माणसाची स्मृती हे त्याला लाभलेले नैसर्गिक वरदान आहे, काही वेळा कटू स्मृती हैराण करतात तर मधुर स्मृती अत्तराच्या कुपीसारख्या सुगंध देत असतात. मानवी स्मृतीचे कोडे सोडवण्यासाठी गेली ५० वर्षे संशोधनाला समर्पित करणारे मेंदू संशोधक रिचर्ड   एफ थॉमसन यांनी मोठी कामगिरी केली. आता ते स्मृतीच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाने एक मोठा प्रेरणास्रोत व मेंदूविज्ञान संशोधनातील अग्रणी गमावला आहे. मेंदूत शारीरिक पातळीवर स्मृती कुठे व कशा साठवल्या जातात, याचा उलगडा करणारा वैज्ञानिक म्हणून ते सर्वाच्या लक्षात राहतील. स्मृतिमंडले शोधण्यासाठी त्यांनी सशांवर प्रयोग केले होते. इव्हान पावलोव या रशियन वैज्ञानिकाने मेंदूतील मंडले (सर्किट्स) कशी तयार होतात यावर काम केले   होते, तेच काम थॉमसन यांनी पुढे नेले, पण त्यांनी काढलेले निष्कर्ष नवे होते. सशाच्या डोळ्यांवर  हवेचा झोत टाकला, तर ते डोळे मिचकावत नंतर बीप असा आवाज केला जाई, नंतर या सशांना अशी  सवय झाली की हवेचा झोत नाही आला व नुसते         बीप वाजले तरी ते डोळे मिचकावत असत. थॉमसन यांनी त्यांच्या मेंदूतील अनुमस्तिष्क (सेरबेलम)मधील एक घटक वेगळा काढला, तेव्हा मात्र सशांनी डोळे मिचकावणे बंद केले, याचा अर्थ मेंदूतील अनुमस्तिष्क या भागाशी त्यांच्या स्मृतींचा संबंध         होता. थॉमसन यांनी किमान सहा पुस्तके व साडेचारशे शोधनिबंध लिहिले होते. १९८७ मध्ये स्टॅनफर्ड व हार्वर्ड येथे त्यांनी अध्यापन केले. द अमेझिंग ब्रेन अँड मेमरी – द की टू कॉन्शसनेस, फाउंडेशन्स ऑफ फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी यांसारखी पुस्तके त्यांनी लिहिली. आपला मेंदू मागच्या अनुभवातून शिकून सतत विकसित होत असतो. त्यातून आकलन, स्मृती व समजशक्ती वाढत असते हा त्यांच्या संशोधनाचा अर्थ होता. रिचर्ड फ्रेडरिक थॉमसन यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३० रोजी ओर पोर्टलँडमध्ये झाला होता. त्यांनी रीड महाविद्यालयातून मानसशास्त्राची पदवी घेतली व नंतर विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातून डॉक्टरेट केली. २०१० मध्ये त्यांचा अमेरिकन सायकॉलॉजिकल फाउंडेशनचे जीवनगौरव सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. त्यापूर्वी २००७ मध्ये त्यांना, कार्ल स्पेन्सर लॅशले यांच्या नावाने दिला जाणारा मेंदूविज्ञानातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. मेंदूत स्मृती कुठे दडलेल्या असतात, हे शोधण्यासाठी त्यांनी ३० वर्षे एक प्रकल्प राबवला होता, आता तो अंतिम टप्प्यात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ज्युडिथ व तीन मुली आहेत.  त्यांच्या पत्नी ज्युडिथ याही मेंदू वैज्ञानिक आहेत व त्यांनी बिहेविअरल न्यूरोसायन्सवर (वर्तनात्मक मेंदूविज्ञान) शोधनिबंध लिहिला होता.