खरं तर ते कॅनडातील माजी उद्योगपती. तेल व वायू उद्योगातील अब्जाधीश म्हणून त्यांचा नावलौकिक होता पण संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेनंतर त्यांच्या विचारांची दिशाच बदलली, पर्यावरणासाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. पर्यावरणाचे नुकसान करण्याच्या पापाचे आपण धनी आहोत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. नंतरच्या काळात स्टॉकहोमपासून आताच्या पॅरिस हवामान परिषदेसाठी त्यांनी नियोजनाचे जे काम केले होते ते अतुलनीय आहे. पॅरिस हवामान परिषदेच्या आधीच त्यांचे निधन व्हावे हे दुर्दैव.

खरे तर ते वसुंधरेचे राखणदार होते पण ज्यांना पर्यावरण शब्दही नकोसा असतो त्यांच्यासाठी नेहमी विनाशाचा बागुलबुवा दाखवणारे निराशावादी व्यक्ती होते. मॉरिस स्ट्राँग यांनी जगात पहिल्यांदा पर्यावरणाचा मुद्दा पुढे आणला. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण संस्थेचे प्रमुख अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी पर्यावरणासाठीच्या आंतरराष्ट्रीय राजनयाची कल्पना मांडली. आज आपण ज्या पर्यावरण प्रश्नावर जोराने चर्चा करीत आहोत तो त्यांनी १९७० मध्येच मांडला होता, हा प्रश्न माणसांनीच निर्माण केला आहे, असे ते सांगत असत. कुठल्याही हवामान परिषदेत प्रदूषण कमी करण्याची इच्छाशक्ती दाखवताना देश मागे पडतात, त्या वेळी त्यांना आपल्या देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्याची आठवण होते असे त्यांचे म्हणणे होते. आजही पॅरिस परिषदेत तेच दिसते आहे. मॉरिस फ्रेडरिक स्ट्राँग यांचा जन्म २९ एप्रिल १९२९ रोजी दक्षिण मनीटोबा येथे झाला. त्यांचे वडील बेरोजगार होते. चौदाव्या वर्षी मॉरिस यांनी घर सोडले. नंतर ते व्यापारी जहाजांवर काम करीत होते. जॉन. ई. पी. गॉलघेर यांनी त्यांना तेल उद्योगात आणले. नंतर ते कॅनेडियन इंडस्ट्रियल गॅस अ‍ॅण्ड पॉवर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. कॅनडा आंतरराष्ट्रीय विकास संस्थेत पंतप्रधान लेस्टन पियरसन यांनी त्यांना नियुक्त केले. संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस यू थांट यांचे लक्ष त्यांच्या कार्याकडे वळले व नंतर त्यांना स्टॉकहोम परिषदेचे निमंत्रक म्हणून नेमण्यात आले. १९९२ च्या रिओ हवामान परिषदेत त्यांनी १७८ देशांच्या प्रतिनिधींना एकत्र आणले. क्योटो परिषदेतही त्यांचा मोठा वाटा होता. दारिद्रय़ कमी केले तरच शाश्वत विकास होऊ शकतो, असे त्यांनी तेव्हा पटवून दिले. त्यांच्या व्हेअर ऑन अर्थ आर वुई गोइंग या पुस्तकात त्यांनी असा इशारा दिला होता की, पर्यावरणाच्या विनाशाने ज्या दुर्घटना होतील त्यामुळे तीस वर्षांत दोनतृतीयांश लोकसंख्या नष्ट होईल. हळूहळू पण निश्चितपणे आज पर्यावरण संरक्षणाचा विचार रुजतो आहे. त्याचे श्रेय स्ट्राँग यांना आहे यात शंका नाही.