लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४६ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. प्रचंड उन्हाळा असूनही हजारो भाविक उष्म्याचा असह्य त्रास बाजूला ठेवून श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक झाले. दुपारी अक्कलकोट राजघराण्याच्यावतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री चरणी महानैवेद्य अर्पण केला. भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातही धार्मिक विधी होऊन हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला.
वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात पहाटे काकडारतीसह अन्य धार्मिक विधी झाल्यानंतर स्वामी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हाचे चटके बसून नयेत म्हणून मंदिर समितीने दूर अंतरापर्यंत सावलीसाठी कापडी मंडप उभारून सोय केली होती. मंडपात शीतपेय, जलपानाचीही सेवा रुजू करण्यात आली होती. तसेच उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी इतर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सकाळीपासून उन्हाचे चटके बसत होते. दुपारच्या तपळत्या उन्हातही स्वामी दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच होता. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी श्री चरणी नैवैद्य अर्पण केला. त्यानंतर अक्कलकोट राजघराण्याच्या पूर्वापार परंपरेनुसार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी मंदिरात येऊन श्री चरणी महानैवेद्य अर्पण केला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे आणि सचिव आत्माराम घाटगे यांच्यासह विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वला सरदेशमुख आदींची उपस्थिती होती.
यानिमित्ताने मंदिरात सोलापूर, पंढरपूर, लातूर, बार्शी, सांगोला आदी भागातून ४६ भजनी मंडळांनी भजनसेवा रुजू केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे आदींनी श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतले.
दुसरीकडे शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या सहा दिवसांपासून श्री स्वामी समर्थ रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विधिवत पूजाविधीसह पारायण आदी कार्यक्रम झाल्यानंतर मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजै भोसले यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक म्हशीलकर आदींच्या हस्ते श्री अन्नपूर्णा व महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. अन्नछत्र मंडळातील नैवेद्य वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात अर्पण करण्यात आला. त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.