ऑस्कर पुरस्कारांमध्ये जसा परभाषिक चित्रपटांच्या गटातच भारतीय चित्रपटांचा शिरकाव होऊ शकतो, त्याचप्रमाणे ग्रॅमी पुरस्काराच्या ‘वर्ल्ड म्युझिक’ वर्गवारीतच भारतीय कलाकारांची वर्णी लागू शकते. आपल्या दृष्टीने अनेक महान आणि लोकांच्या मनात वसलेल्या लाडक्या कलाकारांची या पुरस्कारासाठी नामांकने झाली आहेत. पण पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये पंडित रविशंकर, झाकीर हुसेन ही ज्येष्ठ  नावे आहेत. आशा भोसले यांना दोन वेळा तर अनुष्का शंकर यांना सहा वेळा या पुरस्काराच्या नामांकनावरच समाधान मानावे लागले. ए. आर. रेहमान, पी. ए. दीपक, एच. श्रीधर यांना स्लमडॉग मिलिनीअरसाठी पुरस्कार मिळाला होता. भारतातून अनेक कलावंत जागतिक कीर्तीच्या कलाकारांना साथसंगत करीत असतात. यात पॉप गायिका शकिरा (तिच्या जिप्सी या गाण्यातील घटम खासच ऐका) हिच्यापासून ताज्या घडीचे कित्येक गायक-गायिका असतात. विश्वमोहन भट यांना ‘अ मीटिंग बाय द रिव्हर’ अल्बमसाठी, रिकी केज या संगीतकाराला दक्षिण आफ्रिकेतील एका बासरीवादकासोबत साथीसाठी पुरस्कार लाभला होता. यंदा पाटण्याचे जागतिक ख्यातीचे तबलावादक संदीप दास यांना अमेरिकी चेलो (सेलो) वादक यो-यो मा यांच्या ‘सिंग मी होम’ या अल्बममधील वादनासाठी पुरस्कार मिळाला! ही केवळ ‘साथसंगत’ नव्हती.. यो-यो मा यांच्यासोबत संदीप दास यांनी केलेली तबला- चेलो जुगलबंदी त्यांना ग्रॅमी पटकावून देणारी ठरली.

भारतीय माध्यमांनी गेल्या आठवडय़ातील या बातमीनंतर ‘ग्रॅमीवर भारतीय मोहोर’ आदी बरेच भावुक चिंतन केलेले आहेच. वास्तविक, केवळ संगीत अध्ययनासाठी पाटण्याहून दिल्ली गाठणाऱ्या या कलावंताबाबत गेल्या आठवडय़ापर्यंत भारतातील अध्र्याहून अधिक दर्दी संगीत वर्तुळ लौकिकार्थाने अनभिज्ञच होते. तरीही ‘झाकीर हुसेन यांच्यानंतर भारतातील निष्णात तबलजी’ अशी त्यांची पाश्चिमात्य जगतात ओळख आहे.

पंडित किशन महाराज यांचे शिष्य असलेल्या संदीप दास यांनी आठव्या वर्षांपासून वादनाचा गणेशा केला. पंधराव्या वर्षी साक्षात पंडित रविशंकर यांच्याबरोबर साथसंगत केली. शाळेत बेंचला तबल्यासमान बडवीत असल्याबद्दल शिक्षकांनी त्यांच्या घरात तक्रार केली होती. तरीही घरातल्यांनी त्यावरून ‘बोल’ देण्याऐवजी, तबल्याचे बोल शिकण्यासाठी त्यांची रवानगी संगीत शाळेत करण्यात आली. यो-यो मा १९९८ पासून जगभरातील कलावंतांना एकत्रित करून सिल्करोड ही संगीतसंस्था चालवत आहेत. त्यांना आत्तापर्यंत १८ ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या वादनताफ्यातील वाद्यांमध्ये जगभरातील अज्ञात वाद्य-वादकांचाही समावेश असतो. २००० सालापासून संदीप या ताफ्यात दाखल झाले. यूटय़ूबवर त्यांच्या अनेक सूरमैफली ऐकायला-पाहायला मिळतात. त्यांना २००३ आणि २००९ या साली ग्रॅमीची नामांकने मिळाली आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये वास्तव्य करून आहेत. तेथील अनेक महाविद्यालयांत भारतीय संगीताचे ज्ञानवाटप करीत आहेत.

आपल्या देशात भारतीय नाव जगातल्या कोणत्याही पुरस्काराचे मानकरी ठरले की, निव्वळ छाती अमर्याद अभिमानाने फुगविणारी प्रतिक्रिया येते. इथे प्रत्यक्ष संगीतावरचे प्रेम हे तोंडदाखले असते. शाळा-महाविद्यालयांतील अभ्यासाइतके संगीताला महत्त्व न देता तो निव्वळ हौसेचा-छंदाचा भाग असल्यासारखे त्याकडे पाहिले जाते. परिणामी जागतिक पटलावर विचार करताना आपल्या कलावंतांची सूर-कारागिरी तुलनात्मकरीत्या कुठे तरी कमी पडते. परिणामी भारतीय नामांकन आणि पुरस्कारांच्या प्रमाणात व्यस्त प्रमाण ही कायमचीच रडकथा असते. या धर्तीवर दास यांना विभागून मिळालेल्या पुरस्काराला मोल आहे. फक्त आपल्या संगीत शिक्षणाच्या दृष्टीत बदल केला, तर असे पुरस्कार पटकावणारे संगीत‘दास’ अनेक घडतील, हे खरे.