आज देशविदेशात अनुवादित साहित्य मोठय़ा संख्येने वाचले जाते. ज्येष्ठ लेखिका डॉ. मानसी कणेकर यांनी तर वयाच्या २९ व्या वर्षी अनुवादशास्त्रात पीएच.डी. मिळवली होती. लॉर्का या प्रसिद्ध स्पॅनिश नाटककाराची तीन नाटके त्यांनी अत्यंत प्रभावी रीतीने मराठीत अनुवादित केली. ‘चांगुणा’, ‘सप्तपुत्तलिका’, ‘वाडा भवानी आईचा’ या त्यांच्या गाजलेल्या कलाकृती. ‘चांगुणा’ हे नाटक आजही नाटय़संमेलनातील चर्चेत वेगळे स्थान मिळवते. या नाटकाचे लेखन डॉ. आरती हवालदार या आपल्या पूर्वीच्या सांसारिक नावाने त्यांनी केले. पुनर्विवाहानंतर त्या डॉ. मानसी कणेकर या नावाने लिहू लागल्या.

हिंदीतील मोहन मोहन यांच्या ‘लहेरों के राजहंस’ या नाटकाचा त्यांनी केलेला ‘क्षणतरंग’ हा अनुवाद मराठी रंगभूमीवर गाजला. त्यांचा ‘साक्षी’ हा कथासंग्रहसुद्धा वाचकप्रिय ठरला. लेखनकलेबरोबरच त्यांना उत्तम गोड गाता गळा लाभला होता. उर्दू गजल नजाकतीने आणि उच्चारांचा लेहेजा सांभाळत कशी म्हणावी याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. मानसी कणेकर असे म्हटले जाई. त्या स्वत: उत्तम गझल लिहीत असत. ‘छंद प्रीतीचा’ या मराठी चित्रपटात वसंतराव देशपांडे यांच्यासोबत त्यांनी गायलेले ‘सूर धरिते अमृतवीणा’ हे द्वंद्वगीत आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नंतरच्या काळात अध्यात्म विषयाकडे वळल्यावर अमृतानुभवावर ‘अनुभावामृत अनुभावामृतपणे’ हे अत्यंत रसाळ आणि विस्तृत भाष्य त्यांनी लिहिले. २० वर्षांहून अधिक काळ त्यांनी शंकराचार्याच्या सौंदर्यलहरी स्तोत्राचा अभ्यास करून श्री यंत्र उपासनेवर सौंदर्यलहरी नावाचे सुंदर पुस्तक सिद्ध केले. श्री यंत्राच्या त्या उपासक होत्या. ‘ज्ञानदेव तेहतीशी’ या प्रकरणावर योगशास्त्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकणारे ‘सुनीलतारा’ हे पुस्तकही विद्वानांच्या कौतुकाला पात्र ठरले. ज्ञानदेव महाराजांच्या अभंगांचा अतिशय सूक्ष्म आणि तितकाच रसाळ, प्रभावी आशय लिहिण्याचे काम नुकतेच मानसी कणेकर यांनी हातावेगळे केले. सिम्बोलिझम.. अर्थात प्रतीकशास्त्र या विषयाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ख्यातकीर्त आध्यात्मिक चित्रकार शिवानंद म्हणजेच उदयराज गडणीस यांच्या प्रतीकातून बोलणाऱ्या चित्रांनी सजलेली डॉ. मानसी कणेकर यांची पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अध्यात्माच्या दालनातील एक सुबक आणि सुंदर शिल्पेच म्हणावी लागतील. अत्यंत माहितीपूर्ण असे पाककृतीवरचे त्याचे ‘ममा’ (मसाला मानसीचा) नावाचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.. साध्या बोलण्यालाही असलेला ओघ, ज्ञानाची डूब आणि बोलण्यातला जिव्हाळा या गुणांनी साऱ्यांना जिंकून घेणाऱ्या डॉ. मानसी कणेकर यांना शेवटच्या काळात प्रकृतीने मात्र साथ दिली नाही. तरीही सतत हसतमुखाने कार्यरत राहून त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानोपासना केली. त्यांच्या निधनाने इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व असणारी एक अष्टपैलू विदुषी काळाच्या पडद्याआड गेली आहे.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
kerala caste politics loksabha
मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित
hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र