गौरव सोमवंशी

e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Deepak Mohanty expressed his opinion about the economic and financial situation in the country
बचतकर्ता ते गुंतवणूकदारांचा देश, इष्टतम स्थित्यंतर; ‘पीएफआरडीए’चे मोहंती यांचे बदलत्या वित्तचित्रावर भाष्य
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
Bill Gates seen dropping a mosquito made of Lego from a tall building
Bill Gates : बिल गेट्सनी उंच इमारतीवरून फेकला भलामोठा डास? डासांच्या पंखांच्या ठोक्यांद्वारे ओळखणार कोणता आहे आजार; पाहा VIDEO
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
Police deployment, badlapur, Rumors
बदलापूरातील चिमुकलीच्या प्रकृतीची अफवा अन् रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ठाणे पोलिसांचे आवाहन

पैशांची ऑनलाइन देवाण-घेवाण आताशा सवयीची झाली असली, तरी अशा व्यवहारांबाबत अनेकांच्या मनात शंका असतातच. कधी त्या परस्परांवरील अविश्वासामुळे असतात, तर कधी ऑनलाइन सुविधांच्या काटेकोरपणाची खात्री नसल्याने.. मग नियमन करणारी कोणतीही व्यवस्था नसताना ‘बिटकॉइन’चे व्यवहार निर्धोक कसे होतात?

आजच्या आणि पुढील काही लेखांमध्ये ‘बिटकॉइन’ या चलनाविषयी माहिती घेऊ या. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान पूर्णपणे समजून घ्यायचे तर ‘बिटकॉइन’ला ओलांडून पुढे जाणे अशक्य. हेही शक्य आहे की, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान पूर्णपणे समजून घेतल्यानंतर ‘बिटकॉइन’ या आभासी चलनामध्ये फार गुंतून पडण्याची आवश्यकता नाही असे वाटेल. परंतु ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान स्वतंत्रपणे वापरण्याची क्षमता विकसित होण्यासाठी ‘बिटकॉइन’ हे चलन, त्याची निर्मिती, त्याचा प्रवास जाणून घेणे आवश्यकच ठरते. मात्र ते जाणून घेताना पहिले सत्य ध्यानात घ्यावे लागेल की, ‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. याआधीही पाहिल्याप्रमाणे फेसबुक आणि इंटरनेट यांच्यात जो संबंध आहे, तसाच संबंध ‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानात आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी एकच आहेत असा संभ्रम नको. एकदा का ‘बिटकॉइन’ समजून घेतले, की पुढे आपण ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार आणि त्यानंतर त्या अनेक प्रकारांचे प्रयोग-उपयोजनाकडे वळायला मोकळे!

तर सुरुवात करू या ‘बिटकॉइन’पासून..

प्रथम एक पाऊल मागे येऊ. जागतिक पातळीवरील या आभासी चलनाकडे थेट वळण्याआधी आपल्या हल्लीच्या दैनंदिन व्यवहारांचे एक उदाहरण पाहू. जेव्हापासून यूपीआय (म्हणजे युनिफाइड पेमेन्ट्स इन्टरफेस.. एकात्मिक भरणा पद्धती) बऱ्यापैकी प्रचलित झाले आहे, तेव्हापासून मोबाइलद्वारे ऑनलाइन पैसे देणे-घेणे हे बरेच प्रचलित झाले आहे. समजा, तुम्ही एका किराणा दुकानातून दूध, अंडी, ब्रेड वगैरे विकत घेतले. तुमच्याकडे पाकिटात रोकड नसेल, त्यामुळे तुम्ही दुकानदाराला ऑनलाइन पेमेन्टची सुविधा आहे का म्हणून विचारता. मग दुकानदार तुम्हाला काही आकडे किंवा क्यूआर कोड दाखवतो, त्यानुसार तुम्ही पैसे पाठवता. अनेकदा अशा व्यवहारात पैसे पाठवल्यावर दुकानदार ग्राहकाच्या मोबाइल स्क्रीनवर त्याची खात्री करून घेतोच आणि स्वत:च्या मोबाइलवरसुद्धा पैसे जमा झाल्याची खात्री होत नाही तोपर्यंत ग्राहकाला थांबवून ठेवतो. विशेषत: अनोळखी गिऱ्हाईक असेल, तर शहानिशा करणे अनेकदा घडतेच.

ही शहानिशा अनेक वेळा का केली जाते? कधी आपल्याला हातातील तंत्रज्ञानावर भरवसा नसतो, कधी आपल्या बँकेच्या ऑनलाइन सुविधांवर विश्वास कमी असतो, तर कधी समोरच्या व्यक्तीकडून नकळत काही चूक होऊच शकते अशी शक्यता वाटते किंवा समोरील व्यक्ती नुसते पैसे पाठवले असे सोंग करून निघून जाऊ शकते.. अशा निरनिराळ्या शंका मनात असतात. मेहनतीने कमावलेल्या पैशाला सांभाळून ठेवणे आणि त्यात कुठे अनवधानानेसुद्धा नुकसान न होऊ देणे, ही मानसिकता असणे तर अगदी स्वाभाविक आहे.

या पार्श्वभूमीवर विचार करा की, ‘बिटकॉइन’ हे चलन कसे काम करत असेल? तांत्रिकदृष्टय़ा त्याविषयीची माहिती पाहूच; परंतु वर दिलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने ते समजून घेण्याचा प्रयत्न करू या. यात अनेकदा तुम्हाला समोरच्या व्यक्तीची ओळख माहीत नसेल; जसे की ‘बिटकॉइन’मधील पहिले ‘बिटकॉइन’ ज्या नावावर (सातोशी नाकामोटो) आहेत, त्याबद्दल आजवर ठोस काही समजलेले नाही. सातोशी नाकामोटो नक्की कोण आहे, एक व्यक्ती आहे की समूह आहे, याबद्दल नेमकी माहिती कोणाकडेही नाही. पण त्या नावाशी निगडित जे ‘बिटकॉइन’चे खाते आहे, त्या खात्यातून आजपर्यंत कोणकोणते व्यवहार झाले हे मात्र कोणालाही पाहता येते. आता त्या खात्यात किती ‘बिटकॉइन’ उरले आहेत, शेवटचा व्यवहार कधी/ कोणत्या खात्यासोबत झाला होता, हे सगळे जगजाहीर आहे.

परंतु समजा, तुम्ही एखाद्याला ‘बिटकॉइन’ देऊन त्या बदल्यात काही ऑनलाइन खरेदी केली आणि पुढे काही चुकले तर? आपल्याकडे अनेक चलती असलेल्या दुकानांत ‘आमची शाखा कोठेही नाही’ हे सांगणारी पाटी लावलेली असते. बिटकॉइनच्या बाबतीत पाहिल्यास, यात एकसुद्धा शाखा नाही, कोणी एक मालक नाही किंवा कोणते ‘कस्टमर केअर’सुद्धा नाही! इतकेच नव्हे, तर तुम्ही ‘बिटकॉइन’चे व्यवहार हे जगातील कोणाही व्यक्तीसोबत, कुठेही करू शकता. अमेरिकेत बसलेला माणूस आफ्रिकेतल्या माणसाशी, भारतीय माणूस मेक्सिकोतल्या माणसाशी देवाण-घेवाण करू शकतो. दुसरे म्हणजे, तुमचे एखाद्याशी शंभर व्यवहार होतील, पण तुम्हाला त्यास व्यक्तिश: भेटण्याची वेळ येणार नाही, असेही होऊ शकते. कधी काही चुकले तर कोणी व्यक्ती किंवा संस्थाही नाही फोन करून जाब विचारायला. अशी परिस्थिती असतानाही दिवसाला जवळपास तीन लाखांहून अधिक स्वतंत्र व्यवहार, म्हणजे ‘बिटकॉइन’ची देवाण-घेवाण होते. इतक्या मोठय़ा प्रमाणावरील हे व्यवहार लोक नेमक्या कोणत्या विश्वासावर करीत आहेत? ..आणि हे २००९ पासून सुरू आहे.

‘बिटकॉइन’वर अर्थशास्त्र वा समाजशास्त्राच्या अनुषंगाने सखोल अभ्यास वा टीका होऊ शकते; पण आपण या आणि पुढील काही लेखांमध्ये ‘बिटकॉइन’ तांत्रिक बाजूने समजून घेऊ या. म्हणजे आपण स्वत:ला हे प्रश्न विचारू की- जर मी बँका, अधिकारी, सरकार, कोणतीही मध्यवर्ती संस्था, देशांच्या सीमा.. या साऱ्या गोष्टींना वगळून कोणासोबतही कुठेही, कधीही आर्थिक व्यवहार करू इच्छितो, तर या मार्गावर तंत्रज्ञान कुठपर्यंत साथ देईल? तंत्रज्ञान कुठे कामाला येईल, कुठे कमी पडेल? आपण मागील लेखांमध्ये पाहिलेल्या कोणकोणत्या तांत्रिक संकल्पनांचा आपल्याला उपयोग होईल? या प्रश्नांची उत्तरे शोधत ‘बिटकॉइन’कडे वळणे योग्य ठरेल. यामुळे अर्थव्यवस्था, वित्तव्यवस्था आणि समाज यांवर काय परिणाम होईल, हा पुढील अभ्यासाचा भाग त्यानंतरच्या चर्चेचा विषय. पण त्याआधी हे तर पाहू या की, असा आभासी चलनावर आधारित व्यवहार खरेच फक्त तंत्रज्ञानाच्या जोरावर शक्य आहे का?

अर्थात, ‘बिटकॉइन’ आणि इतर कूटचलनांमुळे (क्रीप्टो करन्सी) आपल्या जीवनावर होणारा परिणाम हा अत्यंत प्रखर आणि तीव्र स्वरूपाच्या चर्चेचा विषय आहेच. उदाहरण द्यायचे झाले तर, ‘बिटकॉइन’ हे कोणा एकाच्या मालकीचे नसले आणि ते वितरित (डिस्ट्रिब्युटेड) स्वरूपात अस्तित्वात असले, तरी मागील वर्षी केम्ब्रिज विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासानुसार, ‘बिटकॉइन नेटवर्क’ जगभर विविध संगणकांत किंवा सव्‍‌र्हरमध्ये कार्यरत असून या संपूर्ण नेटवर्कचा एका दिवसाचा वीज वापर हा स्वित्झर्लंड देशाच्या वीज वापरापेक्षा जास्त आहे. मग याने पर्यावरणाला काही धोका उद्भवतो का? तो टाळणारे नवीन प्रकारचे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आहे का? ‘बिटकॉइन’च्या व्यवहारांत स्वत:ची ओळख हवी असल्यास बऱ्यापैकी लपवता येते (सातोशी नाकामोटोप्रमाणे!); मग याने काही वाईट हेतूंना मार्ग मोकळा होतो का? ‘बिटकॉइन’ची वर-खाली होणारी किंमत चलन म्हणून सामान्य आहे की धोक्याची घंटा? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणण्याचा प्रयत्न आपण पुढील काही लेखांमध्ये करूच; पण त्याआधी मागील काही लेखांत पाहिलेल्या तांत्रिक संकल्पना (उदा. डिजिटल स्वाक्षरी, हॅशिंग, प्रूफ ऑफ वर्क, इत्यादी) आणि कूटशास्त्रा(क्रीप्टोग्राफी)तील आणखी काही संकल्पनांच्या साहाय्याने ‘बिटकॉइन’ची तांत्रिक बाजू समजावून घेऊ.

त्यासाठी ग्रँट सॅण्डर्सन यांनी काही वर्षांपूर्वी मांडलेले हे सुरेख उदाहरण विचारार्थ.. चार व्यक्ती आहेत. त्यांना एकमेकांत काही व्यवहार करायचा आहे. समजा, त्या चार व्यक्ती एकत्र राहात आहेत. त्यांची नावे- एलिस, बॉब, चार्ली आणि डीलन! या चौघांचे एकमेकांत आर्थिक व्यवहार होत राहतात. हळूहळू त्यांचा एकमेकांवरील विश्वास कमी होत जातो. पण विश्वासाची ती कमतरता भरून काढण्यासाठी ते तंत्रज्ञान, कूटशास्त्र आणि आकडय़ांचा आधार घेतात..

याच साध्या-सोप्या उदाहरणावरून आपण एक-एक पाऊल पुढे टाकत थेट ‘बिटकॉइन’च्या कार्यप्रणालीपर्यंत जाऊ या!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io