वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अ‍ॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले. दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वादुिपडाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.

१९६० च्या सुमारास हॅलोथेन व मेथोक्झायफ्लुरेन या दोन औषधांचा वापर त्यांनी भूल देण्यासाठी सुरू केला होता. नंतर एनफ्लुरेन व आयसोफ्लुरेन यांचा वापर १९७० मध्ये, तर डेस्फ्लुरेनचा वापर १९९० मध्ये सुरू झाला. शस्त्रक्रियेत रुग्णाच्या हालचाली थांबवण्याची गरज असते, त्याकरिता भूल आवश्यक ठरते. त्यातही कमीत कमी औषध वापरून हा परिणाम साधण्याचे ‘मिनिमम अलव्हेलॉर कॉन्स्ट्रेशन’ तंत्र त्यांनी विकसित केले. आजपर्यंत त्यांनी ठरवून दिलेली औषधांची मात्राच भूल देताना प्रमाण मानली जात आहे. भुलीचे काम संपल्यानंतर या औषधांचा परिणाम पटकन संपवणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांनी श्वासातून दिली जाणारी भुलीची औषधे कशी द्यायची याचे काही नियमही सांगितले होते. आजही त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेली आयसोफ्लुरेन, सेव्होफ्लुरेन, डेसफ्लुरेन ही औषधे भूल देण्यासाठी वापरली जातात. एडमंड यांचा जन्म १९३० मध्ये शिकागोत झाला. त्यांचे वडील जाहिरात व्यवसायात होते. वयाच्या सहाव्या वर्षी एडमंड यांना ईथरच्या मदतीने भूल देण्यात आली होती तेव्हा त्यांना जे अनुभव आले त्यातूनच त्यांनी भूलशास्त्रात काम करण्याचे निश्चित केले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ते हाईड पार्क स्कूलमधून पदवीधर झाले. अभ्यासात ते फार हुशार नव्हते. महिलांचे बूट विकण्याचा व्यवसाय करीत त्यांनी रुझवेल्ट महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर इलिनॉय विद्यापीठातून रसायनशास्त्र व गणितात पदवी घेतली. १९५५ मध्ये नॉर्थवेस्टर्न मेडिकल स्कूलमधून वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली. त्या वेळी आंतरवासीयता पूर्ण करताना एकदा भूलशास्त्रात वापरले जाणारे विशिष्ट थिओपेंटाल दिलेल्या रुग्णाला जवळजवळ मृत्यूने गाठले होते, पण एडमंड यांनी विशिष्ट तंत्र वापरून त्याला वाचवले.

डॉ. जॉन सेव्हिरगहॉस यांनी डॉ. एडमंड यांच्या शरीरशास्त्रविषयक काही मुद्दय़ांवर शंका उपस्थित केली होती, पण त्यांनी ५० वर्षे अभ्यास करून या शंकांना गणितीय पद्धतीने उत्तर दिले होते. एकूण पाचशेवर शोधनिबंध त्यांनी लिहिले. एकूण २४ अध्यासनांचे प्रमुखपद त्यांनी भूषवले होते. ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ या लंडनच्या संस्थेचे ते फेलो होते. सात पुस्तकांचे ते लेखक किंवा सहलेखक होते. त्यात ‘अ‍ॅनेस्थेटिक अपटेक अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन’ या पुस्तकाचा समावेश आहे. ‘द वंडर्स स्टोरी ऑफ अ‍ॅनेस्थेशिया’ हे पुस्तक त्यांनी लॉरेन्स सेडमन व रॉड्रिक वेस्थोर्प यांच्यासमवेत संपादित केले. भूलशास्त्रात वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ‘वेस्टर्न अ‍ॅनेस्थेशिया रेसिडेंट्स कॉन्फरन्स’ ही संस्था स्थापन केली. शेवटची वीस वर्षे त्यांनी भुलीची औषधे नेमकी कशी काम करतात यावर संशोधनात खर्च केली. हे सगळे करत असताना त्यांना निसर्गात भटकंतीची आवड होती, ते चांगले गिर्यारोहक होते. त्यांच्या जाण्याने वैद्यक क्षेत्राला होणाऱ्या वेदना मात्र भुलीच्या कुठल्याही औषधाने बधिर होण्यासारख्या नाहीत!