अमेरिकेतील राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांच्या यंदाच्या मानकऱ्यांमध्ये एक नाव कॅथरीन बू यांचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, कॅथरीन यांचे पुरस्कारविजेते आणि पहिलेच पुस्तक मुंबईच्या एकाच गरीब वस्तीबद्दल आहे. एका लघुसमाजाचा ‘मौखिक इतिहास’ नोंदवण्याचे काम या पुस्तकाने केले आणि भारताबद्दलची समज वाढवली, असे पाश्चात्त्य टीकाकार म्हणतात; तर भारत म्हणजे गरिबी आणि घाण, या समीकरणाऐवजी कॅथरीन यांनी भारत म्हणजे जीवनसंघर्षांत आशेचा दिवा तेवत ठेवणारा देश, असा दृष्टिकोन मांडल्याचे काही भारतीयांचे मत आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रतिष्ठित दैनिकात १९९९ पासूनची काही वर्षे बातमीदारी केलेल्या कॅथरीन सध्या ‘द न्यूयॉर्कर’ या साप्ताहिकात कार्यरत आहेत. बातमी चटपटीत हवी असे भारतीय मीडियाला वाटत असताना अमेरिकेतील ज्या पत्रकारवर्गामुळे सखोल आणि माहितीपूर्ण बातम्यांचा गोवर्धन उचलला गेला आहे, त्या वर्गातील कॅथरीन या एक. पत्रकाराने समाज पाहावा आणि आपणही समाजाचा भाग आहोत हे लक्षात घ्यावे, असे त्यांचे तत्त्व. ‘कधीच कुणी वाचली नसेल अशी बातमी माझ्याकडे आहे’ असे म्हणणाऱ्या पत्रकारांमुळे मला मी कुणीच नाही असे वाटे, असे कॅथरीन सांगतात खऱ्या, पण हा ‘कुणीच नाही’पणा त्यांनी कष्टाने जपला. ‘बिहाइंड द ब्यूटिफुल फॉरएव्हर्स’ हे त्यांच्या पुस्तकाचे नाव. या पुस्तकाबद्दल माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर, कॅथरीन यांनी आपल्यासोबत भारतात असणाऱ्या दुभाष्यांची माहिती अगदी ठसठशीतपणे देण्यासाठी खास विभाग केला आहे. मुंबईत सहार विमानतळाजवळच्या ‘अण्णानगर झोपडपट्टी’ व अन्य ठिकाणच्या लोकांशी अनेक आठवडे साधलेल्या संवादात भाषेचा अडथळा कॅथरीन यांना आला नाही, तो या दुभाष्यांमुळे आणि दृष्टिकोन कलुषित झाला नाही, तो विजया चौहान यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे. अर्थात, भारताच्या सांस्कृतिक स्थितीचे महत्त्वाचे भाष्यकार सुनील खिलनानी हे कॅथरीन यांचे पती; त्यामुळे भारतातील केवळ वरवरच्या विसंगतींनी हुरळून जाण्याचे कारणच नव्हते. यापूर्वी पुलित्झर पुरस्कार मिळवलेल्या या पत्रकर्तीने भारत समजून घेण्यासाठी कष्ट केले आणि त्याचे फळ तिला मायदेशातील राष्ट्रीय पुरस्काराने मिळाले.