चप्पल, बूट, स्लीपर्स हे अगदीच शहरी शब्द झाले. शहरी रस्त्यांवर चालून चालून झिजलेले. अगदीच गुळमुळीत. वहाण, पायताण हे शब्द कसे अगदी रसरशीत. अस्सल मराठी मातीतले. याच अस्सल मराठी मातीत जन्मलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही हेच शब्द अधिक भावत असणार. शिवसेना म्हणजे एक धगधगती संघटना. या संघटनेची भाषा तशीच हवी. वानगीदाखल पक्षप्रमुखांचे ताजे वक्तव्य बघावे. ‘शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना जागेवर ठेवणार नाही.. त्यांचा अपमान करणाऱ्यांना वहाणेने मारू.’ किती ओजस्वी वक्तव्य आहे हे. एखाद्या जहाल आम्लात उकळत असलेले शब्दच जणू. त्याची धग इतकी की हे शब्द छापले तर ज्यावर ते छापले तो कागदही जळून जाईल, अशी भीती वाटावी. मुद्दा असा की शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी झाली आहे त्यामागे शिवसेनेचाच रेटा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने आपला सत्तेतील वाटाही पणास लावण्याचे ठरवले होते. पण तशी वेळ आली नाही. हे असे याआधीही अनेकदा घडले आहे की, सत्तेतील वाटा शिवसेनेने पणास लावावा आणि ज्या प्रश्नासाठी हा वाटा पणास लावला आहे तो प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवून टाकावा. काहीजण म्हणतात की जो प्रश्न मुख्यमंत्री सोडवणार असतात, त्याच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवसेना आपला सत्तेतील वाटा पणास लावते. खरे तर उलटे आहे. शिवसेनेने एखादा प्रश्न हाती घेतला की त्या धसक्यानेच अभ्यासू मुख्यमंत्री तो तातडीने सोडवून टाकतात. दराराच तसा आहे सेनेच्या वाघांचा. आठ दिवस दूध, भाजीपाला बंद करून टाकणाऱ्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची ताकद ती काय असणार. त्या आंदोलनामुळे कर्जमाफी झाली हा भ्रम आहे. कर्जमाफी झाली ती सेनेच्या दबावामुळे. सेना श्रेयासाठी कधीच पुढेपुढे नसते. मात्र कर्जमाफी योजनेचे ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ हे नावच सेनेचे श्रेय दर्शविते. अन्यथा, ‘दीनदयाळ उपाध्याय किसान अंत्योदय योजना’.. ‘अटल शेतकरी योजना’.. ‘राधामोहनसिंह बळीराजा योजना’ (राधामोहनसिंह कोण? आपले केंद्रीय कृषिमंत्री) अशी नावे देता आली असती या कर्जमाफी योजनेला. या सगळ्या पाश्र्वभूमीवर उद्धव यांच्या वरील ओजस्वी व तेजतर्रार शब्दांकडे पाहायला हवे. ‘शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना वहाणेने मारू’, असा इशारा दिलेला आहे त्यांनी. तेव्हा सत्ताधारी भाजपच काय, विरोधकांनाही यापुढे सावध राहून, शेतकऱ्यांचा अपमान आपल्याकडून होणार नाही, याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. कधी झाला अपमान तर कुठून एखादी वहाण डोक्यावर पडेल, ते सांगता यायचे नाही. तेवढे उद्धवसाहेबांनी आपल्या सैनिकांना यापुढे पायांत वहाण घालण्याची सूचना करावी. नाडीवाले बूट घातले की ते चटकन काढता येत नाहीत आणि मग उगारताही येत नाहीत. वहाण घातली की झटपट काम होते. कसे आहे की कुठलेही काम तत्त्वत: वेळेवर झालेले बरे. बाकी काही नाही..