कम्युनिस्ट हुकूमशाहीतून, सीपीसीला हळूहळू मध्यममार्गी विचारांकडे आणि देखावा म्हणून तरी पक्षांतर्गत लोकशाही तसेच सामूहिक नेतृत्व या दिशेने नेणारी धोरणे त्या दोघांच्या कारकीर्दींत दिसली होती. या उदारमतवादी वैचारिक धारणेची सुरुवात डेंग झियाओपिंग यांच्या कारकीर्दीत अगदी मूलभूत पातळीवरून झालेली होती, म्हणजे डेंग यांनी सर्वशक्तिमान पक्ष-सरचिटणीस आणि राष्ट्राध्यक्ष अशी दोन्ही पदे प्रथेप्रमाणे स्वत:कडे न ठेवता, स्वत:च्या काळात चार राष्ट्राध्यक्ष नेमले होते आणि या चौघाही सहकाऱ्यांनी, डेंग यांच्या उदारमतवादी भूमिकेला पुरेपूर न्याय दिलेला होता. त्यामुळे ही खुली धोरणेच क्षी आणखी पुढे नेणार, असे अनेकांना दहा वर्षांपूर्वी वाटले असणे ठीकच म्हणावे लागेल. परंतु आज दहा वर्षांनंतर, जेव्हा ते पुढील महिन्यात नॅशनल पीपल्स काँग्रेससमोर त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची परवानगी मागताहेत, तेव्हा अनेकांना त्यांच्यामध्ये गोर्बाचेव्ह नसून माओ आणि स्टॅलिनचीच झाक दिसेल.

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

छुपा परिवारवाद!

क्षी यांची गेल्या दशकभराची कारकीर्द केवळ डेंग यांच्या उदारीकरणाशी किंवा लोकशाहीकरणाशीच फटकून आहे असे नव्हे, तर क्षी यांनी स्वत:च्या वडिलांच्या विचारांपासूनही फारकत घेतल्याची साक्ष गेल्या दहा वर्षांतून मिळते आहे. ती कशी, हे पुढे पाहूच. पण आत्ता एवढे नमूद करणे आवश्यक आहे की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षातसुद्धा परिवारवाद बोकाळलेला आहेच आणि तेथील ‘सीपीसी’च्या बऱ्याच सदस्यांचे वाडवडीलही पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा सीपीसीतील नेते होते. जणू वारसाहक्काने पदे मिळवणाऱ्या या नेत्यांची संभावना तिकडे युवराज या अर्थाच्या ‘प्रिन्सलिंग’ अशा शब्दाने केली जाते.

राणीनंतर..ब्रिटनपुढे आर्थिक आव्हानांचा डोंगर

एक मात्र खरे की, इतर ‘युवराजां’च्या वडिलांपेक्षा क्षी जिनपिंग यांचे वडील अधिक प्रख्यात आणि अधिक आदरणीयदेखील होते. क्षी झोंग्झुन हे त्यांचे नाव. त्यांनी क्रांतीच्या काळात आणि त्यानंतर आधुनिक चीनच्या उभारणीत दिलेल्या योगदानाबद्दल चीनमध्ये त्यांचा अतिशय आदर केला जातो. गनिमी संघर्षांदरम्यान ते माओच्या प्रमुख सहकाऱ्यांपैकी एक होते आणि क्रांतीनंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. डेंग झियाओपिंग यांच्या बरोबरीने क्षी झोंग्झुन यांनीही अर्थव्यवस्थेबाबत उदारमतवादी विचार मांडले आणि माओच्या संतापाचा सामना केला. १९६५ नंतर त्यांना अनेक वेळा पक्षाच्या पदावरून हाकलण्यात आले, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि सक्तमजुरीचीही शिक्षा झाली.

माओच्या मृत्यूनंतर झोंग्झुन हे डेंगसोबत पक्षात परतले आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये महत्त्वाचे अधिकारी बनले. क्षी जिनपिंग हे या झोंग्झुन यांचे धाकटे चिरंजीव. वडिलांच्या नावामुळेच या धाकट्या पातीला महत्त्वाच्या संधी मिळत गेल्या. सन २००७ मध्ये पक्षाच्या केंद्रीय समितीत आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती सुनिश्चित करण्यासाठी डेंग-युगातील जुन्या मंडळींचा आशीर्वाद होता.

चीनमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या त्या पदावर पोहोचल्यानंतर मात्र, क्षी जिनपिंग हे त्यांच्या वडिलांच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून आले. माओच्या मृत्यूनंतर तीन दशकांनंतर क्षी जिनपिंग यांनी माओच्या तीन दशकांच्या काळातील भयावह आठवणी परत आणल्या. माओने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाभोवती केंद्रित पक्षाची रचना केली होती. माओच्या ‘निकटतम सहकाऱ्यां’च्या कंपूनेच या काळातील चीनला नियंत्रित केले. त्या काळात पक्षाचे कामकाज माओच्या मनाप्रमाणे चाले. पक्षाच्या बैठकांपूर्वी किंवा ऐन बैठकांमध्येच माओच्या हस्ताक्षरातील एखादे चिटोरे विशिष्ट सदस्यांपर्यंत जाई आणि त्यातून अनेकांचे भवितव्य ठरे. याला केवळ व्यक्तिकेंद्रित राजकारण म्हणायचे की हुकूमशाही एवढाच प्रश्न होता, पण १९७८ मध्ये जेव्हा डेंग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते बनले तेव्हा त्यांनी या दोन्हींचा अंत केला. त्यांनी हू याओबांग, झाओ जियांग, जियांग जेमिन आणि हू जिंताओ (क्षी जिनपिंग यांचे चार पूर्वसुरी) यांसारख्या नेत्यांच्या नवीन पिढीला बळ दिले. सामूहिक नेतृत्व आणि आर्थिक उदारमतवादासाठी डेंग वचनबद्ध होते. डेंग यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या १९८७ सालच्या प्रतिनिधीसभेत (काँग्रेसमध्ये) पदांच्या संख्येपेक्षा जास्त उमेदवार उभे करून पक्षात मर्यादित लोकशाही आणली. अध्यक्षपद दोनच कारकीर्दींसाठी असेल, असे तत्त्वही डेंग यांनीच मांडले.

मोहेंजो दारोवर पुन्हा हवामान बदलाचा घाला?

‘भ्रष्टाचारविरोधी मोहिमे’चे ढोंग!

हे सारे मोडून काढणाऱ्या क्षी जिनपिंग यांनी केवळ माओच्या हुकूमशाही- कंपूशाहीकडेच पुनरागमन केले असे नाही, तर स्टॅलिनच्या निर्दयपणाचाही अवलंब केला. जिनपिंग यांनी अत्यंत क्रूर पाळत ठेवण्याचे राज्य निर्माण केले आणि क्षुल्लक सबबी सांगून विविध स्तरांवरील हजारो पक्ष-कार्यकर्त्यांचे निर्मूलन केले. क्षी यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करण्यासाठी ‘भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम’ ही तर फारच अभिमानास्पद गोष्ट बनली! पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य झोउ योंगकॉंग, पॉलिटब्यूरोचे सदस्य सन झेंगकाई आणि बो झिलाई यांच्यासारखे वरिष्ठ नेते हे गेल्या दशकात शी यांच्या प्रचाराचे बळी ठरलेल्या ४०० हून अधिक नेत्यांमध्ये होते. या कथित ‘भ्रष्टाचारविरोधी मोहिमे’तील ढोंगीपणा उघड आहे. क्षी यांचे जवळचे मित्र आणि स्थायी समिती सदस्य जिया किंगलिन- ज्यांनी क्षी यांच्या उदयात महत्त्वाची भूमिका बजावली होती- ते मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही अस्पर्शित राहिलेले आहेत.

क्षी यांनी मतमतांतरे पायदळी तुडवली आणि इंटरनेट स्वातंत्र्यावर अंकुश ठेवला. एकेकाळी बीजिंगमधील सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये शिकवणाऱ्या काइ क्षिया यांसारख्या अनेक टीकाकारांना चीन सोडावा लागला किंवा तुरुंगात जावे लागले. आर्थिक अपयश आणि महासाथीशी लढण्यात आलेले अपयश अशा दोन्ही आघाड्यांवरील आपले अपयश लपवण्यासाठी क्षी यांनी चमकदार प्रचार केला. पक्षाच्या स्थायी समितीमध्ये स्वत:च्या विश्वासूंनाच स्थान देण्याचे पाताळयंत्री यश त्यांनी सहज मिळवले. वास्तविक ही एक महत्त्वाची संस्था – कारण याच स्थायी समितीच्या हाती क्षी यांना आणखी पाच वर्षांचा (वा त्याहून अधिक वर्षांचा) कालावधी द्यायचा की नाही, याविषयी निर्णय घेऊ शकते. चिनी सैन्यदलांतील अधिकारपदांवरही क्षी यांची वक्रदृष्टी गेली. इथे त्यांच्याशी कमी निष्ठावान असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी निर्दयपणे गच्छन्ती केली आणि मुख्य पदांवर स्वतःच्या निष्ठावंतांची वर्णी लावली.

अति-आत्मविश्वासामुळेच घात होणार ?

या असल्या कारवायांमुळेच, पुढील महिन्यात होणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीसभेच्या महाबैठकीमध्ये स्वत:चे भवितव्य ठरणार, हे माहीत असूनसुद्धा क्षी जिनपिंग अगदी आत्मविश्वासाने वावरताना दिसताहेत. त्यांचा उत्साह तर अगदी ‘काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या’ असाच दिसतो. पण सत्तेने काठोकाठ भरलेला हा प्याला त्यांच्याच हाती राहणार की फेस दगा देणार, हे अद्याप ठरायचे आहे. पंतप्रधान ली केकियांग हे सर्वोच्च पदाचे दावेदार म्हणून आव्हानाच्या भूमिकेत राहिले आहेत. केकियांग यांच्या आधीचे दोघे पंतप्रधान- झू रोंगजी आणि वेन जियाबाओ – हे दोघेही त्या-त्या वेळच्या सर्वोच्च नेत्यांची तळी उचलणारेच होते. पण केकियांग हे क्षी जिनपिंग यांच्यासारख्या नेत्यापासून अंतर राखतात. कोविड संकट हाताळण्याबाबत त्यांचे नेत्याशी असलेले मतभेद चिनी लोकांना माहीत आहेत. गेल्या मे महिन्यात समाजमाध्यमांवरून केलेल्या भाषणात तर या केकियांग यांनी स्पष्टच घोषित केले की चीनची अर्थव्यवस्था गंभीर परिस्थितीत आहे. या स्पष्टोक्तीनंतर क्षी यांच्या समर्थकांची मळमळ वाढली आहे.

चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाच्या नेतृत्वाने राष्ट्राध्यक्षांकडे प्रचंड अधिकार पूर्वापार दिलेले आहेत. पण या अधिकारांना किती मनमानीपणे वापरायचे, याला अर्थातच मर्यादा असतात आणि सर्वच राष्ट्राध्यक्षांकडून त्या ओळखल्या जातात. क्षी यांना आत्मविश्वास मात्र इतका अधिक की, चिनी लष्कराच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी- पीएलए) उत्तरी क्षेत्राचे कमांडर वांग कियांग यांना अलीकडेच एका जनरलपदी बढती देण्यात आली. यामुळे सैन्यात किरकोळ बंडखोरी झाली, असेही ऐकिवात आहे.

समलैंगिकांबाबत कायद्याने त्याची जबाबदारी ओळखली, आपण ओळखली का?

मुख्य म्हणजे, क्षी यांच्या कोविड लॉकडाऊनच्या हाताळणीबद्दल लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. सुमारे दीड वर्षभराच्या या टाळेबंदीमुळे चिनी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. चिनी समाजमाध्यमांवरल्या वाढत्या उपरोधाकडे नजर टाकली तरी क्षी यांच्या तथाकथित ‘लोकप्रियते’चा फुगा किती तकलादू झाला आहे ते कळू शकेल. कोविड महासाथ जेव्हा ऐन भरात होती, तेव्हा तर चीनमध्ये असा संदेश फिरत होता की आता लवकरात लवकर चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीसभेची महाबैठक बोलवा आणि नवा नेता निवडा. हे वातावरण जरा निवळते तोच, अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानमध्ये थडकून, क्षी यांचे पितळ उघडे पाडले. यानंतर तर क्षी यांच्यावरील टीकेला महापूरच आला.

पण क्षी काही या टीकेला बधण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. अति-राष्ट्रवादाचा देखावा हवा तेव्हा उभारायचा, हे त्यांचे अमोघ अस्त्र आहे. हेच अस्त्र त्यांनी अमेरिकेविरोधात वापरले आणि चीन ‘अजिंक्य’ असल्याचे घोषित केले. त्यातच क्षी यांचा चीन हा तैवानशी युद्ध करण्यास उतावीळ आहे, त्यामुळे एकतर त्यांचेच नेतृत्व नष्ट होईल किंवा जगाला एका भीषण संघर्षाच्या खाईत ढकलले जाईल.

थोडक्यात काय तर, यंदा येणारा चिनी हिवाळा जगासाठी फारच तापदायक ठरणार आहे… हिवाळा हा खरे तर थंडीचा ऋतू, पण यंदाच्या चिनी हिवाळ्याचा ताप मात्र इतका असू शकतो की जगाला त्याची दखल घ्यावी लागेल.

लेखक भाजपचे माजी सरचिटणीस व ‘इंडिया फाऊंडेशन’चे संचालक आहेत.