नेत्रविज्ञानात आता बरीच प्रगती झाली आहे. मोतीबिंदू, काचबिंदू यांसारख्या समस्यांवर बरेच संशोधन झाले आहे. नेत्ररोगतज्ज्ञ तर यात मोठी भूमिका पार पाडत असतातच, पण नेत्रसंशोधकांचाही यात मोठा वाटा असतो हे मात्र समाजापुढे येत नाही. नेत्र जैवभौतिकशास्त्रज्ञ डॉ. आशिक महंमद या भारतीय संशोधकाने डोळ्यांविषयीच्या संशोधनात मोठी कामगिरी केली आहे. ते ‘ऑक्युलर टिश्यू’ संशोधक आहेत. या डोळ्यातील एक प्रकारच्या उती असतात. कॉर्निआ व स्फटिकी नेत्रभिंगे हे त्यांचे संशोधनाचे आणखी वेगळे विषय. दृश्यात्मक प्रकाश संवेदनशीलतेचे कमाल परिमाण यावरही त्यांनी काम केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स, राउंड हाऊसच्या माजी विद्यार्थ्यांमधून त्यांना या संशोधनासाठी २०१८ चा ‘माजी विद्यार्थी संशोधक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. एक लाख माजी विद्यार्थ्यांमधून त्यांची निवड करण्यात आली. नेत्रविज्ञानात काम करण्यास या पुरस्कारामुळे मिळालेले प्रोत्साहन अतिशय महत्त्वाचे आहे असे ते म्हणतात. या विद्यापीठाच्या ‘ब्रायन व्हिजन होल्डन व्हिजन इन्स्टिटय़ूट’ (बीव्हीएचआय) या संस्थेतून पीएचडी घेऊन, ऑस्ट्रेलियातून ते मायदेशी आले. प्रख्यात ‘एलव्ही प्रसाद नेत्र संस्थे’त महंमद हे संशोधन करीत असून तेथेच अध्यापनाचे कामही करीत आहेत. या संस्थेच्या ऑपथॅलमिक बायोफिजिक्स लॅबोरेटरीचे ते प्रमुख आहेत.

महंमद यांनी बीएचव्हीआय संशोधन केंद्रात असताना डोळ्याच्या नैसर्गिक नेत्रभिंगाला पर्याय निर्माण करण्याच्या ‘अ‍ॅकोमोडेटिंग जेल’ प्रकल्पात भाग घेतला. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांसाठी असे नेत्रभिंग वरदान ठरणार आहे. एलव्ही प्रसाद नेत्र संस्थेत नव्या प्रयोगशाळेची जबाबदारी ते सांभाळत आहेत. परदेशात त्यांनी द लाइफ जर्नी ऑफ ह्य़ूमन आय लेन्स या विषयावर सादरीकरणे केली आहेत. डॉ. आशिक महंमद हे एमबीबीएस, एमटेक व पीएचडी असून ते एल. व्ही. प्रसाद नेत्र मदुराई मेडिकल कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी मद्रास आयआयटीतून वैद्यकीय जैवतंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. एकंदर ४० शास्त्रीय शोधनिबंध त्यांनी तिशीच्या वयातच लिहिले आहेत. नेत्रविज्ञानासारख्या वेगळ्या विषयात संशोधन करून नाव कमावणाऱ्या डॉ. आशिक महंमद यांनी नकळतपणे अनेकांच्या जीवनात प्रकाशज्योती लावण्याचा ध्यास घेतला आहे.