‘युती आणि आघाडी यात काही फरकच उरला नाही की काय?’ – हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, यावर दुमत होणार नाही. दुमत, तिमत किंवा वादविवादच होतील ते हा प्रश्न कधी पडला या मुद्दय़ापुरते. कुणी म्हणतील, १९९९ सालीच हा फरक नष्ट झाला, कुणी हे मत नाकारतील आणि २०१४ च्या ऑक्टोबरपासून हा फरक धूसर झाल्याचे तावातावाने मांडतील.. कुणी २०१९ मध्येच मोठय़ा प्रमाणात झालेल्या ‘महाभरती’ची आठवण काढतील.. राजकीय घडामोडींकडे अधिक डोळसपणे पाहणारे काही जण या तिघांचेही म्हणणे एकांगी आणि पक्षपाती ठरवून, ताज्या विधानसभा निकालानंतरच्या दिवाळीतच हा प्रश्न उद्भवल्याचा निष्कर्ष सांगतील.. पण हे सारे वादविवाद सामान्यजनांपुरते ठीक. आपण क्षणाचे मतदार-राजे आहोत याची खात्री असलेले हे महाराष्ट्रीय सामान्यजन, ‘सगळे राजकारणी सारखेच’ अशा दिव्यज्ञानाची प्राप्ती एकमेकांना करून देतच असतात. तरीही युती आणि आघाडी यांतील फरक त्यांना कळतो किंवा असे म्हणू की, अगदी अलीकडेपर्यंत तो कळत होता.

याच फरकाकडे राजकारणात मुरलेले लोक अत्यंत निराळ्या पद्धतीने पाहत असतील, तर जनसामान्यांनी अचंबित व्हावे हेच बरे. आघाडी ही एक नसतेच, एकाच वेळी अनेक आघाडय़ा असतात, असे कुणाला वाटत असेल तर मर्द सेनापतींचा शूर सरदार तो हाच, असे सामान्यजनांनी मानावे आणि गप्प बसावे. शूर सरदारांना एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर लढायचे असते, अनेक आघाडय़ा राखायच्या असतात आणि अनेक ठिकाणी आघाडी घ्यायचीसुद्धा असते. असे अनेक आघाडय़ांवर एकाच वेळी लढणाऱ्यांनी कच्च्या दिलाचे असून चालत नाही. समजा दिलाकडे जाणारी एखादी धमनी झालीच कच्ची, तर लगोलग ती दुरुस्त करवून घेऊन पुन्हा अनेक आघाडय़ांवर लढायला तयार व्हायचे असते.

हे सारे दाखले काही सामान्यजनांना इतिहासातले वाटतील. पण वर्तमानकाळ हा इतिहासापेक्षा रोचक आहे.. हे ज्यांना समजणार नाही, त्यांनी खुशाल तान्हाजीच्या झलकपटाची – म्हणजे ट्रेलरची- पारायणे करावीत आणि इतरांना चित्रवाणीच्या जिवंत वृत्तवाहिन्या पाहू द्याव्यात. या वृत्तवाहिन्यांवर सूत्र-बद्धरीत्या उलगडणारा वर्तमानकाळ सांगेल की शूर सरदारांना एकाच वेळी अनेक आघाडय़ा दिसत आहेत. हा वर्तमानकाळच उद्या इतिहास घडवू शकतो. महाराष्ट्रात बिघाडी म्हणूनच जिचा अनेकदा उल्लेख झाला ती दोन पक्षांची आघाडी, याच राज्यात होणार-होणार म्हणून गाजत असलेली महाशिवआघाडी आणि दिल्लीदरबारी, केंद्रीय सत्तासूत्रे हाती ठेवून असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी. यापैकी आजच्या आणि उद्याच्या आघाडय़ा एकाच वेळी राखायच्या म्हणजे सोपे काम नव्हे. हाती येईल त्या शस्त्रानिशी लढून त्या राखण्याचे वा फत्ते करण्याचे काम करावेच लागते.

राज्यसभेत १९ व्या रांगेतून आमच्या शिलेदारांना हटवून ३० व्या की ३३ व्या रांगेत का बसवले, हा प्रश्नदेखील लेखणीच्या शस्त्राने आघाडी राखण्याचा झालेला प्रयत्न, म्हणून वर्तमानकाळातील घडामोडींची इतिहास नोंद घेईल. पुढल्या आघाडीवर फत्ते करीपर्यंत आदल्या आघाडीवरील पकड सोडायची नाही, ही युद्धनीतीच त्यातून भावी काळातील वाचकांना उमगेल! तोवर वर्तमानकालीन महाराष्ट्रातील सामान्यजन मात्र, ‘युती आणि आघाडी यात काही फरकच उरला नाही की काय?’ याच प्रश्नावर वादविवाद करीत राहोत..