‘बाबा आमटे कोण होते?’ या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात द्या, असं जर कुणी मला म्हटलं तर मी म्हणेन- ‘शेतकरी’! सामान्य माणसाच्या अंत:करणातील दातृत्वाला आणि करुणेला अनेकांनी आवाहन केलं. पण करुणेचं महत्त्व मान्य करूनही बाबांनी आवाहन केलं ते कुष्ठरोगी बांधवांच्या अंत:करणातील पराक्रमाला! त्यांच्या सुप्त क्षमता जागृत व्हायला हव्यात, नवनिर्मितीचं वेड त्यांना लागायला हवं, भौतिक संपन्नता हेच दैन्य आणि अभावावर विजय मिळवणारं खरं शस्त्र आहे. आणि या संपन्नतेचा मार्ग विज्ञानाने मोकळा करून दिला आहे याची जाणीव तीव्रतेने त्यांना व्हायला हवी अशी बाबांची अंतरीची इच्छा होती. कुष्ठरुग्ण बांधवांच्या भंगलेल्या मनांची पडीक जमीन अद्यापि नांगरली गेलेली नाही याची बाबांना खात्री होती. बाबांनी याच पडीक जमिनीची मशागत करून त्यात ‘दान माणसाला दीन बनवतं, नादान बनवतं, लाचार बनवतं; श्रम माणसाला घडवतात, त्याच्यात नवी अस्मिता जागी करतात..’ या विचारांचं बीज रुजवलं. म्हणून मी म्हणतो, की बाबा आमटे ‘शेतकरी’ होते. निर्मितीलाच आवाहन करणं आणि निर्मितीचा विश्वास जागा करणं, हा त्यांच्या कार्याचा आधार होता.

बाबा म्हणत, ‘‘अन्न हे आजचं अध्यात्म आहे, उपनिषद आहे. मस्तके उंचावलेली असण्यासाठी पोट भरलेले असावे लागते.’’ याच विचारातून आनंदवनात सर्वात पहिला उद्योग उभा राहिला तो शेतीचा. १९५४ नंतरचा काळ. श्रमाश्रमाच्या प्रयोगादरम्यान छोटय़ाशा जागेवर वाफ्यांच्या रूपात केलेल्या शेतीव्यतिरिक्त बाबांना शेती करण्याचा तसा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. पण पिंडाने विज्ञाननिष्ठ असलेल्या बाबांच्या डिक्शनरीत ‘निराशा’ हा शब्द नव्हता. नीट समजून घेतली तर प्रत्येक गोष्ट आपल्याला समजू शकते, असं ते म्हणत. शिवाय, आनंदवनात उपचारासाठी आलेले बहुतेक कुष्ठरोगी कमी-अधिक प्रमाणात शेतीविषयक ज्ञान बाळगून होते. त्यामुळे त्यांचा पूर्वानुभव आणि मार्गदर्शनाखाली आनंदवनातील शेती बहरू लागली. शेतीक्षेत्रात जगात सुरू असलेले विविध प्रयोग, विकसित होत असलेले नवनवे तंत्रज्ञान याकडेही बाबांचं सतत लक्ष असायचं. ही सर्व माहिती ते कुठून मिळवायचे, ते बाबाच जाणोत. पण कालानुरूप बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला ते कायम तयार असायचे. अगदी आजही नावीन्यपूर्ण वाटावेत असे स्प्रिंकलर्स बाबांनी १९५६-५७ च्या सुमारासच आनंदवनात बसवले! अख्ख्या मध्य भारतात तेव्हा स्प्रिंकलर्स नव्हते. ट्रॅक्टरचंही तसंच. मध्य भारतातला रशियन बनावटीचा पहिला ट्रॅक्टर आनंदवनात होता. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी बाबांनी डिझेल इंजिन वापरणं सुरू केलं, तेही या पन्नाशीच्या दशकातच. एकूणात काय, तर उपलब्ध तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून शेतीत नवनवे प्रयोग करण्यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. त्याकाळी आपल्या देशात कृषी-औद्योगिक स्वयंपूर्ण ग्रामाच्या कल्पना चíचल्या जात असतानाच आनंदवनात असा एक नमुना उभा राहत होता याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. ‘कृषी-औद्योगिक समाज’ या संकल्पनेविषयी बाबा म्हणतात-

Khadimal, Melghat, tanker, water,
पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष! मेळघाटातील हे गाव आहे २८ वर्षांपासून टँकरग्रस्‍त; महिलांना…
mumbai coconut prices marathi news, mumbai coconut rates marathi news
आवक घटल्याने शहाळी महाग
demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक

‘अभावांचे लचके तोडून कितीही वणवणलात

तरी अभावांची भूक मिटणार नाही

आणि अभावाच्याच लक्तरांनी

जीवनाचे नंगे शरीर झाकता येणार नाही

यासाठी जलधारांचे ताणे

आणि नांगरांच्या रेषांचे बाणे

यांनी मातीवर विणलेली

गर्द हिरवी महावस्त्रे हवी आहेत..’

lr02बाबांच्या कृषीविषयक दृष्टिकोनाचा प्रत्यय आणून देणारा अजून एक प्रसंग.. ‘Food for Peace’ ही एक ऑस्ट्रेलियन संघटना होती. त्यांच्या मते, उपासमार हीच अशांततेची जननी. आनंदवनाच्या कार्याविषयी ऐकल्यानंतर त्यांनी गव्हाची पोती पाठवून सहकार्य करण्याचा आपला इरादा एका पत्राद्वारे बाबांकडे व्यक्त केला. बाबांनी त्या ऑस्ट्रेलियन मित्रांना कळवलं- ‘‘Decline with thanks, because Peace will last as long as Wheat is there. Give us a Technique by which we produce Bumper Crop of Wheat!’’ ‘..आभारपूर्वक तुमच्या सूचनेचा अस्वीकार करावा लागत आहे याचा खेद वाटतो. शांततेसाठी तुम्ही गहू देणार. पण गहू असेपर्यंतच ही शांतता टिकणार. किंबहुना, गहू संपताच अशांतता उफाळून येणार. तेव्हा गहू पाठवण्याऐवजी गव्हाचे भांडार निर्माण करता येईल असे तुमचे उत्पादन तंत्र आम्हाला द्या!’

‘‘मातीच्या कानाला निर्मितीची फुंकर घालून तो सोन्याचा करण्याची किमया मानवी मनगटात आहे. आत्मनिर्भरतेतून विकास करण्याचे नाकारणाऱ्यांच्या भाळी अखेरीस नियती करंटेपणच लिहीत असते. स्थानिक शक्तिसाधनांचा विनियोग करून समृद्धी निर्माण केली तरच ती शाश्वत असते. इतरांकडे याचना करून अंगावर येते ती फक्त ‘सूज’ असते,’’ या विचारांवर बाबा ठाम होते.

ते १९६० साल असेल. आम्ही पोरं-पोरं खेळत होतो. अचानक आनंदवनात आमच्या झोपडीवजा घराजवळ एक लांबलचक कार येऊन थांबली. ती साधीसुधी कार नव्हती; शेवरलेट कंपनीची त्या काळातली सर्वात महागडी इम्पोर्टेड ‘इम्पाला’ कार होती. मी पडलो गाडीवेडा. त्यात अशी चकचकीत कार आनंदवनात आली म्हटल्यावर दुसरीकडे लक्ष जाण्याचा प्रश्नच नव्हता. कारमधून एक सहा फुटी धिप्पाड व्यक्तिमत्त्व बाहेर पडलं आणि त्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा पहाडी आवाजात गर्जलं, ‘‘आमटे गुरुजी आहेत का?’’ आता माझी प्राथमिकता अर्थात् ‘इम्पाला’ कारचं सौंदर्य डोळ्यांत सामावून घेणे ही असल्याने मी जराशा त्राग्यानेच उत्तरलो, ‘‘बघा, असतील इथेच कुठेतरी!’’ आणि पुन्हा ‘इम्पाला’च्या निरीक्षणात गर्क झालो. तेवढय़ात इंदू बाहेर आली. बाबा जवळच कुठेतरी कामात होते. तिने बाबांना बोलावलं. खादीची चड्डी आणि बनियन या अवतारातील बाबांना या पाहुण्याने चक्क शिरसाष्टांग दंडवतच घातला. या अचानक घडलेल्या घटनेने बाबा गोंधळात पडले. मग उभं राहत ती व्यक्ती बाबा आणि इंदूला म्हणाली, ‘‘मी प्रल्हाद केशव अत्रे.’’ ते आचार्य अत्रे होते! बाबांनी त्यांना आनंदवनाचा सर्व परिसर दाखवला. बाबा-इंदूची व्यक्तिमत्त्वं आणि त्यांचं कार्य पाहून आचार्य अत्रे भारावून गेले. कुष्ठरोगासंदर्भातील शासकीय उदासीनता आणि अनास्थेबद्दल त्यांनी आपल्या खास शैलीत कोरडा ओढला, ‘‘या मंत्र्यांना महारोग झाल्याशिवाय ते आनंदवनी येणार नाहीत.’’

मुंबईला परतल्यानंतर आपल्या ‘मराठा’ या दैनिकात त्यांनी आनंदवनावर एक अग्रलेख लिहिला. त्यातला काही अंश..

‘‘आनंदवन म्हणजे भारतातील एक चमत्कार आहे. महारोग्यांना वैद्यकीय उपचार करून किंवा त्यांना बरे करून त्यांची समस्या सुटत नाही, ही गोष्ट महर्षी आमटे यांनी ओळखली. अशा रोग्यांना स्वावलंबनाचे आणि आत्मविश्वासाचे नवे जीवन दिले तरच त्यांना सुखाने शेवटपर्यंत आपले जीवन कंठिता येईल, यादृष्टीने महर्षी आमटे यांनी हे आनंदवन काढले. या संस्थेतील रहिवासी ‘महारोगी’ आहेत ही भावना त्यांनी या वातावरणातून खुडून टाकली आहे. एखाद्या शेतकी कॉलेजात शेतीविषयक जे प्रयोग कोणी करत नाही, ते आज या वसाहतीमध्ये महारोग्यांच्या हातून महर्षी आमटे हे करून घेत आहेत, असे आम्ही सांगितले तर ऐकणारे थक्क होतील. या शेतीतून निर्माण न होणारी अशी एकही गोष्ट नसेल. कोथिंबिरीपासून ते उसापर्यंत सर्व पालेभाज्या व अन्नधान्ये येथे निर्माण होतात आणि तीही असामान्य प्रकारची. वांगी दुधीभोपळ्याच्या आकाराची आणि मिरच्या एकेक मुठीच्या आकाराच्या.. सगळ्यात आम्हाला आश्चर्य वाटले गुलाबाच्या एका लहानशा रोपटय़ाचे! एका रोपटय़ाला ७०० गुलाबाची फुले.. म्हणजे पाने जवळजवळ नाहीतच. आनंदवनातील दूध, भाज्या नि धान्य बाहेर विक्रीला पाठवण्यात येते आणि त्याला सर्वत्र फार मागणी आहे. अशा रीतीने स्वावलंबनावर या संस्थेचा सर्व संसार उभारला आहे. देशोदेशीचे अनेक अधिकारी लोक भारतात आल्यावर प्रथम ‘ताजमहाल’ पाहतात आणि नंतर वरोऱ्याला जाऊन ‘आनंदवन’ पाहतात, ही कदाचित कोणाला दंतकथा वाटेल; पण त्यात अतिशयोक्तीचा लवलेश नाही. महर्षी आमटे म्हणजे विलक्षण सामर्थ्यांचा नि योग्यतेचा महापुरुष आहे. आणि त्यांचे ‘आनंदवन’ म्हणजे मानवतेचं महन्मंगल तीर्थक्षेत्र आहे!’’

ही गोष्ट इथेच संपत नाही. १९६१ साली एक लाल दिव्याची कार आनंदवनात येऊन उभी राहिली. एक तर कार- आणि त्यात वर लाल दिवा- त्यामुळे मी नेहमीप्रमाणे कारभोवती घोटाळू लागलो. त्या कारमधून आलेलं व्यक्तिमत्त्व होतं- नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण! ‘मंत्री आनंदवनात येतील महारोग झाला तरच!’ हे आचार्य अत्रे यांचे उद्गार त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. बाबांना नमस्कार करत ते उद्गारले, ‘‘मला महारोग झाला नाही, तरी मी आलो बाबा..’’ विशेष म्हणजे सुजलाम-सुफलाम पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या यशवंतरावजींनीही पहिल्यांदा स्प्रिंकलर्स पाहिले ते आनंदवनातच! यावरून बाबांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पुढारलेपणाची कल्पना आपणास यावी.

विकास आमटे vikasamte@gmail.com