अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खरेच शांत झालेत का? निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे त्यांचे दावे निकाली निघाले, पण प्रश्न उरतोच- पुढे काय? निवडणुकीनंतरची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांनी जन्मास घातलेल्या ‘सेव्ह अमेरिका’ या मोहिमेचे आणि त्यासाठी जमवलेल्या निधीचे काय? ट्रम्प यांच्या राजवटीने निर्माण केलेल्या प्रश्नांचे काय? पर्यायाने नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्यापुढील आव्हानांचे काय? माध्यमांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रम्प यांनी निवडणूक निकालाबाबत खोटे दावे करून, ते न्यायालयात लढण्यासाठी समर्थकांकडून भरघोस निधी जमवला, त्याचे काय होणार, असा प्रश्न विचारणारा ख्रिस मॅक्ग्रिल यांचा लेख ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केला आहे. ट्रम्प आणि त्यांचे सहकारी हा निधी राजकारणात सक्रिय राहण्यासाठी वापरू शकतात, असे त्यात म्हटले आहे. जॉर्ज मेसन विद्यापीठातील राजकीय तज्ज्ञ प्रा. जेनिफर व्हिक्टर यांनी- ट्रम्प या निधीचा उपयोग ‘ट्रम्पवाद’ टिकवून ठेवण्यासाठी करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा उल्लेख या लेखात आहे. ट्रम्प यांनी स्थापन केलेली ‘सेव्ह अमेरिका’ ही संघटना म्हणजे ‘पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी (पीएसी)’ आहे. राजकारणात सक्रिय राहण्याची ट्रम्प यांची योजना असल्यामुळेच त्यांनी ‘पीएसी’ची निर्मिती केल्याचे ब्रेण्डन फिशर या नामवंत वित्ततज्ज्ञाच्या निरीक्षणाचा हवालाही या लेखात देण्यात आला आहे. निवडणूकपश्चात अशा प्रकारे निधी उभारणे हे अभूतपूर्व आहे आणि तो ट्रम्प यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे. पराभवानंतर लगेच ‘पीएसी’ स्थापन करणारे ट्रम्प हे पहिले अध्यक्ष असावेत, असे मत फिशर यांनी मांडले आहे.

अमेरिकी राजकारणावरील ट्रम्प यांच्या प्रभावाचे मूल्यमापन करताना ‘द अ‍ॅटलांटिक’मधील लेखात राजकीय विश्लेषक जोनाथन राउच यांनी- ‘ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षातील लोकशाहीविरोधी शक्तींना बळकट केले, ‘रिपब्लिकन पक्षाचे गॉडफादर’ अशी आपली प्रतिमा मजबूत केली आणि रशियन शैलीतील अपप्रचाराला अमेरिकी राजकारणाचे मुख्य वैशिष्टय़ बनवले,’ असे भाष्य केले आहे.

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ‘मेक अमेरिका सेफ अगेन’ या दोन घोषणांनी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली होती, पण ट्रम्प प्रशासन अमेरिकेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा निष्कर्ष ‘द अ‍ॅटलांटिक’मधील आणखी एका लेखात डेव्हिड ग्रॅहम या तज्ज्ञाने काढला आहे. त्यास संदर्भ आहे तो रशियाने केलेल्या कथित सायबर हल्ल्याचा.

‘द वीक’मधील- ट्रम्प यांचा पराभव झाला हे बरे झाले, त्यात वाईट वाटण्यासारखे काय, असे म्हणणाऱ्या लेखात, ‘ट्रम्प यांचा पराभव साजरा करताना जो बायडेन यांचा विजय साजरा करता येणार नाही,’ अशी खंत जोएल मॅथिस या राजकीय भाष्यकाराने व्यक्त केली आहे. टम्प यांचे अध्यक्ष होणे त्या वेळी आपल्यापैकी अनेकांना भीतिदायक वाटले होते, पण आता ज्याची आपल्याला आशा होती त्या बायडेन यांच्या निवडीने किमान अद्याप तरी दिलासा मिळालेला नाही. करोनामुळे रोज हजारो अमेरिकी नागरिकांचा बळी जात आहे. नव्या प्रशासनाची सुरुवात ही सहसा एका नव्या संधीच्या प्रारंभासारखी वाटत असली, तरी खोलवर गेलेली मुळे उपटून काढणे कठीण असल्याचेही या लेखात म्हटले आहे.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील ‘ट्रम्प यांच्यानंतरची जबाबदारी’ अशा शीर्षकाच्या लेखात नियोजित अध्यक्ष बायडेन यांच्यापुढील आव्हानांवर चर्चा केली आहे. गेल्या चार वर्षांत मोडकळीस आलेल्या लोकशाहीच्या संरक्षक यंत्रणेची पुनर्उभारणी आणि अराजकता निर्माण केल्याबद्दल मागील प्रशासनावर जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान बायडेन यांच्यापुढे असल्याचे या लेखात म्हटले आहे. मावळत्या अध्यक्षांनी सत्तेचा गैरवापर करून केलेले लोकशाहीचे नुकसान भरून काढणे, भ्रष्टाचार संपवणे अशा सर्व आघाडय़ांवर काम करण्याबरोबरच अमेरिकेच्या आत्म्याची पुनस्र्थापना करण्याचे आव्हानही बायडेन यांना स्वीकारावे लागेल, अशी अपेक्षाही लेखात व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे नेतृत्व पुनस्र्थापित करण्यासाठी आणि ढासळलेली प्रतिमा पुन्हा निर्माण करण्यासाठी नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी व्यक्त केलेली इच्छा हे त्या दृष्टीने पडलेले अत्यावश्यक पाऊल असल्याची टिप्पणी डॅन बाल्झ यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील लेखात केली आहे. करोना साथ नियंत्रणात आणणे, अर्थव्यवस्था सावरणे या बाबतीत बायडेन कसे काम करतात, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण त्यावरून ट्रम्पयुगानंतरच्या अमेरिकेबद्दल जगाचा नवा दृष्टिकोन आकार घेऊ शकतो, असे प्रतिपादनही या लेखात करण्यात आले आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)