ज्यांच्या काळजाच्या कोपऱ्यात अजूनही माणुसकीची ओल आहे, ज्यांच्या मनातून अजूनही कनवाळूपणाचा झरा वाहतो आहे, अशा तमाम भारतीयांनी आज एकसाथ उठून उभे राहिले पाहिजे. आपले थोर देशभक्त व्यापारी मेहुलभाई चोक्सी यांच्या पाठीवर आपण सर्वानी मिळून दिलाशाचा, आधाराचा, धीराचा, मायेचा, झालेच तर प्रेमाचा हात ठेवला पाहिजे. त्यांना आपण सांगितले पाहिजे, की मेहुलभाई डरू-घाबरू नका. येथे तुमच्या केसालाही धक्का लागला, तर या देशातील प्रत्येक जमाव चवताळून तुमच्या केसाला धक्का लावणाऱ्याची केस तमाम करील. त्याच्या बाजूने कोणी उभे राहिलेच, तर त्याचे जगणे हराम करील. तो न्यायालयात जाऊ पाहील, तर त्याला वकीलच मिळू देणार नाही. किंबहुना आमचे कायदा आणि न्यायाचे प्रहरी असे ते वकीलच त्याचे काय ते पाहून घेतील. तेव्हा, कृपया मेहुलभाई घाबरू नका. पाहा ना, कसे भिजल्या मांजरासारखे दिसताहेत आज आपले मेहुलभाई. केवळ भारतात येण्याच्या विचाराने त्यांचे सर्वाग घामाने भिजून गेले आहे. हृदयाचे ठोके वाढले आहेत. रक्तदाब तर शेअर बाजाराच्या निर्देशांकाप्रमाणे वर जाऊन खाली येताना दिसत आहे. पाय लटलट कापताहेत आणि हातांची थरथर वाढली आहे. पाहा पाहा, वजनही घटल्यासारखे झाले आहे त्यांचे. ते ठीक आहे. परदेशात तशीही खाण्यापिण्याची नाही म्हटले तरी आबाळच होते. अखेर घरचा स्वाद तेथे कोठून मिळायला? त्या स्वादाच्या शोधात मेहुलभाई कधी या विदेशात तर कधी त्या विदेशात असे जाऊन राहात आहेत. काय वेळ यावी त्या हिऱ्यासारख्या माणसावर? काय होता त्यांचा गुन्हा? पंजाब नॅशनल बँकेत फक्त १३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यांच्यावर. आता नागरिकहो, चंद्र आहे तेथे डाग असणारच की नाही? मेहुलभाईंचे तसेच झाले. त्यांची चूक एकच झाली की ते विदेशात गेले. खरेतर त्यांनी परदेशी जाण्याची तशी काही गरजच नव्हती. येथे फार फार तर काय झाले असते? अटक झाली असती. पण त्याने काय बिघडते? अटक आहे तेथे जामीनही असतो. तुरुंग आहे तेथे रुग्णालयही असते. पण मेहुलभाई घाबरट फार. वस्तुत: ज्यांना प्रत्यक्ष पंतप्रधान मेहुलभाई असे म्हणतात त्यांनी या देशात घाबरायचे असते का कुणाला? त्यांनी तेव्हाही घाबरायचे नव्हते आणि आताही भयभीत होण्याचे काही कारण नाही. आपल्यावरील अजामीनपात्र वॉरंट रद्द करावे, कारण आपण मायदेशी परतलो तर लोक आपणांस चेचून मारतील असे भय मेहुलभाईंना वाटावे हेच आश्चर्यकारक आहे. म्हणे भारतात हल्ली लिंचिंग वगैरे फार वाढलेय. झुंडबळी म्हणे. काहीही हं हे. सव्वाशे कोटींच्या भारतात अशा किती लिंचिंगच्या घटना घडल्या? आणि ज्या घडल्या त्यात मेले ते का भारतीय नागरिक होते? ते कुठल्या तरी धर्माचे होते, जातीचे होते. तेव्हा ते काय एवढे मनाला लावून घ्यायचे? मेहुलभाईंनी आठवून पाहावे, की येथे मेहुलभाईंसारख्या कुणाचे अगदी दंगलींमध्येसुद्धा कधी लिंचिंग झाले आहे काय? तेव्हा त्यांनी आश्वस्त राहावे. ते इकडे जरी आले, तरी त्यांच्या सुरक्षेची सर्वतोपरी व्यवस्था केली जाईल. अखेर असे हिरे हे मखमली कोंदणातच ठेवण्याची रीत आहे या देशाची. ते कोंदण अबाधित ठेवले जाईल याची खात्री त्यांनी बाळगावी. हवे तर त्यांनी परदेशातच राहावे; पण कृपया, घाबरू नये. हा देश खरोखरच फार कनवाळू आहे. येथे झुंडीलाही मोठी पारखी नजर असते.