‘राजकीय अर्थशास्त्राचे कॅनेडियन अभ्यासक’ ही ओळख स्टीफन क्लार्कसन यांना कारकीर्दभर चिकटली. त्यांचे निधन आठवडय़ापूर्वी- २८ फेब्रुवारीस झाले, त्यानंतर ही ओळख पुसली गेल्यास बरेच. ही ओळख पुसली जाणे अगत्याचे अशासाठी आहे की, त्यांना केवळ ‘कॅनेडियन’ अभ्यासक मानणे चुकीचे ठरेल आणि त्यांच्या अनेक पुस्तकांतून डोकावणारा अमेरिकाविरोध हा खरे तर आज जागतिक पातळीवर मननीय ठरायला हवा. अर्थात, कारकीर्दीच्या बहुतेक टप्प्यांवर त्यांनी कॅनडात राहून आणि काहीसे कॅनडावादी म्हणूनच लिखाण केल्याने, ते पापुद्रे दूर सारूनच त्यांच्या अभ्यासान्ती निघालेले निष्कर्ष जागतिक कसे आहेत, हे शोधावे लागेल.
कॅनडातून ऱ्होड्स शिष्यवृत्तीवर ऑक्सफर्डमध्ये आणि तेथून पॅरिसच्या ऐतिहासिक ‘सोर्बाँ’ विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले स्टीफन क्लार्कसन १९६४ साली मायदेशात परतले. टोरान्टो विद्यापीठाने शिकवण्यासाठी पाचारण केल्यामुळे ते परत आले होते. ‘राज्य आणि बाजारपेठ’ यांमधल्या संबंधांवर विद्यार्थ्यांना त्यांच्या आपापल्या अनुभवातून विचारप्रवृत्त करायचे आणि मग- विद्यार्थ्यांना प्रश्न पडू देऊन त्यांची सैद्धान्तिक उत्तरे कोठे आणि कशी आहेत, हे शिकवून पुन्हा चर्चा सुरू करायची, ही त्यांची पद्धत विद्यार्थ्यांना आवडत असे. यातूनच, अनेक समकालीन प्रश्नांची चर्चा होत असे. ‘कॅनडा अ‍ॅण्ड द रीगन चॅलेंज’ हे अमेरिकेशी कॅनडाच्या असलेल्या संबंधांतील बदलांचा वेध घेणारे पुस्तक क्लार्कसन यांनी १९८२ मध्ये लिहिले, तेव्हापासून त्यांच्यावर ‘कॅनेडियन’ हा शिक्का बसला. २००१ सालच्या (९/११) हल्ल्यानंतर उत्तर अमेरिकेत कॅनडाचे स्थान काय, उत्तर अमेरिकेच्या विभागीय राजकारणातील ‘नाफ्टा’ ही करारसंस्था कमकुवत झाल्यामुळे यापुढे या विभागाच्या राजकीय उद्गारांना आकार आणि अर्थ राहील का, अमेरिका खंडातील मेक्सिको आणि कॅनडा यांचा कोणता प्रभाव या खंडातील अमेरिका (संयुक्त संस्थाने) या देशावर आहे.. असे अनेक प्रश्न त्यांच्या यानंतरच्या पुस्तकांतून धसाला लागले. यानंतरचे ‘अंकल सॅम : ग्लोबलायझेशन, निओकन्झव्‍‌र्हेटिझम अ‍ॅण्ड द कॅनेडियन स्टेट’ हे पुस्तक अमेरिकेपेक्षा कॅनडातील राज्यकर्त्यांच्या धोरणांवर टीका करणारे होते. कधी काळी कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएर त्रुदाँ यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी निवडणूकही लढविली होती! त्यात अर्थातच ते हरले होते. मात्र कॅनडाच्या बहुसांस्कृतिक उदारमतवादी राजकारणाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या त्रुदाँवर त्यांनी तीन पुस्तके लिहिली.
उदारमतवादी राजकारण आणि वित्त-भांडवलोत्तर नवउदारमतवाद यांतला फरक स्पष्ट करण्याची ताकद क्लार्कसन यांच्या लिखाणात आहे. हे वैशिष्टय़ त्यांना जागतिक पातळीवर नेणारे आहे. त्यांचे अगदी पहिले पुस्तक ‘द सोव्हिएत थिअरी ऑफ डेव्हलपमेंट : इंडिया अ‍ॅण्ड द थर्ड वर्ल्ड इन मार्क्‍सिस्ट- लेनिनिस्ट स्कॉलरशिप’ (१९७८) हे या साक्षेपी राज्यशास्त्रज्ञाबद्दलचे भारतीय कुतूहल वाढवण्यासाठी आणखी एक कारण!