|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

‘आमच्यावर अन्याय होतो’ हे रडगाणे गाण्याऐवजी, विज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची शास्त्रीय कारणेही स्त्रियांनी वा स्त्रीवादी संशोधकांनी शोधून काढली.. त्यातून पुढे, विज्ञानाची संस्थागत रचना अधिक न्याय्य होण्याचा पाया रचला गेला..

विज्ञानाच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष भेदभाव का दिसतो, याचा शोध अनेक स्त्रीवादी विचारकांनी वैज्ञानिक पद्धतीने घेतला. त्यांना या शोधात काय सापडले व त्यातून विज्ञान कसे बदलले, याचा धावता आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

लिंगाधिष्ठित भेदभाव: व्याप्ती व स्वरूप

संशोधन क्षेत्रातील स्त्रियांच्या योगदानाकडे पद्धतशीर दुर्लक्ष करून त्यांना आपल्या संशोधनाचे श्रेय मिळण्यापासून वंचित करणे ही बाब तंत्रज्ञानाच्या उद्यापासून आतापर्यंत सातत्याने घडते आहे. मुळात तंत्रज्ञानाच्या प्रारंभिक इतिहासातील महत्त्वाचे शोध, उदा. शेती, अन्नप्रक्रिया, अन्न साठवणूक, पशुपालन- स्त्रियांनीच लावले. त्यानंतर अनेक शतके ती सर्व तंत्रे स्त्रियांनीच टिकवली व विकसित केली. पण पुरुष वैज्ञानिकांनी विज्ञान-तंत्रज्ञानाची अशी व्याख्या केली, जी त्यांना सोयीस्कर होती व ज्यामुळे स्त्रियांना त्याचे श्रेय मिळू शकले नाही. स्त्रियांनी विकसित केलेली कसबे (उदा. वस्त्रे विणणे) ही ‘कला’ (आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या तुलनेत कमअस्सल) मानली गेली. पिकांचे उत्तम वाण किंवा पाळीव प्राण्यांच्या अधिक उपयुक्त जाती विकसित करणे या बाबी प्रयोगशाळेत केल्या गेल्या तर त्यांची गणना विज्ञान-तंत्रज्ञानात केली जाते. पण हेच कार्य अनेक शतके स्त्रियांनी आपल्या शेता-मळ्या-गोठय़ांत केले असता त्यांची दखल घेतली जात नाही.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या इतिहासातून स्त्रियांची कामगिरी अदृश्य करण्याची ही पुरुषप्रधान परंपरा आधुनिक विज्ञानाच्या उदयानंतरही अबाधित राहिली. लोंडा शिबिंजर (Londa Schiebinger) यांनी हे दाखवून दिले आहे की, १७-१८ व्या शतकात विज्ञानाच्या पायाभरणीत अनेक स्त्रियांनी (उदा. स्वीडनची राणी ख्रिस्तिना, मार्गारेट कॅव्हेन्डिश) मोलाची कामगिरी केली, जिची नोंद त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांनी घेतली. पण त्यानंतरच्या काळात विद्यापीठे व वैज्ञानिक संस्था या वैज्ञानिक व्यवहाराचे केंद्र बनल्या. त्यांची रचनाच अशा रीतीने करण्यात आली की, जिच्यात स्त्रियांना प्रवेश मिळणेही दुरापास्त व्हावे. त्यांना या वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे विज्ञानाच्या इतिहासात या कर्तबगार स्त्रियांचा उल्लेखही केला जात नाही. ही परंपरा अगदी विसाव्या शतकापर्यंत कायम राहिली. मेरी क्युरी ही दोनदा (१९०३ व १९११) नोबेल पारितोषिक मिळविणारी जगातली पहिली शास्त्रज्ञ. पण या पराक्रमानंतरही तिला फ्रान्सच्या विज्ञान अकादमीचे सदस्यत्व देण्यास अकादमीने नकार दिला. कोणा स्त्रीला हा बहुमान मिळण्यास १९६२ साल उजाडावे लागले. त्याची मानकरी क्युरीची शिष्या मार्गारेट पेरे ही होती.

नोबेल पुरस्कारांचे उदाहरण पुढे नेऊ या. आतापर्यंत २०३ वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या  नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात केवळ दोन स्त्रिया आहेत. अनेकदा योग्यता असूनही केवळ स्त्री असल्यामुळे त्यांना डावलण्यात आले आहे. जॉसलीन बेल बन्रेल (Jocelyn Bell Burnell) यांनी १९६० च्या दशकात पहिल्या ‘रेडिओ पल्सर’चा शोध लावला, तो त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सुरू असताना! १९७४ मध्ये त्यांचे मार्गदर्शक अँटनी हेविश व सहाध्यायी मार्टनि राईल यांना त्याच शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले, पण जॉसलीनला त्यापासून वंचित ठेवण्यात आले. व्हेरा रुबिन यांनी ‘डार्क मॅटर’चा शोध लावून अवकाश विज्ञानात मोठी क्रांती केली, पण त्यांनाही नोबेल मिळू शकले नाही.

स्त्री-वैज्ञानिक व विचारक यांनी या भेदभावाविरुद्ध जोरदार आवाज उठवून आपल्या समर्थनासाठी भरपूर वैज्ञानिक पुरावे गोळा करेपर्यंत त्यांना पद्धतशीरपणे डावलण्याची परंपरा चालतच राहिली. कारण विज्ञान तटस्थ असले तरी अनेक वैज्ञानिक स्वत: पुरुषी श्रेष्ठत्वाच्या पूर्वग्रहापासून मुक्त नव्हते व आजही नाहीत. गंमत म्हणजे ते (त्यात पुरुषांसोबत स्त्रियाही आहेत) आपण पूर्वग्रहग्रस्त आहोत हे मान्य करीत नाहीत, कारण त्यांना त्याची कल्पनाही नसते. हे पक्षपाती पूर्वग्रह कसे निर्माण होतात व कसे कार्य करतात यावरही स्त्रीवादी अभ्यासकांनी प्रकाशझोत टाकला आहे.

पूर्वग्रह व संस्थात्मक रचना

आकलनात्मक मानसशास्त्र (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी) व सामाजिक मानसशास्त्र (सोशल सायकॉलॉजी) या विद्याशाखांमध्ये झालेल्या संशोधनाच्या आधारे स्त्रीवादी असा तर्क मांडतात की, मानवी मनाच्या अचेतन-अर्धचेतन पातळीवर अशा काही जटिल प्रक्रिया सुरू असतात, ज्यांमुळे लिंग, वर्ण तसेच सामाजिक भेदभावाला पुष्टी देणारे निकष नकळत आपल्या मनात पूर्वग्रहांच्या रूपात जाऊन बसतात आणि कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन करताना आपला प्रभाव दाखवितात.

११ ते १७ नोव्हेंबर २०१७ मध्ये वॉशिंग्टन येथे मेंदुविज्ञानाची जागतिक परिषद भरली होती, तीत ३० हजारहून अधिक वैज्ञानिकांनी भाग घेतला. या परिषदेत ओबामांच्या कारकीर्दीत व्हाइट हाऊसमध्ये विज्ञानाच्या सहयोगी संचालक म्हणून काम केलेल्या जो हँडेल्समन यांनी गेल्या ३० वर्षांत ‘विज्ञानातील स्त्री-पुरुष भेदभाव’ या विषयावर झालेल्या संशोधनाची समीक्षा सादर केली. त्यांनी दाखवून दिले की, अमेरिकेतील सर्व पातळ्यांवरील संस्थांमध्ये निवड, पगार, बढती व कार्यकाल या सर्व बाबींत स्त्रियांवर अन्याय केला जातो. ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सटिी विमेन’ या संस्थेने गेल्या दोन दशकांत विविध क्षेत्रांत झालेल्या संशोधनाच्या आधारावर असे सिद्ध केले आहे की, विज्ञानाची संस्थागत रचना अशी आहे की, ज्याद्वारे स्त्रियांना पद्धतशीरपणे वगळले जाते. म्हणजेच निवड करणाऱ्या व्यक्तींच्या मनातील पूर्वग्रह, वैज्ञानिक संस्थांची रचना व निर्णयप्रक्रिया यांच्यातील सदोषता यांमुळे स्त्रिया विज्ञान-तंत्रज्ञान- अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये पुरेशी क्षमता, प्रेरणा व तयारी असूनही मागे फेकल्या जातात.

वैज्ञानिक आशयाचे प्रदूषण

पुरुषी मनातील पूर्वग्रहांमुळे विज्ञानाचा आशय व त्याची मांडणी हेदेखील सदोष व विकृत होऊ शकतात. मासिक पाळीच्या काळात स्त्रिया बौद्धिक काम करण्यासाठी अक्षम ठरतात, असे ‘सिद्ध’ करणारे संशोधन विसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेत करण्यात आले व त्या आधारावर त्यांना कित्येक दशके वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. स्त्री-पुरुष भेदावर आतापर्यंत असंख्य संशोधन प्रकल्प घेण्यात आले, पण त्यांच्यातील समान दुव्यांवर काम आता कुठे सुरू झाले आहे. संशोधन विषयाची निवड व त्याचे निष्कर्ष यांसोबत त्यांचे अर्थ-नियमन करतानाही पुरुषी पूर्वग्रह ‘गडबड’ करतात. यू-टय़ूबवर मानवी पुनरुत्पादन प्रक्रिया समजावून सांगणाऱ्या ३२ ‘वैज्ञानिक’ व्हिडीओंचा वैज्ञानिक दृष्टीने केलेला अभ्यास नुकताच प्रकाशित झाला. हे व्हिडीओ काय दाखवतात? – ‘लाखो पुंबीजे एकाच भावनेने प्रेरित होऊन स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्याची परस्परांशी स्पर्धा लावतात. अतिशय धोकादायक अशा योनीमार्गातील प्रवासात त्यातील असंख्य मृत्युमुखी पडतात व अखेरीस सर्वात आक्रमक, वेगवान, चपळ, ऊर्जावान पुंबीज यशस्वी होते व त्याचा स्त्रीबीजाशी मिलाप होतो.’ जणू पुंबीजे म्हणजे युद्धावर निघालेले सनिक! याउलट स्त्रीबीज म्हणजे जणू शुभ्र घोडय़ावर स्वार होऊन येणाऱ्या स्वप्नातल्या राजकुमाराची प्रतीक्षा करणारी निष्क्रिय तरुणी. धाडस, कृती, शौर्य हे सारे पुंबीजाचे गुण, स्त्रीबीज बिच्चारे निव्वळ वाट पाहणारे. प्रतिमांसोबतची भाषाही तशीच – ‘पादाक्रांत करणे’, ‘झेंडा गाडणे’ अशा संज्ञा वापरणारी. विज्ञान सांगते की, हे सर्व चित्रण एकांगी, अतिरंजित, पुरुषी पूर्वग्रहग्रस्त असे आहे. कारण पुंबीजे स्त्रीबीजाकडे जात असताना फॅलोपियन टय़ूब किंवा गर्भाशयाच्या िभती आकुंचन पावतात व त्यांना स्त्रीबीजाकडे वेगाने पोहोचायला मदत करतात. स्त्रीबीजाच्या सभोवतालच्या पेशींतून, तसेच स्त्रीबीज व गर्भाशय यांतून काही रसायने पाझरतात, ज्यांच्यामुळे पुंबीजे त्या दिशेला आकर्षलिी जातात. म्हणजेच या प्रक्रियेत पुंबीजाइतकेच स्त्रीबीजही सक्रिय असते व त्यांचा संयोग ही द्विपक्षी घडणारी रासायनिक क्रिया असते. त्याचे चित्रण करताना पुरुषी संकल्पनांचे रंग मिसळून ते प्रदूषित होते.

विज्ञानाचे वैशिष्टय़ हे की हे स्त्रीवादी संशोधन त्याने स्वीकारून आपले सिद्धांतन व प्रयोग (थिअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस) यांत योग्य तो बदल घडवून आणला आहे. वैद्यकीय पाठय़पुस्तकांत सुधारणा करण्यात आल्या आहेत. वैज्ञानिक संस्थांची रचना व कार्यप्रणाली बदलते आहे. पुरुषी प्रभावातून ते मुक्त होत आहे, वैज्ञानिक व आपण सारे हा बदल आपल्या मनात केव्हा घडविणार?

ravindrarp@gmail.com