महिलांची बेअब्रू करणारे विरोधक असल्यास रान उठवायचे आणि आपल्या गोटातील असतील तर दुर्लक्ष करायचे असे आपले राजकीय वर्तन आणि वर्तमान.. 

माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाचे शेकडो व्हिडिओ बनवले हा इतकाच मुद्दा नाही. देवेगौडा सध्या भाजपच्या छत्रचामरांखाली सुरक्षित आहेत, हाही मुद्दा नाही. या प्रज्वल रेवण्णा याच्यावर न्यायालयात दावा दाखल करून त्याचे हे विकृत उद्योग चव्हाटयावर मांडण्याचा पहिला जाहीर प्रयत्न ज्यांनी केला ते जी देवराजे गौडा हे भाजपचे नेते आहेत आणि त्यांचाच भाजप आता रेवण्णा यांचा समर्थक आहे या वास्तवातदेखील धक्का बसावा असे काही नाही. हे सर्व कर्नाटकात घडले. त्या राज्यात सत्तेवर काँग्रेस आहे. त्या पक्षाने लगेच या साऱ्याची रास्त दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले, यातही आक्षेप घ्यावे असे काही नाही. हे जेथे घडले तेथपासून शेकडो किलोमीटरवर असलेल्या पश्चिम बंगालातील संदेशखाली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्या राज्य सरकारला धारेवर धरले हेही योग्यच झाले. त्या राज्यात सत्ता आहे तृणमूल काँग्रेसची. त्या पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या संदेशखाली गुन्हेगारांस वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचा भाजपचा आरोप आहे. या मुद्दयावर भाजपचा त्या सरकारवरील रेटा कौतुकास्पद म्हणावा असा. भाजप आपली विरोधी पक्षाची जबाबदारी किती चोखपणे पार पाडत आहे हे पाहून सर्व राष्ट्रप्रेमींस आनंदच वाटेल. तोच भाजप येथे महाराष्ट्रात सत्तास्थानी आहे आणि त्या भाजपचे येथील नेते शिवसेनेचे संजय राठोड यांच्या मांडीस मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. या राठोड यांच्यावर महिला अत्याचाराचा आणि हत्येचा गंभीर गुन्हा आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारात राठोड हे वनमंत्री असताना त्यांनी हे ‘जंगली’ उद्योग केल्याचे आरोप झाले. ते करण्यात तेव्हा विरोधात असलेला भाजप आणि त्या पक्षाच्या महिला नेत्या आघाडीवर होत्या. हे अगदी योग्य. त्या वेळी ‘लोकसत्ता’ने ‘वनमंत्र्यांचे जंगलराज’ (२४ फेब्रुवारी २०२१) या शीर्षकाच्या संपादकीयातून सदर वनमंत्र्यांचे वाभाडे काढले होते. आता तेच राठोड आपल्या नेत्याचे सत्तासोबती आहेत यावर त्या भाजपच्या महिला नेत्यांची प्रतिक्रिया काय, हा प्रश्न. तो विचारण्यात अर्थ नाही. पण या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून जे समोर आले त्यावरून आपल्या सामाजिक नैतिक धारणेबाबत मात्र प्रश्न पडतो.

father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…
lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
Will Narendra Modi change according to the needs of the times Will opponents learn from their defeat
मोदी काळाच्या गरजेनुसार बदलतील? विरोधक आपल्या पराजयातून धडे घेतील?
What is gaslighting in a relationship
समुपदेशन : तुम्ही आहात विचारांचे बळी?
Shashi Tharoor Exit polls Congress Opposition performance loksabha elextion 2024
एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर
Do women play the politics of sexual violence
स्त्रिया काय लैंगिक अत्याचाराचं राजकारण करताहेत का?
Loksatta vyaktivedh Odisha Central Sangeet Natak Akademi Award Kunar
व्यक्तिवेध: मागुनिचरण कुंअर
Considering the physical and mental changes in a woman life
नेहमी बाईलाच का जबाबदार धरलं जातं?

हेही वाचा >>> अग्रलेख: अनिवासींच्या मुळावर निवासी!

म्हणजे असे की संदेशखालीत जे त्याज्य ते मुंबई वा बंगळूरुत स्वीकारार्ह कसे? संदेशखाली हे निश्चितच कोणीही मान खाली घालावे असेच प्रकरण. कोणत्याही प्रदेशात असे काही घडल्यास यातील गुन्हेगारास कडकातील कडक शासन व्हावे यासाठीच सगळयांचे प्रयत्न हवेत. अशी गुन्हेगार व्यक्ती कोणत्या धर्माची, कोणत्या जातीची आणि कोणत्या पक्षाची असे प्रश्न मनातसुद्धा उमटता नयेत. त्यामुळे भाजपने पश्चिम बंगालात घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह. सदर प्रकरणातील गुन्हेगार हा मुसलमान नसता तर भाजपने इतकीच आग्रही भूमिका घेतली असती का वा त्याचा तृणमूलशी संबंध नसता तर भाजपने इतके रान माजवले असते का, हे प्रश्नही या संदर्भात विचारता नयेत. कारण हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे. तितकाच गंभीर गुन्हा देशाचे माजी पंतप्रधान हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा यांच्या वंशदिव्याने केल्याचे आढळते. याचा जो काही तपशील समोर आला आहे त्यावरून माजी पंतप्रधानांचा हा कुलदीपक प्रज्वल प्रत्यक्षात किती विझवटा होता, हे कळेल. या गृहस्थाने स्वत:च्या मोबाइलवर शेकडो महिलांची विकृत छायाचित्रे घेतली, त्यांचे ध्वनिचित्रमुद्रण केले. या प्रज्वलाचे हे उद्योग त्याच्या खासगी वाहनचालकास ठाऊक होते. गतसाली प्रज्वलशी फाटल्यानंतर सदर वाहनचालक त्यास सोडून गेला आणि या त्याच्या खासगी रेकॉर्डिगला पाय फुटले. हे सर्व रेकॉर्डिग या पंतप्रधान नातवाने मुळात का केले आणि या महिलांना त्यासाठी धाकदपटशा दाखवला गेला की पैशाचे आमिष दिले गेले इत्यादी प्रश्न आता चर्चिले जात आहेत. पण या न्यायप्रविष्ट प्रकरणास वाचा फुटली ती या प्रज्वलने निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी या शेकडो रेकॉर्डिगचे हजारो ‘पेनड्राइव्ह’ त्याच्या हासन या मतदारसंघात वाटले गेले म्हणून. यातील काही रेकॉर्डिग समाजमाध्यमांत पसरले आणि राज्याच्या महिला आयोगास त्याची दखल घ्यावी लागली. प्रज्वलच्या पक्षाची केंद्रातील सत्ताधारी भाजपशी आघाडी आहे. वास्तविक या प्रज्वलच्या उद्योगांबाबत बोंब ठोकली होती ती भाजपच्या गौडा यांनी. प्रज्वलच्या तीर्थरूपांनी भाजपच्या गौडा यांच्यावर आरोप केले असता या गौडा यांनी ‘‘मी दररोज माझ्या घरीच झोपायला असतो’’ असे जाहीर उत्तर दिले. यावरून या वादाचा दर्जा-खोली कळेल. 

हेही वाचा >>> अग्रलेख: सलमानी सुल्तानी!

पण ती कळल्यावरही या प्रज्वलसंदर्भात भाजपच्या विदुषी स्मृती इराणी वा निर्मला सीतारामन वा अन्य कोणी गर्जना केल्याचे कानावर आलेले नाही. इतकेच काय, प्रज्वल यांच्या पक्षाशी आघाडी करणारा भाजपही आता या प्रकरणाशी आपला संबंध कसा नाही, हे सांगू लागल्याचे दिसते. ते खरे असेलही. या प्रकरणाशी भाजपचा संबंध नसेलही. पण या प्रकरणातील खलनायक प्रज्वल रेवण्णा यांच्याशी असलेल्या भाजपच्या संबंधांचे काय? या रेवण्णा यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आकारास यावे म्हणून भाजपने त्यांच्यात गुंतवणूक केली होती, हे सर्व जाणतात. आपले हे लैंगिक गुन्हे उघडकीस आल्यानंतर प्रज्वलण्णा परदेशात परागंदा झाले. अतितत्पर केंद्रीय यंत्रणा, सरकार यांनी काणाडोळा केल्याखेरीज प्रज्वलण्णांस पळून जाता येणे अशक्य असा विरोधकांचा आरोप. तो सिद्ध कसा होणार हा प्रश्न. याच राज्यातील खासदार विजय मल्या हेदेखील असेच पळून गेले आणि त्याही वेळी केंद्र सरकारविरोधात प्रश्न निर्माण केले गेले. त्याची उत्तरे काही अद्याप मिळालेली नाहीत. ती मिळणारही नाहीत. प्रज्वलण्णाच्या पलायन प्रश्नांबाबतही असेच होईल. त्याचेही उत्तर मिळणार नाही. तेव्हा जी काही चर्चा व्हायला हवी ती हे प्रश्न सोडून.

म्हणून प्रश्न पडतो तो असा की संदेशखालीत लुटली गेलेली महिलांची अब्रू आणि हासन परिसरातील पीडित महिलांची लाज यात डावे-उजवे कसे करणार? महाराष्ट्रातील जी व्यक्ती घृणास्पद कृत्यांसाठी अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी कारवाईयोग्य होती, तीच व्यक्ती आता मंत्रिमंडळातील सहकारी व्हावी इतकी पावन कशी काय झाली? कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष प्रज्वलण्णाच्या लैंगिक विकृतींची हिरिरीने चौकशी करताना दिसतो. पण तोच काँग्रेस पक्ष संदेशखालीतील महिलांस न्याय मिळावा यासाठी इतका प्रयत्न करत होता का, हा प्रश्न. हाच मुद्दा भाजपलाही लागू होतो. संदेशखालीतील अत्याचारांबाबत कंठशोष करणारे भाजप नेते आणि धरणे धरणाऱ्या महिला नेत्यांनी हासन येथील गैरप्रकारांचाही पाठपुरावा तितक्याच जागरूकपणे करायला हवा. तसे काही होताना दिसत नाही.

म्हणजे महिलांची अब्रू, प्रतिष्ठा, आदर इत्यादी सारे शब्द निरर्थक ठरतात. त्यांचा विचार सोयीसोयीनेच करायचा. महिलांची बेअब्रू, अप्रतिष्ठा, अनादर करणारे विरोधक असतील तरच त्यावर रान उठवायचे आणि हे पाप करणारे आपल्या गोटातील असतील तर या सगळयांकडे दुर्लक्ष करायचे असे आपले राजकीय वर्तन आणि वर्तमान. पंतप्रधानांनी अलीकडेच विरोधकांवर ‘ते महिलांचे मंगळसूत्र काढून घेतील’ असा आरोप केला. त्यात तथ्य असेल/ नसेल. पण महिलांवर अत्याचार करणाऱ्या, त्यांचे शोषण करणाऱ्यांबाबत पक्षीय दुजाभाव दाखवला जातो हा केवळ आरोप नाही. तर ते वास्तव. राजकीय सोयी/ सवलतींत अडकलेले हे अमंगलाचे मंगलसूत्र पहिल्यांदा सोडवायला हवे.