सतीश काळसेकर गेल्यावर ‘डाव्या विचारधारेचे कवी-लेखक’ असा त्यांचा उल्लेख फार कुणी केला नाही. बँकेत नोकरी करणारे, ट्रेकिंगची आवड असणारे, पुस्तकांचा भलाथोरला संग्रह करणारे , कवितांमधून बदलत्या जगण्याचे चिंतन मांडणारे आणि ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ लिहून पुस्तकांशी चाललेला अथक संवाद वाचकांपर्यंत (आणि वाचन विसरलेल्यांपर्यंतही) पोहोचवणारे सतीश काळसेकर गेल्या अनेक वर्षांत ‘लोकवाङ्मय गृहा’तही फार दिसत नसत. त्याहीमुळे असेल, पण त्यांचे डावेपण नजरेआड झाले. ‘‘लिहिणाऱ्यांना प्रस्थापित व्यवस्थेवरच अवलंबून राहावं लागतं. मग प्रस्थापित स्वत:च्या कलानुसार कोणाला उजेडात आणावं अन् कोणाला अंधारात लोटावं, याचा निर्णय घेऊ लागतात. अशावेळी या मक्तेदारीला रोखून धरणं आवश्यक ठरतं. आम्ही सुरू केलेल्या लघुनियतकालिकांच्या चळवळीने हेच केलं. ’’ यासारखी त्यांची विधानेच (लोकसत्ता- २५ सप्टें. २०१६) आता त्यांच्या डावेपणाची साक्ष देवोत, निष्ठा आणि अभिनिवेश यांमधला फरकही त्यातून ध्यानात येवो! काळसेकर अभिनिवेशवाले नव्हते, त्यामुळेच ही चळवळ १९६४ पासून दशकभर त्यांनी नेटाने चालवली, पुढेही जपली! या चळवळीचा भाग म्हणून पॉल सेलान, सीझर वालेजो, राफाएल अल्बेर्ती यांसारख्या कवींच्या कविता त्यांनी मराठीत आणल्या. मित्रांसह ‘संहिता प्रकाशन’ सुरू केले आणि अनेक लघु अ-नियतकालिकांचे संपादन (स्वखर्चाने वगैरे) केले. एकमेकांना धरून राहणारे प्रस्थापित एकीकडे, तर काळसेकर- अशोक शहाणे- राजा ढाले- प्रदीप नेरूरकर- दिलीप चित्रे – अरुण कोलटकर असे नवे काही करू पाहाणारे पण स्वत:ला आणि एकमेकांनाही सतत तपासून पाहणारे तरुण दुसऱ्या बाजूला! यात हे तरुण एकमेकांपासून दुरावणे आलेच; पण अशा दुरावलेल्यांचाही दुवा पुढल्या काळात काळसेकर होते. मित्रसंग्रह मोठा, ग्रंथसंग्रह त्याहून मोठा आणि मानवी जीवनाबद्दलची आस्था त्याहूनही कैकपट मोठी. त्यामुळे आज हयात असलेल्या मित्रांच्या आठवणींतून काळसेकर उरतील, त्यांचा ग्रंथसंग्रह (विशेषत: त्यातील लघु-अनियतकालिकांचा अमूल्य ठेवा) कदाचित सुस्थळी पडेल.. आणि जीवनाविषयीची आस्था? ती मात्र काळसेकरांच्या कवितांतून उरेल. वरवर पाहाता थेट संवादी, पण एकत्रित वाचल्यास कवीच्या आत्मशोधाचेच दर्शन घडवणारी त्यांची कविता   ‘इंद्रियोपनिषद’ (मे १९७१) ‘साक्षात’ (ऑगस्ट १९८२) आणि ‘विलंबित’ (मे १९९७) या संग्रहांबाहेरही आहे. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखसंग्रहाइतक्याच मनोज्ञ त्यांच्या ग्रंथखुणाही आहेत. ते लेख जसे वाचकाला आणखी हवे असताना, कुठेतरी थांबायला हवेच म्हणून ‘आमेन’म्हणत, तसे काळसेकर गेले.

dispute between mahayuti is not solved in Nandurbar Shinde group still away from campaigning
नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर
ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा