‘हवामानबदल हे थोतांड आहे; ओझोनच्या थराला छिद्र पडले हे खरे नाही; ज्योतिषावर विश्वास ठेवण्यात गैर काही नाही; एड्स हा एचआयव्ही विषाणूमुळे होत नाही..’ ही मते कुणा सामान्य माणसाची नाहीत, तर एका नोबेलविजेत्या वैज्ञानिकाची आहेत. अर्थात, या मतांमुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली होती; पण तरीही त्यांचे संशोधन क्रांतिकारक होते. हे बहुढंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे- कॅरी बी. म्युलिस! त्यांचे नुकतेच निधन झाले. कुणालाही हार न गेलेल्या या प्रज्ञावंताला ‘पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) या डीएनए विश्लेषणाच्या तंत्रशोधासाठी १९९३ साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. म्युलिस यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग एका डीएनए रेणूच्या लाखो प्रती मिळवण्यासाठी करतात. गुन्हे संशोधनातही त्याचा बराच उपयोग होत आहे. विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा शोध म्हणून ‘पीसीआर’चा उल्लेख केला जातो. अगदी ४० हजार वर्षांपूर्वीच्या गोठवलेल्या डीएनएपासून सजीवाची ओळख पटवणारे हे तंत्र आहे. १९९३ च्या ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटात याच तंत्राने डायनॉसोर जिवंत केल्याची कल्पना रंगवली होती!

आधी जॉर्जिया तंत्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या आणि पुढे कॅलिफोर्निया विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळविलेल्या म्युलिस यांना विज्ञानाविषयीची जिज्ञासा लहानपणापासूनच होती. पोटॅशियम व साखर यांचे इंधन वापरून एक अग्निबाण त्यांनी लहानपणी तयार केला होता आणि त्यातून एका बेडकाला आकाशात सोडले होते. हा बेडूक नंतर सुखरूप खाली पडला ही गोष्ट निराळी! पुढील काळात त्यांच्या स्वभावात लहरीपणा डोकावत असे. ‘एड्स हा एचआयव्ही विषाणूमुळे होत नाही’ किंवा ‘जागतिक तापमानवाढ हे थोतांड आहे’ अशी धक्कादायक आणि सवंगपणे व्यक्त केलेली मते असोत किंवा आभासी दुनिया अनुभवण्यासाठी त्यांनी एलएसडीचे केलेले व्यसन असो, त्यांतून ते दिसलेच.

स्फोटके व विष तयार करण्याची प्रयोगशाळा म्युलिस यांनी उभारली होती. नंतर मेंदूच्या लहरींवर चालणारे एक स्विच तयार केले होते. पुढे काही काळ त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, एका बेकरीत काम केले आणि पुन्हा विज्ञानाकडे परतले. ‘सीटस कार्पोरेशन’ या जैवतंत्रज्ञान कंपनीत त्यांनी काम केले. तिथल्या सहाएक वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पीसीआर तंत्राचा शोध लावला. ‘डान्सिंग नेकेड इन द माइंड फील्ड’ या आत्मचरित्रात त्यांनी ज्या विक्षिप्त कल्पना मांडल्या आहेत, त्यावरून त्यांचे स्वभावचित्र स्पष्ट होते. पण ते सर्जनशील विज्ञानसंशोधक होते, यात शंका नाही.