स्वामी स्वरूपानंद यांच्या १९३५पर्यंतच्या चरित्राचा स्थूलविशेष आपण गेल्या काही भागांत पाहिले. आता स्वामींचं प्रथमच दर्शन घेणाऱ्यांना ते कसे दिसत असत? कसे भासत असत? अनेकांनी त्याबाबत वर्णन केलं आहे. पण त्यातून स्वामींच्या आंतरिक स्थितीची जाणीव होणारी माणसं फार थोडी होती. त्यातलेच एक महादेव दामोदर भट. ‘स्वामी स्वरूपानंद : एक अलौकिक राजयोगी’ (प्रकाशक – जोशी ब्रदर्स, पुणे, १९७६) या त्यांच्या पुस्तकात स्वामींच्या प्रथम दर्शनाचं विलोभनीय चित्रण आहे. कोकणच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत भट यांचा पावसकडचा प्रवास सुरू होता. वाटेत एसटीमध्ये स्वामी स्वरूपानंदांचं नाव त्यांच्या तोंडून ऐकून, असे कोणी स्वामी आपल्या जवळ राहात असल्याबाबत रत्नागिरीकडील प्रवासीदेखील अनभिज्ञ असल्याचे त्यांना उमगले आणि आश्चर्यही वाटले. भाटय़े खाडी ओलांडून देसायांच्या घरात ते आले आणि स्वामींच्या भेटीची इच्छा त्यांनी व्यक्त केली. दुपारची वेळ होती. त्यामुळे त्यांना आधी भोजनास बसायला सांगण्यात आलं. भट लिहितात – ‘‘घराबाहेरील दोणीवर हातपाय धुऊन मी माजघरात जेवायला गेलो. घरातल्या बऱ्याचशा मंडळींचं जेवण उरकतच आलं होतं. जवळच मांडलेल्या पाटावर मी बसलो. माझ्या समोरच माजघराच्या उत्तरेकडील दरवाजाजवळ पूर्वेस तोंड करून तेजस्वी कांती असलेली, तरतरीत सरळ नाक असलेली, डोळ्यांत ध्यानयोगाचं तेज दृगोच्चर होत असलेली गौरकाय अशी एक व्यक्ती भोजनास बसली होती. केस अगदी विरळ असे कापलेले, मलमलची पातळशी शुभ्र बाराबंदी घातलेली व गुडघ्यापर्यंत शुभ्र पंचावजा धोतर परिधान केलेली ही व्यक्ती विचारवंत, विवेकी व तत्त्वज्ञ आहे, हे त्या व्यक्तीकडे पाहून सहजच समजत होतं. स्वामी स्वरूपानंद म्हणून म्हणतात, ते हेच, असं मी लगेचच ओळखलं होतं. स्वामींचं भोजन उरकलं होतं. ते पाटावरच बसून होते. त्यांच्या ताटाजवळच एक मांजर बसलं होतं. हातातली हिरकुटवजा बारकी काडी त्या मांजरासमोर जमिनीवर अगदी हळुवार अशी आपटीत स्वामी अधूनमधून माझ्याकडे बघत होते. मध्येच ‘ॐ ॐ’ असं म्हणत होते. मी त्यांच्याकडे पाहात होतो. या व्यक्तीचं खरं अस्तित्व आत आत कुठं तरी आहे. ही व्यक्ती आत कुठं तरी खोल अशी दडली आहे आणि वरून पाहिलं तर ती कुठं तरी हरवली आहे, असं स्वामींकडे पाहून त्या वेळी मला वाटलं होतं. तोही नेत्रीं पाहे। श्रवणीं ऐकतु आहे। परि तेथींचा सर्वथा नोहे। नवल देखें।। तो पुरुषदेखील डोळ्यांनीच पाहतो. कानांनीच ऐकतो. परंतु नवल असं की, तो दिसतो तेथे कधीच नसतो आणि व्यवहारापासून तर कसा अगदी अलिप्त असतो. अशा तऱ्हेचं ज्ञानेश्वरीतील प्राप्तार्थ पुरुषाचं लक्षण स्वामीजींमध्ये कसं अगदी रुजलेलं असं मला दिसत होतं.’’ तेव्हा स्वामींचा जीवनौघ स्थूल रूपानं आपण पाहिला आणि त्यांचं दर्शन घेणाऱ्याच्या नजरेतून त्यांचं दर्शनही घेतलं. बाह्य़रूपानं ते कसेही दिसोत, आंतरिक सत्य स्वरूपापासून  ते कधीच क्षणभरही ढळत नाहीत, हेच त्यातून स्पष्ट झालं आहे.