|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

शीर्षक वाचून दचकलात ना? आपल्याला व्हॉट्सअ‍ॅप व तत्सम ‘विद्यापीठां’तून मिळणाऱ्या माहितीतले गांधी कोणी भलतेच असतात. आपण जर सजग वाचक किंवा पुरोगामी वगरे असलो तर आपल्याला गांधीजींचा ब्रह्मचर्याचा आग्रह, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला केलेला विरोध माहीत असतो. त्यामुळे गांधी म्हणजे एक वेळ संत, महात्मा वगरे ठीक आहे, पण त्यांना एकदम वैज्ञानिक, विज्ञान समीक्षक वगरे करून टाकणे, तेही विज्ञानाच्या नावाने चालविणाऱ्या जाणाऱ्या स्तंभामध्ये, म्हणजे एकदम विवेकवादाशी द्रोह वगरे वाटण्याची शक्यता आहे. अर्थात, गांधींनी बोलला-लिहिलेला प्रत्येक शब्द वा त्यांची प्रत्येक कृती विज्ञानाच्या निकषावर तपासून पाहणे किंवा त्याचे समर्थन करणे, हा या लेखाचा हेतू नाही. या लेखातून मी गांधींच्या व्यक्तित्वाच्या अप्रकाशित पलूंवर प्रकाशझोत टाकणार आहे. तेवढय़ा आधारावर लेखाचे हे शीर्षक समर्पक आहे का हे वाचकांनी ठरवायचे आहे.

गांधीजींना आधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे होते, अशी जोरदार अफवा आहे. गांधी म्हणजे कोणी आधुनिक युगापासून तुटलेली सोवळी व्यक्ती नव्हती. इंग्रजी शिक्षण घेतलेले ते पहिल्या पिढीतील भारतीय होते. धर्मशास्त्राला विरोध करून, वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी समुद्र ओलांडून दक्षिण आफ्रिकेत जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली होती. १८८५ पासून तर १९३१ पर्यंत त्यांनी १५ वेळा आफ्रिका व युरोपचा प्रवास केला.  प्रसारमाध्यमांच्या (टेलिग्राफच्या तंत्रज्ञानासहित) ताकदीची त्यांना उचित जाणीव होती. दांडीयात्रा व अन्य आंदोलनांत आपला संदेश जगभर पोहोचविण्यासाठी त्यांनी त्यांचा कौशल्याने उपयोगही केला होता. एके काळी सेवाग्राम आश्रमाचे तारेचे बिल व्हाइसरॉय कार्यालयापेक्षा अधिक असल्याचे बोलले जात असे. व्हाइसरॉयना गांधीजींशी सतत व प्रत्यक्ष संपर्कात राहता यावे, म्हणून सेवाग्राम आश्रमात टेलिफोनची हॉटलाइन व्हाइसरॉयच्या विनंतीवरून बसविण्यात आली होती. (तो फोन आजही तेथे आहे.) गांधीजींनी १९०९ साली लिहिलेल्या ‘हिंद स्वराज’मध्ये तंत्रज्ञानावर सडकून टीका केली आहे, हे खरे असले तरी त्यांची तंत्रज्ञानविषयक भूमिका नंतर बदलत जाताना आपल्याला दिसते. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर कौशल्याने केलाच, पण त्यासोबत नव्या भारताच्या उभारणीसाठी विकेंद्रित, ग्रामीण तंत्रज्ञानासोबत गरज पडेल तिथे आधुनिक तंत्रज्ञाननिर्मिती करणे, त्यासाठी आवश्यक संशोधक-तंत्रज्ञ परदेशातून प्रशिक्षित करून आणणे आणि उद्योगांच्या संवर्धनासाठी आवश्यक संस्थांची निर्मिती करणे या सर्व बाबतीत त्यांनी तन-मन-धनाने भाग घेतला. त्याबद्दलची काही उदाहरणे आपण पाहू –

भारतातील पहिली जहाज वाहतूक कंपनी सुरू करून इंग्रजांच्या एकाधिकारशाहीला शह देण्याचे श्रेय व्ही ओ चिदम्बरम पिल्लई यांना जाते. त्यांना त्या कार्यात जाहीर पाठिंबा व मदत देणाऱ्यांत गांधीजी प्रमुख होते. तो प्रयत्न फारसा फलद्रूप झाला नाही. म्हणून नरोत्तम मुरारजी व वालचंद हिराचंद यांनी मिळून ‘सिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना गांधीजी केवळ जाहीर पाठिंबा देऊन थांबले नाहीत, तर त्या कंपनीसाठी द्रव्य जमा करण्यात त्यांनी मदत केली. १९२७ साली भारतात फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) या उद्योग व व्यापारविषयक शिखर संस्थेची स्थापना झाली. त्यामागे गांधीजींची प्रेरणा, सल्ला व आशीर्वाद होते. रॉस बेसेट नावाच्या लेखकाने Mahatma Gandhi and MIT नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यातून आपल्याला कळते की स्वातंत्र्य मिळण्याच्या फार आधीपासून भारतातील बुद्धिमान विद्यार्थ्यांनी जगातील अग्रगण्य विद्यापीठांत जाऊन विज्ञान-तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेऊन यावे व त्याचा लाभ आपल्या मातृभूमीला द्यावा याबद्दल गांधीजी आग्रही व सजग होते. त्यांची प्रेरणा व मदत यांच्या बळावर बरेच भारतीय विद्यार्थी तेव्हा अमेरिकेतील एमआयटी या विख्यात विद्यापीठात जाऊन शिकून आले. त्यातील एक नाव म्हणजे काकासाहेब कालेलकरांचा मुलगा- बाळ कालेलकर. हा दांडीयात्रेतील एकमेव युवा प्रतिनिधी होता. ‘सरकारी शिक्षण संस्थांवर बहिष्कार घालून सत्याग्रहात सामील व्हा’ असे सांगणारे गांधीजी त्या युवकातील प्रतिभा हेरून त्याला एमआयटीला जाण्यासाठी सर्वतोपरीने मदत करतात, ही घटना पुरेशी बोलकी आहे.

 गांधीजी आणि तंत्रज्ञानविवेक

‘‘तुम्ही सर्व प्रकारच्या यंत्रसामग्रीच्या विरोधात आहात काय?’’ असे विचारल्यावर ते म्हणाले होते, ‘‘हे शरीरही एक प्रकारचे नाजूक यंत्रच आहे हे कळल्यावर मी कसा काय बुवा त्याचा विरोध करू शकतो?.. माझा विरोध यंत्राला नाही, तर यंत्राच्या मागे धावण्याला आहे.. सगळ्यात महत्त्वाचा आहे माणूस. मला काही यंत्रे मान्य आहेत. उदा.- सिंगरचे शिलाई मशीन हा एक उपयुक्त शोध आहे.’’

‘‘पण’’.. प्रश्नकर्ता म्हणाला, ‘‘तुमचा चरखा आणि सिंगर शिलाई मशीनचा जर तुम्ही अपवाद करीत असला, तर या अपवादाचा अंत कुठे होईल?’’

‘‘ते यंत्र व्यक्तीला मदत न करता तिच्यावर अतिक्रमण करेल, तिथे. यंत्राने माणसाला कधीच अपंगत्व आणता कामा नये.’’

सर्वसामान्य माणसाच्या नियंत्रणात असणारे समुचित यंत्र म्हणून त्यांनी चरख्याचे पुनरुज्जीवन केले. पण ‘केवळ चरख्याचे संगीत हे भारतीय स्वातंत्र्याचे उद्गाते ठरणार नाही. त्याच्या सर्व वैज्ञानिक कोनांचा अभ्यास करून ते अधिक परिपूर्ण बनवावे लागेल’, याचे त्यांना भान होते. म्हणूनच त्यांनी २४ जुल १९२९ ला अखिल भारतीय चरखा संघाच्या वतीने चरख्याच्या सर्वोत्तम डिझाइनसाठी एक महास्पर्धा जाहीर केली. त्यासाठी त्यांनी तब्बल एक लाख (आजचे २० कोटी) रुपयांचे बक्षीस ठेवले होते. सर्वसाधारण (भारतीय) स्त्रीस, तिची फार दमछाक न होता दिवसाकाठी आठ तास चरख्यावर बसता येईल अशी ज्याची रचना असेल, ज्याची किंमत १५० रुपयांहून कमी असेल व ज्याची देखभाल सहजतेने करता येईल असा चरखा किंवा तत्सम यंत्र बनविण्याचे आव्हान तत्कालीन संशोधकांना पेलता आले नाही, हा वेगळा इतिहास आहे.

येरवडा तुरुंगात असताना गांधीजींना आकाशदर्शनाचा छंद जडला. १९३५ साली कॅरल हुजेर हा विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ खगोलशास्त्रज्ञ भारतात आला असताना त्यांनी त्याला थेट सेवाग्राम आश्रमात आमंत्रित केले व दोन आठवडे रोज त्याची व्याख्याने आश्रमात आयोजित केली. विषय होता ‘आधुनिक खगोलशास्त्राचे तत्त्वचिंतनात्मक आयाम’ आणि श्रोते होते समस्त आश्रमवासी. ‘येथील लहान मुलांनाही या विषयात गंमत वाटेल अशा रीतीने तुम्ही बोला’ असे आवाहन गांधीजींनी त्या प्रकांडपंडिताला केले व त्यानेही ते शिरोधार्य मानले. त्या वर्षीच्या काँग्रेसच्या अधिवेशनात हुजेरची दोन व्याख्यानेही त्यांनी आयोजित केली. (२१ व्या शतकात कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिवेशनात कोणत्याही शुद्ध वैज्ञानिक प्रश्नांवर व्याख्यान आयोजित केल्याचे तुम्हाला स्मरते का?)

गांधीजींचे विज्ञानाशी असणारे नाते खूप गुंतागुंतीचे आहे. त्यांनी वैज्ञानिक पद्धती स्वीकारली व जीवनाच्या विविध क्षेत्रांत तिचा उपयोग केला. विज्ञानातील ‘रोमान्स’ त्यांनी अनुभवला व इतरांनी तो अनुभवावा म्हणून त्यांना प्रेरितही केले. पण विवेकवाद स्वीकारूनही त्यांनी त्याला सर्वोच्च मूल्य मानायचे नाकारले. कारण ते सत्याचे शोधक होते आणि सत्य हे विज्ञानाच्या किंवा तर्काच्या चिमटीत सापडण्यासारखे नाही, त्याहूनही ते सूक्ष्म आहे, असा त्यांचा विश्वास होता. विज्ञानावर त्यांनी महत्त्वाचे आक्षेप घेतले. त्यांना विज्ञानाची न-नतिकवादी भूमिका मान्य नव्हती. ‘मानवतेवीण विज्ञान’ हे त्यांनी जगाच्या सात पापांपकी एक मानले होते. परंतु त्यांनी कधीही अंधश्रद्धा, कर्मकांड, धार्मिक अभिमान यांना थारा दिला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका धर्मवाद्यांपेक्षा भिन्न ठरते.

नसíगक संसाधनांचे अर्निबध दोहन, मानवी श्रमांचे शोषण व अमर्याद हाव व उपभोग यांवर आधारलेले विकासाचे प्रारूप गांधीजींनी समूळ नाकारले. आज सारे विश्व कडेलोटाच्या अवस्थेला पोहोचले असताना त्यांनी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानावर घेतलेले आक्षेप  किती रास्त होते, याची अनेकांना खात्री पटली आहे. म्हणूनच माशेलकरांसारखे वैज्ञानिक म्हणतात की, या जगाला आता फक्त गांधीप्रणीत अभियांत्रिकीच तारू शकेल. अशा या व्याख्येत न बसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावे, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या विवेकावर सोडलेले बरे, कसे?

ravindrarp@gmail.com