‘प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ व आधुनिक काळ या सर्वाना पूज्य अशी काही जीवनमूल्ये आहेत, हे ज्यांना मान्यच करवत नाही, त्यांना विनोबा हे आधुनिक जगात महत्कार्य करू शकतील किंबहुना ते तसे आजही करत आहेत हे पटवून देणे फार कठीण आहे. पण ते त्यांना पटले नाही, तरी भारतीय जनतेला विनोबांचे महत्कार्य पटू लागले आहे.’- आचार्य जावडेकर,‘ब्रह्मर्षी विनोबा’ या लेखातून.

नैतिकता आणि रचना, सत्याग्रह आणि रचनाग्रह यांचा मेळ विनोबांनी कसा घातला याचा विचार केला तर त्यांचा व्यापक राजकीय विचार दिसतो.
विनोबांनी साम्यवादावर जे चिंतन केले, ते सर्व इथे देणे शक्य नाही. ‘साम्यवाद की साम्ययोग’ या पुस्तकात या विषयावरील त्यांची जवळपास संपूर्ण भूमिका आली आहे. ज्या काळात ते समाजकारणात उतरले त्या काळातील बहुतेक महत्त्वाचे नेते रशियातील क्रांतीने भारावले होते. स्वतंत्र भारताची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या नेहरूंवर तर समाजवादी विचारसरणीचा स्पष्ट प्रभाव होता. समाजवादी विचारांचा प्रभाव वाढत होता तेव्हा विनोबा कुठे होते?

‘प्रथम सत्याग्रही’ म्हणून गांधीजींनी त्यांची निवड करेपर्यंत अगदी मान्यवर नेत्यांनादेखील त्यांच्याविषयी माहिती नव्हती.
पुढे देश स्वतंत्र झाला तेव्हाचा हिंसाचार कुणाच्या स्वप्नातदेखील नव्हता. अशा स्थितीत विनोबांबद्दल माहिती घेण्याची फारशी गरज नसेल तर ते स्वाभाविक होते. फार तर ‘आध्यात्मिक गांधीवादी’ अशी त्यांची ओळख होती. अगदी आजही त्यांना गांधीजींचा ‘आध्यात्मिक’ वारसदार असे चटकन म्हटले जाते.

या दुर्लक्षामागे थोडा इतिहास आहे. १९१६ ते १९४० या काळातील विनोबांचे आयुष्य खूपसे अज्ञात आहे. १९४० मध्ये ते लोकांच्या समोर प्रथम सत्याग्रही म्हणून आले. खुद्द गांधीजी आणि नारायणभाई देसाई यांनी त्यांचा परिचयात्मक गौरव केला आणि जनतेला विनोबांचा परिचय झाला.
गांधीजींची हत्या आणि नंतर देशाच्या विविध भागांत उसळलेला हिंसाचार, जोडीला एक युद्ध या स्थितीत काय करायचे हे ठरवण्यासाठी नेतेमंडळी वध्र्याला पोहोचली. मार्गदर्शक म्हणून सर्वानी विनोबांची निवड केली.

विनोबांनी ही जबाबदारी स्वीकारली. काम करायचे, ते चित्तशुद्धीसाठी, हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. ही तात्त्विक भूमिका काँग्रेस, गांधीजी आदींवर सर्वस्वी अवलंबून नव्हती. गांधीजींच्या हत्येनंतर पूर्णपणे अविचल राहिले ते केवळ विनोबा! ‘दुसरा गांधी’ होण्याची संधी चालून आली असतानाही त्यांनी त्यास नकार दिला.

स्वातंत्र्य मिळाले पण सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले होते. त्यातूनच उपजीविकेचे साधन हवे यासाठी त्यांना भूदानाचे दर्शन झाले. त्याच वेळी अिहसा (सत्य, प्रेम आणि करुणा) आणि इतरही नैतिक मूल्ये पुन्हा एकदा रुजवणे गरजेचे होते. नीतीला किमान सुबत्तेची गरज होती. हा विचार घेऊन विनोबांनी आश्रम सोडला आणि एक तपाहून अधिक काळ त्यांनी भारतभ्रमण केले.

संतांची नैतिकता, भिन्न राजकीय विचारसरणीशी संवाद आणि प्रमाण मानलेल्या तत्त्वांचे आचरण अशी समाजपरिवर्तनाची त्रिसूत्री ते जगले.- अतुल सुलाखे
jayjagat24 @gmail.com