सद्गुरू शिष्याला अल्प धारिष्टय़ाच्या बदल्यात कोणतं मोठं दान देतो, हे सांगताना मनोबोधाच्या ३६व्या श्लोकाच्या तिसऱ्या चरणांत सद्गुरूचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, ‘‘सुखानंदआनंदकैवल्यदानी!’’  हा सद्गुरू सुखानंद, आनंद आणि कैवल्य अर्थात मोक्ष यांचा दाता आहे! नीट लक्षात घ्या, सुख, आनंद आणि मोक्ष या तीन गोष्टी सांगितलेल्या नाहीत. प्रत्यक्षात दोनच गोष्टी सांगितल्या आहेत! आनंद आणि मोक्ष!! हा आनंद मात्र दोन प्रकारचा सांगितला आहे.. एक आहे तो निव्वळ आनंद आणि त्याआधी आहे तो सुखानंद.. सुखाचा आनंद! थोडं चकायला होतं ना? नुसतं सुख का नाही म्हटलं, सुखाचा आनंद का म्हटलं आहे? हे जाणण्यासाठी या चरणाकडे नीट लक्ष देऊ. या चरणात दानाचे तीन स्तर सांगितले आहेत. पहिला स्तर आहे तो सुखाचा आनंद, दुसरा स्तर आहे तो आनंद आणि तिसरा स्तर आहे तो मोक्ष. यातला पहिला सुखानंद स्तर हा भौतिकाच्या प्रभावातून सुटत अध्यात्माच्या वाटेवर स्थिर होत असलेल्या साधकासाठी फार महत्त्वाचा आहे. दुसरा आनंद स्तर हा सद्गुरूमयतेकडे वाटचाल करणाऱ्या शिष्याचा आहे तर सद्गुरूमय झालेल्या शिष्याच्या आंतरिक स्थितीचा मोक्ष हा तिसरा स्तर आहे! आता नुसतं सुख का नाही म्हटलं? सुखाचा आनंद का म्हटलं आहे? फार सूक्ष्म गोष्ट आहे. साधनमार्गावर येण्याआधी आपली सुखाची कल्पना स्पष्ट होती आणि साधनमार्गावर आल्यावर सुखाची कल्पना धूसर झाली! विसंगत विधान वाटतं ना? जेव्हा साधना करीत नव्हतो तेव्हा सुखाची कल्पना स्पष्ट कशी असेल? पण खरंच तसंच आहे. सुख म्हणजे भौतिक सुख याबाबत आपल्या मनात गोंधळ नव्हता, ही सुखाबाबतची स्पष्ट कल्पना! साधन मार्गावर आल्यावर भौतिक सुखाची ओढ कमी झाली किंवा त्या सुखाचा प्रभाव कमी झाला तरी पूर्ण संपुष्टात मात्र आला नाही. त्यामुळे भौतिक सुखही हवं आणि आध्यात्मिक सुखही हवं, अशी मनाची दुहेरी स्थिती झाली. म्हणून ही धूसर कल्पना! त्यातही गंमत अशी की सुरुवातीला भौतिक सुख हवंच आणि आध्यात्मिक सुखही मिळालं तर चांगलं, अशी वृत्ती असते. अर्थात भौतिक सुखासाठी मन जितकं आसुसलं असतं तितकं ते आध्यात्मिक सुखासाठी तळमळत नसतं. याचं कारण आध्यात्मिक सुखाचा अनुभवच नसल्यानं त्याची ओढ नसते. आता आणखी गंमतीचा भाग असा की आवडत्या वस्तू आणि आवडत्या व्यक्तिंचा लाभ हाच भौतिक सुखाचा पाया असतो. तरीही असंही दिसून येतं की सुखाची अशी साधनं असूनही माणूस दु:खी असू शकतो! याचाच अर्थ सुख असूनही माणूस आनंदी असतोच असं नाही!! रोज पंचपक्वान्नांचं भोजन करता येईल इतकी ऐपत आहे, पण मधुमेह आहे.. तेव्हा पहिल्या स्तरावरच्या साधकाला सद्गुरू खरं सुख कोणतं, याची जाणीव करून देतात. जे आहे त्यात सुखी होण्याची कला शिकवतात. सद्गुरू जीवनात येण्याआधी सुखाची साधनं असूनही सुख नव्हतं, जे आहे त्यात सुख नव्हतं, किती मिळालं म्हणजे पुरे, हे माहीत नसल्यामुळे कितीही मिळालं तरी पुरत नव्हतं आणि त्यामुळेच कितीही मिळालं तरी त्याचं सुख नव्हतं! आता जे आहे त्यातही सुखी होता येतं, ही जाणीव सद्गुरूंमुळेच होते. मग ‘‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या।।’’ अशी आंतरिक सुखाची स्थिर स्थिती प्राप्त होते. मग श्रीमंती आली तरी ती भोगताना किंवा गरिबी आली तरी ती भोगताना आंतरिक धारणेत किंचितही पालट होत नाही. सुखाचा खरा आनंद भोगता येतो आणि दुसऱ्यांना वाटताही येतो. सुख वाटण्यातल्या आनंदाचाही अनुभव प्रथमच येऊ लागतो.

– चैतन्य प्रेम

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…