‘स्मृती इराणी यांचा षट्कार पाहिलात की नाही?’ – सकाळीच रा. लेले यांचा व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाहून आमचे जे होते, तेच झाले. चक्रावलेल्या अवस्थेत घराचे बाहेरचे दार उघडणे आणि कडीला पेपर असल्यास ते हाती घेणे, नसल्यास पेपर कडीवरून लेलेंच्या घरात गेले आहेत याची खूणगाठ बांधून आमच्याचकडे येणारी दैनिके ‘ऑनलाइन’ पाहून, लेलेंचा नेमका मुद्दा त्या जंजाळातून शोधून काढणे, हा आमचा परिपाठ. चक्रावणारे संदेश आम्हाला पाठविणे, हा रा. लेले यांचा परिपाठ. असो. इराणी यांच्या षट्कारासंबंधाने घडले असे की, कडीला पेपर नसल्यामुळे आम्ही ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’, दोन्ही ऑनलाइन पाहू लागलो. पाने पाहून डोळे शिणले, तरी स्मृती इराणी यांचा षट्कार म्हणता येईल अशी बातमी काही दिसेना. गूगलवार्ता शोधखिडकीत अखेर ‘स्मृती इराणी’ ही अक्षरे इंग्रजीत टंकित करून पाहिली आणि काय हो चमत्कार! पुढल्याच क्षणी अशी काही बातमी सामोरी आली, की आम्हास डिक्शनरीच्या संकेतस्थळावर जाऊन ‘स्क्वीमिश’ या शब्दाचा अर्थ शोधणे भाग पडले.

‘भित्री भागूबाई’ किंवा ‘घाबरट’ हा तो अर्थ! या अर्थाचा इंग्रजी शब्द इराणी यांना माहीत आहे, हा षट्कार? छे:! कुत्सितपणे इराणी यांच्या शब्दसंपदेचे वाभाडे काढणे हे पुरोगाम्यांचे काम. लेलेंचे नव्हे. बातमी अख्खी वाचल्याविना लेले यांचा मुद्दा लक्षात येत नाही, म्हणून वाचू लागलो. तर हिंडोल सेनगुप्तांनी सरदार पटेल यांच्याविषयी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात, अहमदाबादमध्ये इराणी बोलत होत्या. नुसत्या बोलत नव्हत्या, संभाषण करत होत्या. इराणी यांनी प्रश्न विचारावेत, लेखकाने त्यावर उत्तरे द्यावीत, असे सारे छान खेळीमेळीत चालले होते. ‘नेहरू घाबरट नेते होते का? त्यांनी काश्मीर आणि हैदराबादेत लष्कर का नाही घुसविले?’ असा प्रश्न इराणी यांनी विचारला, त्याचेच शीर्षक बातमीला होते. पण हा षट्कार खचितच नव्हे. नेहरूंना याहून जहाल विशेषणे रा. लेलेसुद्धा येताजाता लावत असतात. मग षट्कार कशाला म्हणावे? मुद्दा पुढेच असणार.. तसे या बातमीत अध्येमध्ये बरेच मुद्दे दिसले. उदाहरणार्थ, ‘नेहरू उद्याच्या भारताचे स्वप्न पाहणारे होते आणि सरदार पटेल वर्तमानकाळात जगणारे, देशापुढील प्रश्न सोडवणारे’ असे लेखकराव म्हणाले तेव्हा, ‘हो ना.. त्यांच्या पुढल्या पिढय़ासुद्धा स्वप्नंच बघत बसल्यात, कामं करतात दुसरेच..’ असेही त्या म्हणाल्या. पण याला फार तर हजरजबाब म्हणता येईल. रा. लेले यांच्या तोलामोलाचा मुद्दा शोधण्यासाठी शेवटापर्यंत वाचत, घडला प्रसंग डोळ्यांसमोर जिवंत करत गेलो.. डोळे दिपले. दिपलेले डोळे जरा चोळून पुन्हा संगणकाकडे पाहणार तोच डोक्यात प्रकाश पडला.. सरदार पटेल हे पंतप्रधान नेहरूंपेक्षा स्वतंत्र बाण्याचे होते. आजकाल असे मंत्री शोधावेच लागतात.. पंतप्रधानांवर राफेलविषयी आरोप झाले रे झाले की संरक्षणच नव्हे, परराष्ट्र, अर्थ इतकेच काय कृषी खात्याचे मंत्रीही राफेलबद्दलच बोलतात.. पण इतरेजन नेहरू ते राहुलवर ‘पूरा खानदान चोर’ अशी भाषा करीत असताना याच खानदानाला आपले स्वतंत्र दूषण कोणी दिले? इराणींनी! हा स्वतंत्र बाणा षट्कारापेक्षा कमी कसा?